esakal | पुण्यतिथी विशेष: राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
sakal

बोलून बातमी शोधा

 Punyatithi of Rashtrasant Tukdoji maharaj read full article

मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. आज त्यांचा निर्वाण दिन. त्यानिमित्त या थोर राष्ट्रसंताला विनम्र अभिवादन.

पुण्यतिथी विशेष: राष्ट्रनिर्माणासाठी झटणारे महाराष्ट्रातील आधुनिक संत - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

sakal_logo
By
निलेशकुमार रामभाऊजी इंगोले

अमरावती: संतांच्या विचारातील राष्ट्र निर्माणाची भावना, विश्वधर्माच्या प्रसाराचे कार्य आणि मानवतावादी प्रेरणेचा विचारप्रवाह आधुनिक काळामध्ये पुढे नेण्याचे कार्य विदर्भाच्या मातीत जन्मलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केले. आज त्यांचा निर्वाण दिन. त्यानिमित्त या थोर राष्ट्रसंताला विनम्र अभिवादन.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्म २९ एप्रिल १९०९ मध्ये विदर्भातील अमरावती जिल्ह्यात यावली येथे झाला. त्यांचे मूळ नाव माणिक बंडोजी इंगळे (ठाकूर) हे होते. खंजिरी भजन हा प्रकार त्यांच्या समाज प्रबोधनाचे खास वैशिष्ट्य होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज देशालाच देव मानणारे संत होते. त्यांनी आपल्या सामाजिक कार्यात केवळ आणि केवळ देशाच्या विकासाचाच विचार केला. तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तनाच्या व खंजिरी भजनांच्या माध्यमातून समाजसेवा व राष्ट्रनिर्माण हे ध्येय ठेवून कार्य केले. त्यासाठी परंपरागत अनिष्ट रुढी, जाती-धर्म-पंथ भेद, अंधश्रद्धा, इत्यादी समाजघातक गोष्टींवर कठोर प्रहार करून ईश्वराचे विशुद्ध स्वरूप त्यांनी समाजासमोर मांडले.


अरण्यऋषी मारुती चितमपल्ली आज घेणार विदर्भाचा निरोप; पुढील मु.पो. सोलापूर!

धर्म-पंथ-देशाचे भांडण | न मिटे ऐक्य - प्रेमाविण |

या ग्रामगीतेतील विधानातून देशातील भांडण हे केवळ धर्म - पंथाच्या भेदभावामुळेच आहे. प्रेमाने तर ऐक्याला कोणतीही बाधा येत नाहीत. त्यासाठी बंधू भावना रुजवणे गरजेचे आहे. असे विचार मांडून समाजाला ऐक्याची भावना जोपासण्यासाठी त्यांनी प्रबोधन केले.

जगी नांदावी सुखी, शांती | सर्वांनी आचरावी बंधूप्रीति |

अशा शब्दात आपल्या लिखाणातून त्यांनी जगाला विश्व मानवतेचा, बंधुभावनेचा मार्ग दाखविला. त्यामुळेच सर्व धर्माचे, सर्व पंथांचे लोक त्यांच्याकडे आत्कृष्ट झाले. आत्मसंयमाचा आणि देशभक्तीचा विचार त्यांनी आपल्या 'ग्रामगीता' या काव्यातून रुजविला व त्याचा प्रचार करण्यासाठी त्यांनी अविश्रांत श्रम केले. गावोगावी गुरुदेव सेवा मंडळे स्थापली. व्यायामाचे महत्त्व सांगण्यासाठी आदेश रचना या ग्रंथाची रचना केली. राष्ट्रीय विचारांचा पुरस्कार त्यांनी सत्याग्रहात भाग घेऊन केला. 

तुकडोजी महाराजांनी राष्ट्रीय कार्यातच आपले जीवन समर्पित केले. विश्वधर्म, विश्वशांती परिषदेसाठी १९५६ मध्ये ते जपानला गेले. त्यांच्या भजनाने अनेक पाश्चात्य व पौर्वात्य विद्वान मोहित झाले. १९६६ मध्ये प्रयाग येथे विश्वहिंदू परिषदेचे ते अध्यक्ष होते. सर्व धर्म-पंथ-जाती यांच्या पलीकडे असलेल्या ईश्वराचे स्वरूप ते आपल्या भाषणातून प्रगट करीत होते. त्यांच्या विचारांचे स्वरूप जागतिक होते. आपल्या मानवतावादी वैश्विक विचारांनी संपूर्ण मानवजातीला एक करणाऱ्या राष्ट्रसंतांची समग्र जीवन गाथा म्हणजे राष्ट्र विकासासाठी अखंडपणे धडपडणारी लोकगाथाच आहे. 

डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रसंत असे आदरपुर्वक संबोधले

तुकडोजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वातील संतत्व आणि राष्ट्रीयत्वाचा संगम पाहून भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी तुकडोजी महाराजांना राष्ट्रसंत असे आदरपुर्वक संबोधले. त्यांनी स्वातंत्र्य, भारताची एकात्मता व भारताचे सुराज्य या सर्वांसाठी घेतलेले कष्ट, केलेला त्याग, सोसलेला कारावास आणि प्रत्येक भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत जागवून राष्ट्रवादाचे समर्थन केले. या महान कार्यामुळेच राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या तुकडोजी महाराजांनी खऱ्या अर्थाने राष्ट्रसंत उपाधीला सार्थक ठरविले आहे.

मेळघाटात गावे कमी अन् एनजीओच जास्त; प्रत्यक्षात पाच ते सहाच कार्यरत

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची देशाला गरज

आपल्या प्रबोधन काळात त्यांनी देशात धार्मिक एकात्मता निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. १९६८ साली कमालीच्या वेदना चालू असतानाही महाराजांनी निरंतर राष्ट्रधर्म जनजागृतीचा दौरा केला. दिनांक ११ ऑक्टोंबर १९६८ मध्ये त्यांचे अमरावती येथिल गुरुकुंज आश्रम मोझरी येथे निर्वाण झाले. गुरुकुंज आश्रम मोझरी च्या वतीने त्यांचे समाजोपयोगी कार्य आज समाजात अखंड चालू आहे. प्रत्येक गावागावात गुरुदेव सेवा मंडळाच्या रूपाने लावलेली ज्योत आजही तेवत आहे. आपल्या जीवन यात्रेतून त्यांनी राष्ट्र, स्वातंत्र्यप्राप्ती व राष्ट्रीय एकात्मतेसाठी आदर्श जीवन जगतांना सदाचारातून सुखाकडे, श्रमातून आनंदाकडे, देशभक्ती तुन राष्ट्रहिताकडे, शिक्षणातून प्रगतीकडे जाण्याचा मार्ग प्रशस्त केला. राष्ट्रसंतांचे हे कार्य समाजाला आणि विशेषता तरुण पिढीला मार्गदर्शक ठरावे असे पथदर्शक आहे. म्हणूनच राष्ट्रीय एकात्मतेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांची आज देशाला गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ