
आईला एचआयव्ही असल्याचे सांगून दहा दिवसांच्या बाळाची विक्री
चंद्रपूर : महिलेस एचआयव्ही (HIV) असल्याचे सांगितले. तिचे दहा दिवसांचे बाळ एनजीओला सांभाळण्यासाठी देत असल्याचे थाप देऊ विक्री (Sale of a ten day old baby) केली. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने सहा जणांना अटक केली. आरोपींत मीना राजू चौधरी (वय ३४, रा. श्यामनगर, चंद्रपूर), जाबीर रफीक शेख (वय ३२, रा. बल्लारपूर), अंजुम सलीम सय्यद (वय ४३, रा. भिवापूर वॉर्ड, चंद्रपूर), वनिता मुलचंद कावडे (वय ३९ रा. नागपूर), पूजा सुरेंद्र शाहू (वय २९, रा. नागपूर) आणि शालिनी गोपाल मोडक (वय ४८, रा. नागपूर) यांचा समावेश आहे.
येथील शासकीय रुग्णालयात महिलेने १३ जानेवारी रोजी एका बाळाला जन्म दिला. महिला जिल्हा रुग्णालयात असतानाच मीना चौधरी तिला नेहमी भेटायला येत होती. १५ जानेवारी रोजी महिलेस रुग्णालयातून सुटी मिळाली. तेव्हा मीना चौधरीने पीडित महिलेस बाळासह लोहारा येथील एका हॅाटेलात नेले. तिथे पीडित महिलेस ‘तुला एचआयव्ही (HIV) आहे, बाळाला तो होऊ शकतो’, अशी बतावणी केली. ‘नागपुरात लहान मुलांना सांभाळणारी एक एनजीओ आहे. मी त्यांना सोबत आणले. तू बाळ त्यांच्या ताब्यात दे’, असे मीना चौधरीने सांगितले.
हेही वाचा: ‘विवस्त्र डान्स’ प्रकरण : पोलिसांनी केली दहा जणांना अटक
पीडिताने भीतीपोटी आपले दहा दिवसांचे बाळ नागपूरहून आलेल्या तीन महिलांना दिले. त्यानंतर १८ जानेवारी रोजी मीना चौधरी पीडितेच्या घरी आली. तिने ४९ हजार रुपये दिले. याबाबत पीडित महिलेने विचारणा केली. त्यावर ‘बाळाला घेऊन गेलेल्या एनजीओने हे पैसे दिले’, असे मीना चौधरीने सांगितले. त्यामुळे पीडित महिलेस शंका आली.
तिने बाळाला भेटायचे आहे, असे सांगितले. त्यावर मीना चौधरीने उडवाउडवीची उत्तरे दिली. पीडिताने अपर पोलिस अधीक्षक कुळकर्णी यांच्याशी संपर्क (Baby Sale) केला. त्यांना संपूर्ण घटना सांगितली. यावरून रामनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य बघता स्थानिक गुन्हे शाखेकडे प्रकरण सोपविण्यात आले.
हेही वाचा: नवनीत राणांनी केले आक्षेपार्ह संभाषण; महिला आयोगाने बजावली नोटीस
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तपासासाठी पोलिस उपनिरीक्षक कापडे यांच्यासह पथक रवाना केले. पथकाने मीना राजू चौधरी हिला ताब्यात घेतले. तिची चौकशी केली. त्यात तिने जाबिर रफीक शेख, अंजुम सलीम सय्यद यांच्या मदतीने नागपुरातील वनिता कावडे, पूजा साहू, शालिनी मोडक यांना नवजात बाळ २ लाख ७५ हजार रुपयांत विकल्याचे कबूल केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नागपूर गाठत तिन्ही महिलांना ताब्यात घेतले. त्यांनी बाळ चंद्रपुरातील स्मिता मानकर यांना दिल्याचे तपासात समोर आले.
त्यानंतर त्या महिलेचा पत्ता काढण्यात आला. तिच्याकडे नवजात बाळ सुखरूप असल्याचे दिसून आले. नवजात बालकास ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीकरिता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलिस अधीक्षक अतुल कुळकर्णी यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे, सहायक पोलिस निरीक्षक बोबडे, उपनिरीक्षक कापडे यांच्यासह पथकाने केली.
हेही वाचा: ‘असा झाला तथाकथित गावगुंड मोदी तयार’
आरोपी महिला स्टाफ नर्स
मीना चौधरी हिने बाळाला एनजीओकडे सांभाळाला देते, असे पीडित महिलेस सांगितले. त्यावरून पीडित महिलेने आपले बाळ एनजीओच्या असलेल्या तीन महिलांना दिले. त्यातील तीनपैकी दोन महिला या नागपुरातील रहिवासी आहे. त्या स्टाफ नर्स असल्याची माहिती आहे. त्यांनी चंद्रपुरातीलच एका महिलेस हे बाळ दिले होते. त्या महिलेकडून पोलिसांनी बाळ ताब्यात घेतले.
Web Title: Sale Of Ten Day Old Baby The Gang Was Arrested Crime News Chandrapur District
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..