रविकांत तुपकरांचे अन्नत्याग आंदोलन स्थगित; डॉ. शिंगणे यांनी केली मध्यस्थी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तुपकरांचे आंदोलन स्थगित; डॉ. शिंगणे यांनी केली मध्यस्थी
रविकांत तुपकरांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित

तुपकरांचे आंदोलन स्थगित; डॉ. शिंगणे यांनी केली मध्यस्थी

बुलढाणा : सोयाबीन, उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी नागपूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते. परंतु, नागपूर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होत असल्याच्या कारणाने त्यांना बुलडाण्यात आणले. घरासमोरच त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले. १८ व १९ नोव्हेंबरला रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली होती. यामुळे शेतकरी संतप्त होत आंदोलन चिघळणार अशी चिन्हे होती. परंतु, शनिवारी (ता. २०) शासनाच्या वतीने पालकमंत्री शिंगणे यांनी मध्यस्थी करीत मागन्यांसदर्भात लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्‍वासन दिल्यामुळे रविकांत तुपकर यांनी आंदोलन तूर्तास स्थगित करीत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा: शेतकऱ्यांचं आंदोलन कधी थांबणार? आज बैठकीत रणनीती ठरणार

सोयाबीन, कापूस हमीभावासह विदेशातून आयात करण्यात येत असलेली सोयाबीन पेड बंद करण्यात यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी आंदोलन करण्यात येत होते. दरम्यान, १८ नोव्हेंबरला तणाव निर्माण होऊन १९ नोव्हेंबरला रास्ता रोको, दगडफेक आणि जाळपोळ करण्याचा प्रयत्न काहींनी केला. यावर पालकमंत्र्यांनी दखल घेत आज (ता. २०) रविकांत तुपकर यांची भेट घेतली.

हेही वाचा: शिवसेनेने सुनील शिंदेंना का संधी दिली? संजय राऊतांनी सांगितलं कारण...

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा झाली असून, यासंदर्भात जिल्हाधिकार्‍यांसह कृषी मंत्री दादा भुसे व राज्यातील सर्व कृषी अधिकार्‍यांसोबत मंत्रालयात २४ नोव्हेंबरला बैठक बोलावून समस्यांवर चर्चा करण्यात येईल. बैठकीचे निमंत्रणही तुपकरांना दिले. केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळ दिल्लीला पाठवण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्र्यांनी दिले.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही तुपकरांना फोन करून केंद्र सरकारकडे असलेल्या मागण्यांबाबत आपण स्वतः केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यास जाऊ व त्यांच्याकडे मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. आंदोलकांविरुद्ध दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा करणार असल्याचे आश्वासन डॉ. शिंगणे यांनी दिले तसेच, सोयाबीन पेठ संदर्भात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्यासोबत चर्चा करण्यात येऊन आयात बंद करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा: कौटुंबिक वादाने घेतला पती-पत्नीचा जीव; एक अत्यवस्थ

यानंतर रविकांत तुपकर यांनी पालकमंत्री डॉ. शिंगणे यांच्या आश्‍वासन आणि झालेल्या चर्चेच्या अंती तूर्तास सदर आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगून बैठकीनंतर पुढील निर्णय घेण्यात येईल असे स्पष्ट केले. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने पुकारलेले आंदोलन आता तूर्तास स्थगित झाले असून, कार्यकर्ते तसेच शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका न घेता शांतता ठेवावी असे अधिकृतरीत्या स्पष्ट केले आहे.

वेळप्रसंगी मोठा लढा उभारू

पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची विनंती मान्य करून रविकांत तुपकर यांनी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. पालकमंत्र्यांनी सरबत पाजून त्यांचा अन्नत्याग संपुष्टात आणला. मात्र, मागण्या मान्य झाल्या नाहीत तर यापेक्षा मोठा लढा उभारण्यात येईल, पुन्हा रस्त्यावर उतरू, असा इशारा यावेळी रविकांत तुपकर यांनी दिला.

loading image
go to top