चंद्रपुरातील विवाहितेची राजस्थानात विक्री

crime
crime

चंद्रपूर : चंद्रपुरातील इंदिरानगरातील एक महिला कामासाठी गोंदियाला गेली. कामावर असतानाच तिचा सौदा झाला. याची तिला तीळमात्र कल्पना नव्हती. एका युवतीसोबत सकाळच्या सुमारास नाश्‍ता केला. नाश्‍तातून तिला गुंगीचे औषध देण्यात आले. त्यानंतर तिची शुद्ध हरपली. याच अवस्थेत तिला राजस्थानात नेण्यात आले. आपली विक्री झाल्याचे तिला समजले. त्यानंतर खरेदीसाठी लागलेली रक्कम परत देण्याच्या अटीवर घरी फोन केला अन्‌ मानवी तस्करीचे बिंग फुटले.

याप्रकरणी राजस्थानातील दोन युवकांना रामनगर पोलिसांच्या विशेष पथकाने अटक केली आहे. पवन लोधा, तुफानसिंग भिल्ल (रा. झालावाडा, राजस्थान) अशी अटकेतील युवकांची नावे आहेत.

येथील इंदिरानगरातील एका विवाहितेची ही आपबिती आहे. कुटुंबाला आधार म्हणून ती मिळेल ते काम करायची.  कामानिमित्त ती काही दिवसांपूर्वी गोंदिया येथे गेली. काही दिवस सुरळीत काम सुरू होते. यादरम्यान मध्यप्रदेशातील भोपाळ येथील दोन युवक तिच्यावर पाळत ठेवून होते. तिला गुंगीचे औषध देऊन राजस्थानात विक्री करण्याची योजना या दोघांनी आखली. 

कामादरम्यान ही महिला एका युवतीसोबत नाश्‍ता करायला बाहेर गेली. त्यावेळी त्या महिलेला नाश्‍त्यातून गुंगीचे औषध देण्यात आले. नाश्‍ता करताच काही वेळात महिलेची शुद्ध हरपली. यानंतर या दोन युवकांनी चारचाकी वाहनाने तिला थेट राजस्थान येथे नेले. तेथे ठरल्याप्रमाणे पवन लोधा याने तिला एक लाख रुपयांत खरेदी केले. या कामात त्याला तुफानसिंग भिल्ल याने मदत केली. महिलेच्या विक्रीनंतर दोन्ही युवक रक्कम घेऊन मध्यप्रदेशात परत गेले.

राजस्थानातील कुमराज येथे पोहोचल्यानंतर या महिलेला आपली विक्री झाली असल्याचे समजले. मात्र, या महिलेने खरेदी करणाऱ्या पवन लोधा यांच्या मोर एक प्रस्ताव ठेवला. माझी सुटका करा. एक लाख रुपये कुटुंबीयांकडून परत देते, असे तिने सांगितले. लोधा यानेही तो प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर महिलेने कुटुंबीयांना सर्व घटनाक्रम कथन करीत आपली राजस्थानात विक्री झाल्याचे सांगितले. यानंतर कुटुंबीयांनी रामनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक पंचबुद्धे यांच्या नेतृत्त्वात पथक गठित करून तातडीने राजस्थानकडे रवाना झाले. फोन लोकेशन ट्रेस करीत पथक कुमराज येथे पोहोचले. तोपर्यंत पवन लोधा आणि तुफानसिंग भिल्ल या महिलेला घेऊन जंगलात पळाले. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानातील जावरा पोलिसांची मदत घेतली. सादला गावाजवळील जंगलात या महिलेला ताब्यात घेतले. दोन युवकांना अटक केली. त्यानंतर महिला आणि दोन युवकांसह पोलिसांचे पथक चंद्रपूरला पोहोचले. खरेदी करणाऱ्या युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.

मानवी तस्करीत झोपडपट्टी लक्ष्य

चंद्रपूर शहरात आजपर्यंत मानवी तस्करीच्या अनेक घटना घडल्या आहेत. झोपडपट्टी परिसरातील गरजू युवती, महिलांना आमीष दाखवून त्यांची विक्री केली जात आहे. यातील बहुतांश मुलींची राजस्थानात विक्री केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. बंगाली कॅम्प परिसरातील एका युवतीची दहा वर्षांत चारदा विक्री करून लग्न करण्यात आले. यातून तिला अपत्य झाले. मात्र, त्या मुलाचा बाप कोण हेसुद्धा त्या युवतीला माहित नव्हते. आता हा प्रकार उघडकीस आल्यानंतर चंद्रपुरात मानवी तस्करीचे जाळे अजूनही कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

संपादन ः राजेंद्र मारोटकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com