यांच्या हस्ते स्विकारला खासदार संभाजीराजे यांनी मराठा विश्वभूषण पुरस्कार

sambhajiraje awarded by maratha vishvbhushan
sambhajiraje awarded by maratha vishvbhushan

सिंदखेडराजा जिजाऊ सृष्टी (जि.बुलडाणा) : मराठा सेवा संघाच्या वतीने देण्यात येणारा सर्वोच्च सन्मानाचा मराठा विश्वभूषण पुरस्कार 2020 छत्रपती शाहू महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांना जिजाऊसृष्टीवर सन्मानपूर्वक बहाल करण्यात आला. हा सन्मान समोर बसलेल्या लाखो जिजाऊ भक्तांमध्ये उपस्थित एका सामान्य शेतकर्‍याच्या हस्ते स्वीकारून राजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे सार्थ केले.


मराठा सेवा संघातर्फे आयोजित जिजाऊ सृष्टीवर जिजाऊ जन्मोत्सव निमित्त दरवर्षी महत्त्वपूर्ण पुरस्काराचे मोठ्या थाटात वितरण करण्यात येते मराठा सेवा संघाच्या विचाराने प्रेरित झालेल्या अनेक मान्यवरांना त्यांनी केलेल्या बहुजन हिताच्या कार्यासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. विविध क्षेत्रात आपल्या कार्याने समाजाला दिशा देणार्‍या पाच व्यक्तींना मराठा सेवा संघाच्या वतीने पुरस्कार देण्यात आले. यामध्ये सर्वोच्च सन्मानाचा मराठा विश्वभूषण पुरस्कार छत्रपतींचे वंशज खासदार संभाजीराजे भोसले यांना देण्यात आला. व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर याप्रसंगी उभे राहिले असताना समोर बसलेल्या जिजाऊ भक्तांपैकी एका सामान्य शेतकर्‍याच्या हस्ते मला पुरस्कार स्वीकारायचे आहे, असे मनोगत संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केले. आयोजका मार्फत याबाबत सूचना करण्यात आली. त्यावेळी सदाशिव पाटील या ज्येष्ठ शेतकर्‍याने व्यासपीठाकडे धाव घेतली आणि मोठ्या थाटात संभाजीराजे यांना पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी मराठा क्रीडा भूषण पुरस्कार शिवमती ऋतुजा भोसले यांना, मराठा कला भूषण पुरस्कार सिनेअभिनेत्री प्रणाली घोगरे, मराठा कृषिभूषण पुरस्कार जालना येथील शेतकरी पांडुरंग डोंगरे यांना, तर मराठा भूषण जिजाऊ पुरस्कार कौन बनेगा करोडपती मध्ये करोडपती बनलेल्या बबिताताई ताडे यांना देण्यात आले. पुरस्कार वितरण सोहळ्यादरम्यान सिनेअभिनेता सयाजी शिंदे यांच्या फास या चित्रपटाच्या तैल चित्राचे आणि गाण्याचे अनावरण करण्यात आले. याचबरोबर मराठा सेवा संघ प्रकाशित शिवधर्मगाथा या पुस्तकाचे इंग्रजी भाषेत अनुवाद प्रकाशनासह शिवधर्म इंग्रजी दिनदर्शिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com