esakal | ‘चलता हैं चलन दो’ : ग्रामीण रुग्णालयाला पेलवेना रुग्णसेवेचा भार
sakal

बोलून बातमी शोधा

‘चलता हैं चलने दो’ : ग्रामीण रुग्णालयाला पेलवेना रुग्णसेवेचा भार

‘चलता हैं चलने दो’ : ग्रामीण रुग्णालयाला पेलवेना रुग्णसेवेचा भार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका म्हणून चामोर्शीची ओळख आहे. राजकीयदृष्ट्या हा तालुका महत्त्वाचा मानला जातो. चामोर्शी तालुक्याने जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती अशी अनेक पदे भूषवली आहेत. विद्यमान आमदारसुद्धा चामोर्शीचे आहेत. लोकसंख्या, आरोग्य संस्थांमधील अंतर आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या मागण्या हे निकष विचारात घेऊन चामोर्शीतील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयात परावर्तित करण्यास आठ वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली. मात्र शासन, लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे मंजुरीपुढे रुग्णालयाचे काहीच झाले नाही. (Rural-Hospital-Lack-of-facilities-The-indifference-of-the-people's-representatives-Gadchiroli-District-nad86)

ग्रामीण रुग्णालयाय रक्तपेढी, आयसीयू या साध्या सुविधा नसल्याने ऐनवेळी रुग्णाच्या नातेवाईकांना प्रचंड धावपळ करावी लागते. बरेचदा उपचाराला विलंब झाल्यास जीवावरही बेतते. परंतु, प्रशासन, लोकप्रतिनिधींचे ‘चलता हैं चलने दो’ असेच काही सुरू आहे. उपजिल्हा रुग्णालयाचा प्रस्ताव आठ वर्षांपासून थंडबस्त्यात असल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे. गडचिरोली जिल्ह्यात कोरोनाचा प्रादूर्भाव कमी असला तरी, आयसीयूसाठी नातेवाईकांचा प्रचंड धावपळ करावी लागली. विद्यमान आमदार स्वतः चामोर्शीचे आहेत. त्यामुळे त्यांच्यासह इतरही स्थानिक लोकप्रतिनिधींनी आरोग्याच्या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष देऊन एकदाचा हा विषय मार्गी लावावा.

हेही वाचा: सत्तांतरानंतर प्रश्न रखडला; पाच एव्हरेस्टवीर नोकरीच्या प्रतीक्षेत

१९९१ च्या जनगणनेनुसार १९९७ मध्ये आरोग्य संस्थेचा बृहत आराखडा स्थापन करण्यात आला. सार्वजनिक आरोग्य विभागाने १७ जानेवारी २०१३ रोजी चामोर्शी येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्याकरिता मंजुरी दिली. त्यानुसार गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सकांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यांना पत्राद्वारे कळवून चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वाढीव खाटांच्या बांधकामाकरिता इमारतीचे आराखडे व अंदाजपत्रक वाढविण्याची विनंती केली होती. त्यानंतर गडचिरोली सामान्य रुग्णालयातील जिल्हा शल्यचिकित्सकांनी १ डिसेंबर २०१५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग गडचिरोली व अल्लापल्ली आणि सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प सिरोंचा यांनाही कळवून आराखडा व अंदाजपत्रक प्रस्ताव पाठविण्यास सांगितले होते.

आठ वर्षांपासून चालढकल

आठ वर्षांचा कालावधी लोटूनही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग न आल्याने गडचिरोलीच्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक दोन यांच्या एक आॅगस्ट २०१६ च्या पत्रान्वये नागपूर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या उपमुख्य अधिकाऱ्यांना कळवून ग्रामीण रुग्णालयाचा आराखडा, नकाशे तयार करून पाठविण्यास सांगितले. यावरून हे विभाग आरोग्याबाबत किती गंभीर आहेत, हे दिसून येते. आठ वर्षांच्या काळात ग्रामीण रुग्णालयात विविध पदभरती झाली असती तर येथील ग्रामीण रुग्णालयाला शासनाकडून उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला असता. म्हणजे आरोग्याच्या आवश्यक सोयी-सुविधा मिळाल्या असत्या. यामुळे आरोग्याच्या साध्या साध्या सुविधा मिळविण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागली नसती.

हेही वाचा: ...अन् बघता बघता गर्दीचाच झाला सिनेमा! उसळली बघ्यांची गर्दी

चामोर्शी उपजिल्हा रुग्णालय महाविकास आघाडी सरकार व अधिकाराची दप्तरदिरंगाई, शासनाची उदासीनता यामुळे रखडले आहे. त्यामुळे चामोर्शीवासीयांना रुग्णालयासाठी प्रतीक्षाच करावी लागली. भाजप सरकारच्या काळात चामोर्शी ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात रूपांतर करण्यास मंजुरी मिळाली. परंतु, सतत पाठपुरावा करूनही राज्यशासन तालुक्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या आरोग्याचा विचार करीत नसल्याने नागरिकांमध्ये असंतोष आहे. उपजिल्हा रुग्णालय तत्काळ मंजूर व्हावे, अशी स्थानिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. यासाठी मुंबई मंत्रालयात आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊ. चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा न मिळाल्यास आंदोलन उभारू.
- देवराव होळी, आमदार, गडचिरोली विधानसभा क्षेत्र
आरोग्याच्या मूलभूत सुविधांसाठी नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. कोरोना प्रादूर्भावाच्या वेळी रुग्णांना उपचारासाठी गडचिरोलीला भरती करावे लागत होते. आयसीयू बेड नसल्याने कोव्हिड रुग्णालय सुरू न झाल्याने अनेकांना दुसऱ्या जिल्ह्यात जाऊन उपचार करावे लागले. चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात एखाद्या रुग्णाला नेले असता डॉक्टरांअभावी त्यांना थेट गडचिरोलीला रेफर केले जाते. त्यामुळे चामोर्शीत उपजिल्हा रुग्णालय होणे गरजेचे आहे. त्यासाठी आम्ही चामोर्शी तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने विजय वडेट्टीवार यांना निवेदनाद्वारे माहिती देऊन याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करू.
- वैभव भिवापुरे, नगरसेवक, चामोर्शी

हेही वाचा: Business : रोजगार गेला; पण सुरू केला खेळण्यांचा व्यवसाय

चामोर्शी तालुक्याचे ठिकाण असून, जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. तालुक्यात ७५ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. येथे दररोज बाहेरगावाहून येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यादृष्टीने चामोर्शीत आरोग्यसेवा उत्तम प्रकारची असणे गरजेचे आहे. त्याकरिता ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात होणे गरजेचे आहे. ग्रामीण रुग्णालयाचे रूपांतर उपजिल्हा रुग्णालयात झाले तर येथील रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळेल. तसेच येथील तांत्रिक पद कायम असावे. रुग्णालयातील एक्सरे आणि इतर सुविधा दररोज सुरू असणे गरजेचे आहे. जेणेकरून बाहेरगावावरून येणाऱ्या रुग्णांना रोज हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही.
- अविनाश चौधरी, नगरसेवक चामोर्शी

(Rural-Hospital-Lack-of-facilities-The-indifference-of-the-people's-representatives-Gadchiroli-District-nad86)

loading image