भंडारा जिल्ह्यात बारीक धान खरेदी करून ठोकळ धानाची विक्री, व्यापाऱ्यांची पैसे कमावण्याची तऱ्हाच न्यारी

चंद्रशेखर साठवणे
Sunday, 3 January 2021

शेतकरी अधिक भाव मिळत असल्याने आधारभूत केंद्रावर हमीभाव व बोनस मिळवण्याच्या प्रयत्नात खरेदी केंद्रातच धान विकण्याचा प्रयत्न करत आहेत. धानाचे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त बारीक धानखरेदी करत आहेत. व्यापाऱ्यांनी शासनाला हमीभावानुसार ठोकळ तांदळाचा पुरवठा करणे सुरू केले आहे.

मोहाडी (जि. भंडारा) : शासनाने शेतकऱ्यांसाठी हमीभाव धानखरेदी केंद्र चालू केले असून धानाचा किमान भावही ठरवून दिला आहे. मात्र, केंद्रचालकांकडून शेतकऱ्यांचे धान लवकर खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी व्यापाऱ्यांचे ट्रक सरळ माल घेऊन खरेदीकेंद्रात आल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. आता व्यापाऱ्यांनी नवीन फंडा वापरून नफा कमावण्याचा मार्ग शोधला आहे. शेतकऱ्यांकडून बारीक धान सातबारावर घेऊन त्याबदल्यात शासनाला हमीभावानुसार ठोकळ तांदळाचा पुरवठा करणे सुरू केले आहे. नफा कमविण्याची ही नवी शक्कल जिल्ह्यात `हिट’ होण्याची शक्‍यता आहे.

शेतकरी अधिक भाव मिळत असल्याने आधारभूत केंद्रावर हमीभाव व बोनस मिळवण्याच्या प्रयत्नात खरेदी केंद्रातच धान विकण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, ऑनलाइन सातबारा व टोकणनुसार नंबर येण्याची वाट पाहावी लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर गरजा पूर्ण करण्याची अडचण येत आहे. आता धानाचे व्यापारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फक्त बारीक धानखरेदी करत आहेत. शेतकऱ्यांना केंद्रातून शासकीय दराने चुकारा व बोनस मिळवून देण्याची हमी देऊन त्यांचे आधार कार्ड, बॅंकेची पासबुक, सातबाराचा उतारा मागत आहेत.

हेही वाचा : बापरे! पतसंस्थेच्या अध्यक्षांनीच केली कोट्यवधींची...

खरेदी केलेले बारीक धान व्यापारी आपल्या घरी व गिरणीमध्ये घेऊन जातात. व्यापारी शेतकऱ्यांकडून कोणतेही भाडे, हमाली न घेता प्रतिक्विंटलमागे जास्तीचे तीन किलो धान घेत आहेत. शेतकऱ्यांची टोकण रजिस्टरवर सहीसुद्धा घेत नाही. अशा अनेक कटकटींपासून वाचून धानाचे पैसे बॅंक खात्यात जमा होत असल्याने शेतकरी व्यापाऱ्यांच्या मोहपाशात अलगद अडकत आहेत. व्यापारी धान खरेदी करतो आणि पैसा शासन देतो. यावरून यावर्षी धानखरेदीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार होत असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.

मागील वर्षी खरेदीकेंद्र उशिरा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी बाहेर धान विकले होते. याच संधीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना विविध आमिषे दाखवून त्यांच्याकडून सातबारा, बॅंकेचे पासबुक, आधारकार्ड आपल्याकडे घेतले होते. चुकारे झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यातून बोनसचे पैसे काढून घेतले होते. त्यावेळी व्यापाऱ्यांनी मध्य प्रदेशातून ठोकळ धान १६०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून येथील केंद्रांवर विकले होते. आताही मागील वर्षीचे ठोकळ धान केंद्रांवर विकण्याची संधी साधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

चौकशी करून धान खरेदी केंद्र बंद करा

यावर्षी धानाचा भाव प्रतिक्विंटल १८८८ ते १८६८ रुपये असून क्विंटलमागे ७०० रुपये बोनस जाहीर केले आहे. या वर्षी मावा, तुडतुडा, करपा इत्यादी कीडरोगांमुळे धानाचे उत्पन्न कमी झाले आहे. तरीही खासगी लोकांच्या बोगस खरेदीमुळे यावर्षीही कागदोपत्री १०० टक्‍के उत्पन्न झाले, अशी नोंद होण्याची शक्‍यता आहे. खरेदी केंद्रांच्या संचालकांना शासन कमीशन देते; तर भातगिरणी चालकांना प्रतिक्विंटल ४० रुपये प्रमाणे मिलिंगचे पैसे मिळतात. पण, कुठेही मिलिंग न करता जुनाच तांदूळ शासनाला पुरवठा केला जात आहे. सर्वच केंद्रावर असे अनेक गैरप्रकार सुरू असल्याने तत्काळ चौकशी करून धान खरेदी केंद्र बंद करावे, अशी मागणी समता परिषदेचे तालुका महासचिव सुनील मेश्राम यांनी अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ व सहकारमंत्री बाळासाहेब उर्फ शामराव पाटील यांच्याकडे केलेल्या तक्रारीतून केली आहे.

जिथून तिथून कमाईच कमाई

खासगी व्यापारी हमीभावाप्रमाणे बारीक धान सातबारा घेऊन खरेदी करीत असले; तरी त्याकरिता क्विंटलमागे तीन किलो कपात करीत आहेत. तीन किलो धान आज ६५ ते ७० रुपयांचे होतात. हेच धान नंतर वाहनाने खरेदी केंद्रापर्यंत नेण्यास ३५ रुपये खर्च येतो. पोत्याची किंमत १५ रुपये धरल्यास एकूण खर्च ५० रुपये आला; तरी शेतकऱ्यांचे क्विंटलमागे २० रुपये नुकसान होत आहे. तसेच नंतर बारीक तांदूळ चांगल्या किमतीत विकले जाणार यात शंका नाही. शासनाकडून भरडाईला मिळालेल्या टेंडरनुसार शेतकऱ्यांकडून घेतलेल्या बारीक धानाच्या ठिकाणी ठोकळ तांदळाचा पुरवठा करून त्यातही अधिक पैसा कमावण्याची व्यापाऱ्यांची शक्कल आहे.

इकडे आड तिकडे विहीर

तालुक्‍यात सध्या सुरू असलेल्या धानखरेदी केंद्रांवर आलेल्या धानापेक्षा गोडावूनची साठवण क्षमता फारच कमी आहे. त्यामुळे केंद्रचालक त्रस्त आहेत. पुष्कळसा खरेदी केलेला माल गोडावूनच्या बाहेर ठेवण्यात येत असल्याने त्याची निगा राखण्याचे आव्हान आहे. मागील वर्षी अवकाळी पावसाने धान भिजल्याने केंद्र संचालकाना कमालीचा त्रास सहन करावा लागला होता. राजकीय पुढारी केंद्रसंचालकाना धान खरेदीची सक्ती करीत असले; तरी नवीन गोडावूनसाठी काहीही हालचाल करत नाही. त्यामुळे केंद्र संचालकाची स्थिती इकडे आड व तिकडे विहीरसारखी झाली आहे.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Purchase of fine grains in Bhandara district and sale of coarse grains