डॉ. शीतल आमटे आत्महत्येचे गूढ कायम; सीसीटीव्ही फुटेज, लॅपटॉप, मोबाईल चौकशीसाठी ताब्यात

श्रीकांत पशेट्टीवार 
Tuesday, 1 December 2020

मंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे.

आनंदवन (चंद्रपूर) ः ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात, डॉ. विकास आमटे यांची कन्या आणि महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे यांना आनंदवनातील स्मृतिवनाजवळ सोमवारी रात्री पावणदहाच्या सुमारास दफन करण्यात आले. 

मंगळवारी पोलिसांनी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या वापरातील लॅपटॉप, मोबाईल, घर आणि कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज चौकशीसाठी ताब्यात घेतले. मात्र त्यांच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. सध्या पोलिस प्रशासन याप्रकरणात कमालीची गुप्तता पाळून आहे.

जाणून घ्या - हृदयद्रावक! बेपत्ता सव्वा महिन्याच्या बाळाचा मृतदेहच घरच्या विहिरीत तरंगताना आढळला

डॉ. शीतल आमटे यांनी राहत्या घरी सोमवारी (ता. ३०) विषाचे इंजेक्‍शन टोचून आत्महत्या केली. या घटनेमुळे सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. हायप्रोफाईल प्रकरण असल्याने पोलिसांनीही मोठी गुप्तता पाळून चौकशीला सुरुवात केली आहे. रात्री उशिरा कुटुंबीयांच्या उपस्थितीत दफनविधी पार पडला. यावेळी वडील डॉ. विकास आमटे, आई डॉ. भारती आमटे, भाऊ डॉ. कौस्तुभ आमटे, पती गौतम करजगी, मुलगा शरविल, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे, डॉ. दिगंत आमटे, डॉ. अनघा आमटे, अनिकेत आमटे, समीक्षा आमटे, पल्लवी आमटे यांची उपस्थिती होती.

जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी मंगळवारी आनंदवनाला भेट देऊन चौकशी केली. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश पांडे, पोलिस निरीक्षक खोब्रागडे उपस्थित होते. घर, कार्यालयातील चार दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज आणि डॉ. शीतल आमटे वापरत असलेले लॅपटॉप, मोबाईल, कपडे ताब्यात घेतले. 

आनंदवनातील नागरिकांचे बयाण नोंदविण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. फॉरेन्सिंगच्या तीनसदस्यीय चमूने कालच घटनास्थळाला भेट देऊन चौकशी केली होती. शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. आत्महत्येचे गूढ अजूनही कायम असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी मंगळवारी भेट देऊन आमटे कुटुंबीयांचे सांत्वन केले.

दोन दिवसांवर मुलाचा वाढदिवस

डॉ. शीतल आमटे-करजगी यांचा शरविल हा एकुलता एक मुलगा आहे. त्याचा शुक्रवारी वाढदिवस आहे. डॉ. शीतल या दरवर्षी वृक्षारोपण करून मुलाचा वाढदिवस साजरा करीत होत्या. मात्र, वाढदिवसाच्या तीन दिवसांआधीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. या घटनेने शरविलला मोठा धक्का बसला आहे. दफनविधीच्या वेळेत शरविलने हंबरडा फोडताच सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले. सर्व वातावरण भावुक झाले होते.

क्लिक करा - War and Peace' : आत्महत्येच्या काही तासांपूर्वी डॉ. शीतल आमटेंचे ट्विट; नेमके काय सांगायचे होते 'बाबां'च्या नातीला?

पोलिसांकडून मोठी गुप्तता

आमटे कुटुंबीय मोठे प्रस्थ आहे. जिल्ह्यासह संपूर्ण राज्य, देशभरात या कुटुंबीयांचा मोठा चाहता वर्ग आहे. या कुटुंबात आत्महत्येची घटना घडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली. मात्र, ही आत्महत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याची चर्चा सुरू आहे. परंतु, पोलिस विभागाकडून मोठी गुप्तता पाळत तपास सुरू आहे. याप्रकरणी पोलिस अधिकारी काहीही बोलण्यास तयार नाही.

आत्महत्येची घटना धक्कादायक आणि अनपेक्षित आहे. या घटनेमुळे आमटे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सध्या काहीही सांगण्याची मनःस्थिती नाही.
- डॉ. दिगंत प्रकाश आमटे, 
चुलतभाऊ

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: reason behind shital amte death is still not finding