जिल्हयात विविध राजकीय पक्षांना फुटीचे ग्रहण

कुही : आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करताना भागेश्‍वर फेंडर.
कुही : आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करताना भागेश्‍वर फेंडर.
Updated on

नागपूर : 7 जानेवारी रोजी होउ घातलेल्या जि.प. व पं.स.निवडणुकीकरीता आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. त्यादरम्यान अनेक दिग्गजांना राजकीय पक्षांनी उमेदवारी नाकारल्यामुळे प्रस्थापित उमेदवारांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. जिल्हयातील प्रत्येक तालुक्‍यात राजकीय पक्षांसमोर बंडोबांनी आव्हान उभे केले आहे.

फेंडरने सोडली भाजपची साथ
कुही : तालुक्‍यातील भाजपचे वजनदार नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे निकटवर्ती समजले जाणारे भाजपचे महामंत्री भागेश्‍वर फेंडर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
भागेश्‍वर फेंडर यांनी यापूर्वीच्या जि. प. निवडणुकीत मांढळ जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. त्यांनी त्या वेळी कॉंग्रेसचे विजयी उमेदवार उपासराव भुते यांना चांगलाच घाम फोडला होता. जेव्हा जेव्हा ते निवडणूक रिंगणात उतरले, तेव्हा तेव्हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मांढळला प्रचारसभेला आले होते. फेंडर यांचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी अगदी जवळचे संबंध आहेत. या वेळी ते मांढळमधून जि. प.साठी पत्नी मनीषा फेंडर यांना भाजपकडून लढविण्यास उत्सुक होते. भाजपकडून रूपाली राऊत यांना तिकीट देण्यात आले. त्यामुळे फेंडर कमालीचे नाराज होते. त्यांनी माजी मंत्री व विद्यमान आमदार अनिल देशमुख यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता मनीषा भागेश्‍वर फेंडर यानी राष्ट्रवादीकडून मांढळ जि. प.साठी नामांकन अर्ज दाखल केला. आता मांढळमध्ये भाजप, कॉंग्रेस, राष्ट्रवादी अशी तिहेरी लढत होईल.


भाजपचे विनोद ठाकरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
हिंगणा : भाजपचे डिगडोह ग्रामपंचायत सदस्य तथा नागपूर जिल्हा कार्यकारिणी सदस्य विनोद ठाकरे व त्यांच्या पत्नी सूचिता ठाकरे यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला.माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांनी पक्षाचा दुपट्टा घालून त्यांचे व समर्थकांचे स्वागत केले. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये बबनराव पडोळे, नीलेश कळंबे, प्रशांत उज्ज्वलकर, ग्रा.पं. सदस्य राजेश बोरकर, सौ. तिवारी, अजय आगवने, श्‍याम गलगटे, दिनेश तांदूळकर, तारेश्‍वर चौधरी, गजानन सिंग, संतोष राठी, सचिन काळे, प्रमोद भांडेगावकर, रंजित पाटील, अमोल तायडे, मोरेश्‍वर मुंजेवार, संजय इंगोले, अजय तायडे, प्रफुल्ल धोटे, एन. आर, सिंग आदींसह शेकडो समर्थकांचा समावेश आहे.


राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाटी कोरी
रामटेक :  सर्व पक्षांच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करीत आपापले उमेदवारी अर्ज सादर केलेत. कॉंग्रेस, भाजप व शिवसेनेच्या काही चर्चित उमेदवारांनी दुसऱ्या पक्षांकडून उमेदवारी सादर केली. कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष नकुल बरबटे यांचे तिकीट पक्षाने कापल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. तर, भाजपनेही तालुकाध्यक्ष ज्ञानेश्‍वर ढोक यांना उमेदवारी दिली नाही. त्यामुळे त्यांनी बंडखोरी करीत अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसची पाटी कोरी राहिली. राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात एकही उमेदवार नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

गोंडेगावमध्ये वाडीभस्मेंना शिवसेनेचा "आशीष'
पारशिवनी ः तालुक्‍यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या रणांगणात शेवटच्या दिवशी शंभर नामांकन अर्ज तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले. यात अनेक प्रकारच्या राजकीय हालचालीने अनेकांच्या भुवया उंचावल्या. साटक जिल्हा परिषद सर्कलमध्ये शिवसेनेकडून स्थानीय शिवसैनिकांना डावलून दणका संघटनेचे अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद सदस्य योगेश वाडीभस्मे यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेच्या एकजुटीला वाडीभस्मेचा "दणका' असा सूर सध्या क्षेत्रात शिवसैनिकांनी छेडायला सुरवात केली आहे. टेकाडी जि. प. सर्कलमध्ये भाजपकडून कल्पना चहांदे यांना ऐन वेळेवर डावलून शालिनी लीलाधर बर्वे यांना पक्षाने एबी फॉर्म दिल्याने चहांदे यांचे जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचे स्वप्न भंग झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com