बळीराजाच्या हृदयात भरली धडकी; हातातोंडाशी आलेला घास जाण्याची शक्‍यता; परतीचा पाऊस धोक्याचा 

returning monsoon is dangerous  for crops of farmers
returning monsoon is dangerous for crops of farmers

गडचिरोली : सिंचनाची कोणतीही सुविधा नसलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिवाचे रान करून आपले धानपीक जगवले. आता हे धानपीक कापणीला आलेले असताना परतीच्या पावसाने त्यांच्या हृदयात धडकी भरवली आहे. मागील काही दिवसांपासून अचानक कोसळत असलेला पाऊस आणि भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलेला मुसळधार पावसाचा अंदाज यामुळे हातातोंडाशी आलेला घास जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात 13 ते 17 ऑक्‍टोबर या कालावधीत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता वर्तवली होती. त्यामुळे नद्याकिनारी राहणाऱ्या पूरप्रवण भागातील गावांना सावधानतेचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला होता.

विजेच्या कटकाडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्‍यता वर्तण्यात आल्याने संभाव्य धोके लक्षात घेता जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून आवश्‍यक उपाययोजना व विभागाकडील शोध आणि बचावपथक, बचाव साहित्य आदी सुविधा कार्यान्वित करण्यात आल्या. या काळात अधूनमधून पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी पावसाने झोडपल्याने धानपीक जमिनीवर आडवे झाले. तरीही हवामान विभागाच्या अंदाजानुसार खूप मुसळधार पाऊस अद्याप जिल्ह्यात झालेला नाही. 

मात्र, नजीकच्या तेलंगणा राज्यात पावसाचे थैमान सुरू आहे. याशिवाय महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. म्हणून या परतीच्या पावसाने उग्र रूप धारण केले, तर आपल्या पिकाचे काय होणार, असा प्रश्‍न शेतकऱ्यांना सतावत आहे. गणेशोत्सवादरम्यान गोसेखुर्द व संजय गांधी धरणाचे पाणी सोडल्याने पाऊस नसतानाही जिल्ह्यात कृत्रिम महापूर आला होता. 

बळीराजावर अनेक संकटे

त्यातही शेतकऱ्यांच्या धानपिकाचे मोठे नुकसान झाले होते. गडचिरोली जिल्हा धानउत्पादकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथे खरीप हंगामातील धानावरच शेतकरी लक्ष केंद्रित करतात. कधी पावसाचा लहरीपणा आणि कधी विविध कीटकांचा प्रादुर्भाव या दुष्टचक्रात शेतकरी भरडले जातात. यंदाही अशी अनेक संकटे शेतकऱ्यांनी पार केली. आता अनेकांच्या शेतातील धानाच्या लोंब्यात धान भरले आहेत. 

दुष्काळात तेरावा महिना 

काही ठिकाणी धान गर्भात असून लवकरच कापणीस तयार होत आहे. कित्येक ठिकाणी धानाच्या बांधीतील धानपीक पिवळे पडून कापणीसाठी खुणावत आहे. या परिस्थितीत मुसळधार पावसाने हजेरी लावली, तर हे धानपीक भुईसपाट व्हायला वेळ लागणार नाही. अनेक शेतकऱ्यांकडे पीक साठवायला जागा नसते. त्यामुळे ते कापणीनंतर धानाच्या कडपा शेतातच ठेवतात. अशावेळेस पाऊस आल्यास कडपा भिजून धानाला अंकुर येऊ शकते. म्हणून या सगळ्या संभाव्य संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

साठवणुकीचा प्रश्‍न

जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे आपले पीक साठवायला कोणतीच सोय उपलब्ध नाही. धान कापल्यानंतर शेतातच डिबली करून ठेवले जाते. अनेकदा शेतात ठेवलेले धानाचे पुंजणे काही विघ्नसंतोषी लोक पेटवून देतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली पारंपरिक शेती व साठवणुकीची पारंपरिक पद्धत तशीच आहे. शेतकऱ्यांकडून धान खरेदी करणाऱ्या आदिवासी पणन महासंघाकडेही पुरेसे गोदाम नसल्याने दरवर्षी हजारो क्‍विंटल धान खराब होत असतो. म्हणून या समस्येकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

संपादन - अथर्व महांकाळ  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com