जीवनपद्धती बदला, भारतात तयार होणाऱ्या वस्तूंचा वापर करा : डॉ. भागवत

mohan bhagwat
mohan bhagwat

नागपूर : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी घोषित करण्यात आलेल्या लॉकडाउनला एक आव्हान समजा. स्वत:ची जीवनपद्धती बदलविण्याची ही संधी आहे. भारतात जे तयार होते त्याचा अवलंब करून जीवन कसे जगता येईल याचा प्रत्येकाने विचार करावा. प्रत्येकाने निर्भय होऊन कोरोनाचा सामना करा, शांततेच्या मार्गाने व शासनाच्या सूचनांचे तंतोतत पालन करून लॉकडाउन यशस्वी करा, असे आवाहन डॉ. भागवत यांनी केले. 

अक्षय तृतीयेच्या पर्वावर नागपूर महानगरच्यावतीने त्यांच्या ऑनलाइन बौद्धिक वर्गाचे आयोजन करण्यात आले. "वर्तमान स्थिती आणि आमची भूमिका' असा या बौद्धिकवर्गाचा विषय होता. युट्यूब व फेसबुकवर प्रसारित झालेल्या या बौद्धिकात सरसंघचालकांनी लॉकडाउननंतरची जीवनशैली, स्वदेशीची जागृती आणि देशात सुरू असलेले सेवाकार्य या विषयांवर सविस्तर भाष्य केले. 

सरसंघचालक म्हणाले, कोरोना विषाणूच्या संकटाने प्रथमच जगावर आक्रमण केले आहे. या विषाणूची कोणालाही पूर्ण कल्पना नाही. हे संकट घरात राहूनच जिंकता येणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने स्वत:चे सर्व कार्यक्रम घरात राहूनच करावे. काही समाजकंटकांना घरात बंदिस्त करून ठेवल्यासारखे वाटते आहे. म्हणून त्यांच्याकडून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अशांपासून सावध राहून शांततेने सूचनांचे पालन करावे. 

सद्यस्थितीत सेवाकार्यासोबतच प्रबोधन महत्त्वाचे असून, त्याचा परिणाम झाला की, लोक सूचनांचे पालन करतील. सेवाकार्याच्या माध्यमातून सक्रिय राहणाऱ्या स्वयंसेवकांनी स्वत:चे आचरण शुद्ध ठेवून इतरांना सहकार्य करावे. केवळ सेवाकार्य हेच संघकार्य, असे गृहीत धरू नका. शासनाच्या सूचनांचे पालन करूनच समाजकार्यात सहभागी व्हा. आपल्या सेवावृत्तीचे कौतुक समाजाकडून होत असून, लॉकडाउन आहे तोपर्यंत सेवाकार्य चालू ठेवायचे असल्याचे डॉ. मोहन भागवत म्हणाले. यूट्यूबवर व फेसबुकवर बौद्धिकवर्ग ऐकणाऱ्यांची संख्या लाखांच्या घरात होती. संचालन नागपूर महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. 

एका समाजाला दोषी धरणे चुकीचे 
कोरोनाच्या प्रादुर्भावासाठी एका विशिष्ट समाजाला गृहीत धरल्या जात आहे. मात्र, काहींच्या चुकीमुळे संपूर्ण समाजाला दोषी धरणे चुकीचे ठरणार असल्याचे सरसंघचालक म्हणाले. 

पालघर घडणे अपेक्षित नव्हते 
पालघर घटनेतील साधूंच्या हत्येसंदर्भात शासनाच्या व पोलिसांच्या वागणुकीवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित करत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाष्य केले. भारत 130 कोटी लोकसंख्येचा देश असून, सर्वच भारतीय भारतमातेचे पुत्र आहेत, हे प्रत्येकाने स्वत:च्या हृदयात ठेवले पाहजे. दोन्ही बाजूच्या लोकांनी कोणतेही वैमनस्य न ठेवता जबाबदारीने स्वत:चे रक्षण करावे. असे घडणे अपेक्षित नव्हते, असे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com