esakal | बाळापूर तालुक्यात दोन वर्षांपासून रस्ते उठले जीवावर; वीस गावांनी अजून पाहिलीच नाही एसटी
sakal

बोलून बातमी शोधा

बाळापूर तालुक्यात दोन वर्षांपासून रस्ते उठले जीवावर; पाहिलीच नाही एसटी

बाळापूर तालुक्यात दोन वर्षांपासून रस्ते उठले जीवावर; पाहिलीच नाही एसटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अकोला : बार्शीटाकळी तालुक्याचा दौरा आटोपून अकोल्यात पोहोचलो व दुसऱ्या दिवशी सकाळीच अकोल्याहून २५ किलोमीटरवर असलेल्या बाळापूरच्या दिशेने ‘मार्गस्थ’ झालो. चार किलोमीटरचा प्रवास करीत बाळापूर तालुक्यातील रिधोरा गावात (Ridhora village) प्रवेश केला. तिथे ‘सकाळ’चे बाळापूर तालुका बातमीदार अनिल दंदी यांनी बसथांब्यावर स्वागत केले. त्यांच्यासोबत ‘सकाळ’चे देगाव येथील बातमीदार उमेश मैसने होते. (Roads have not been constructed in Balapur taluka for two years)

गावातील ग्रामपंचायतीची प्रशस्त इमारत पाहून जरा बरे वाटले. रिधोरा ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच संजय अघडते व उपसरपंच गणेश वाडकर यांनी स्वागत केले. गावातील शेतरस्त्यांची पाहणी केली. रस्त्यावरील काटेरी झुडपे तोडण्याची कामे सुरू होती. तालुक्यातील बिकट रस्त्यांबाबत अनिल दंदी यांनी माहिती दिली होतीच. त्यामुळे आम्ही रिधोरा-देगावमार्गे वाडेगावकडे निघालो. देगावपर्यंत रस्ता बरा वाटला. मात्र त्यानंतरच्या रस्त्याने धड पायी चालताही येत नव्हते. ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला बाळापूर येथील किल्ला व राजा जयसिंग यांची छत्री पर्यटकांसाठी कायम उत्सुकतेचा विषय आहे. मन व मस नदी काठावर वसलेले बाळापूर शहर धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. या वारसास्थळामुळे बाळापूरची देशभर ख्याती; मात्र रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे जगभर नाचक्‍की अशी स्थिती आहे.

हेही वाचा: वर्धेत म्युकरमायकोसिसचा पहिला बळी; कोरोनावर केली होती मात

खड्डेच खड्डे चोहीकडे; रस्ते गेले कुणीकडे!

तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील व गावातील अंतर्गत रस्त्यांची अक्षरश: दैना झाली आहे. या रस्त्यांवर पडलेले मोठमोठेे खड्डे वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तालुक्यातील वाडेगाव-देगाव, खिरपुरी, मोरगाव सादीजन, हसनापूर, डोंगरगाव या मुख्य मार्गाची अवस्था दयनीय आहे. दरवर्षी डांबरीकरणाच्या नावाखाली निकृष्ट काम करून लाखो रुपये लाटले जातात. बाळापूर शहरासह देगाव, खिरपुरी, रिधोरा, निमकर्दा, खंडाळा, मोरगाव, टाकळी, कारंजा आदी गावांतील रस्तेही नादुरुस्त आहेत.

दोन कंपन्यांना कंत्राट, तरी रखडले पालखी मार्गाचे काम

शेगाव-किनगाव जट्टू व पुढे पंढरपूरकडे जाणाऱ्या या पालखी मार्गाचे काम तीन वर्षांपासून सुरूच आहे. बुलडाणा, अकोला व वाशीम जिल्ह्याला जोडणाऱ्या या ८२ किलोमीटर रस्त्याच्या कामाचे कंत्राट सुरुवातीला सुधीर कन्स्ट्रक्शन व आता ‘गो अहेड इन्फ्रा’ कंपनीला दिले आहे. हे काम तब्बल ३७१ कोटींचे आहे. यातील केवळ दहा टक्के काम झाले असून, कंपनीने ७०.४९ कोटी रुपयांचा खर्च या कामावर केला.

हेही वाचा: बापासाठी अखेरचा ठरला मुलाचा वाढदिवस, तलावात बुडून बाप अन् लेकाचा मृत्यू

विद्युत केंद्राच्या राख वाहतुकीने रस्त्यांची चाळण

पारस औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखडीच्या सततच्या वाहतुकीमुळे मनारखेड रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. मुख्य रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. पारस औष्णिक वीज केंद्रातून निघणाऱ्या राखडीची वाहतूक मनारखेड, कोळासा मार्गावरून केली जाते. खड्ड्यांतून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

शेगाव-पंढरपूर या दिंडी मार्गाला दहा वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. गेल्या सात वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू आहे. व्यवस्थित असलेला रस्ता पूर्णतः खोदून ठेवला आहे. शेगावला जायचे असेल तर अडचणी येतात. पारस-निमकर्दा-अकोला-गोरेगाव-भरतपूर-वाडेगाव मार्गाची अवस्था बिकट आहे. यासंदर्भात मुख्य अभियंत्यांसोबत चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडेही पत्रव्यवहार केला. उमरा, सावरगाव येथील रस्त्यांची अवस्था प्रचंड दयनीय आहे.
- बळीराम सिरस्कार, माजी आमदार, बाळापूर विधानसभा

हेही वाचा: वडिलांच्या भेटीसाठी मुलाने दुचाकीने केला ६७० किलोमीटरचा प्रवास

वाडेगाव रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तालुक्याचे आमदार नितीन देशमुख यांनी या रस्त्यासाठी सेनेचे जिल्हाध्यक्ष असताना जनआंदोलन केले होते. त्यामुळे त्यांनी या रस्त्याकडे जातीने लक्ष घालून नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घ्यावा.
- रेखा अंभोरे, माजी समाजकल्याण सभापती, अकोला
वाडेगावसह जवळपास ४० ते ५० गावांना जिल्ह्याला जोडणारा वाडेगाव-अकोला हा एकमेव प्रमुख मार्ग आहे. मात्र, नूतनीकरणाच्या नावाखाली दोन-तीन वर्षांपासून हा रस्ता खोदून ठेवला आहे. त्यामुळे अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर काहींना कायमचे अपंगत्व आले. या रस्त्याच्या कामाला तत्काळ सुरुवात करावी, अन्यथा वाडेगाव-अकोला रस्त्यावरील सर्व गावातील नागरिकांना सोबत घेऊन मोठे आंदोलन करू.
- मंगेश तायडे, सरपंच, वाडेगाव
शेगाव दिंडी मार्ग पारस-निमकर्दामार्गे अकोल्याकडे जातो. हा मार्ग दोन वर्षांपासून खोदून ठेवला आहे. रस्त्यावर काही ठिकाणी गिट्टी टाकली आहे. ती गिट्टी रस्त्यावर पसरली आहे. त्यामुळे रस्त्यावरून धड पायी चालता येत नाही. वाऱ्यामुळे उडणारी धूळ डोळ्यांत जात असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रस्त्यावरून चालणे कठीण होत असल्याने पारस येथून अकोला जाण्यासाठी जोगलखेड मार्गाचा अवलंब करावा लागतो.
- प्रगती दांदळे, जिल्हा परिषद सदस्य

Roads have not been constructed in Balapur taluka for two years