वाळू तस्करी रोखणा-या वनरक्षकावरच वाळू माफीयांनी ओतले पेट्राेल आणि...

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 20 May 2020

वर्धा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक मंगेश लिंगगुराम सज्जन आणि माधव सदाशिव माने या दोघांवर काही वाळू माफियांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीनंतर त्यांच्या अंगावर द्रव टाकून त्यांना जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला.

वर्धा : जिल्ह्यात वाळू माफीयांनी चांगलाच उधम माजविला आहे. यात वना नदीपात्रातून होत असलेल्या अवैध वाळू तस्करीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या वर्धा वनपरिक्षेत्रातील वनरक्षक मंगेश लिंगगुराम सज्जन आणि माधव सदाशिव माने या दोघांवर काही वाळू माफियांनी हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या मारहाणीनंतर त्यांच्या अंगावर द्रव टाकून त्यांना जाळण्याचाही प्रयत्न करण्यात आला. ही घटना बुधवारी (ता. २०) पहाटेच्या सुमारास कोल्ही (सास्ती) मार्गावर घडली.
जखमी अवस्थेतही  सज्जन यांनी या वाळू माफीयांना पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंगावर पेट्रोल टाकणा-याच्या शर्टच्या दोन बटन आणि बनियानचा काही भाग हातात आल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. शिवाय त्यांच्यावर हल्ला करणा-यांना त्यांनी ओळखले असून त्यांची नावेही पोलिसांना दिली आहेत. यात बालु कुबडे, नितीन वाघ या दोघांसह आणखी दोन व्यक्ती असल्याचे त्यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत नमुद आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलिस सूत्रानुसार, वर्धा वनपरिक्षेत्रातील पोहणा बिटातील वनरक्षक मंगेश सज्जन रा. वर्धा हे कर्तव्यावर असताना त्यांना माहिती मिळाली   की वना नदीतून अवैधरित्या वाळूचा उपसा करून त्याचा साठा वनक्षेत्रातील झुडपी क्षेत्रात करण्यात येत आहे. माहिती मिळताच सहकारी वनरक्षक माधव सदाशिव माने यांना घेऊन ते संबंधित स्थळाकडे निघाले. दुचाकीने गस्त करीत असताना नांद्रा शिवारातील झुडपी जंगल परिसरात पोहोचले. यावेळी ब-याच प्रमाणात वाळूसाठा येथे असल्याचे दिसून आले. या वाळूसाठ्याजवळ  वाहनांच्या चाकाचे निशाणही दिसले. त्या निशाणांनुसार पाठलाग करताना खेकडी ते धानोरा या डांबरी मार्गावर एका निळ्या रंगाच्या वाहनाने त्यांचा रस्ता अडविला. या वाहनाच्या बाजुला बालू कुकडे आणि त्याच्यासोबत अन्य एक व्यक्ती उभी होती. त्यांनी या दोघांना पकडण्याचा प्रयत्न केला असता दोघेही खेकडी गावाच्या दिशेने पळाले.
येथून समोर गेल्यावर  दुस-या चंदेरी रंगाच्या वाहनाने त्यांचा पाठलाग केला. या वाहनापासून बचाव करीत त्यांनी कोल्ही (सास्ती) या गावाच्या पांदण रस्याने जाण्याचा प्रयत्न केला. यात वाहनाने  सज्जन यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. या वाहनात नितीन वाघ होता. दोघेही खाली पडताच वाघ याने डबकीत असलेले द्रव त्यांच्या अंगावर टाकले. या द्रवाला पेट्रोल आणि केरोसिनचा वास येत होता. अशातही  सज्जन यांनी नितीन वाघ याला पकडण्याचा प्रयत्न केला. यावेळी केलेल्या आरडाओरडीने घाबरून  नितीन वाघ आलेल्या गाडीने परत पळाला, असे  सज्जन यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. यातीला आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नसल्याची माहिती आहे. 

सविस्तर वाचा - सुन्न करणारी बातमी, उपासमार असह्य झाल्याने दिव्यांग व्यक्तीची मंदिरात आत्महत्या
तत्काळ अटक करावी
वाळू माफीयांकडून झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाली. या संदर्भात पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. या आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक करावी.
 सुनील शर्मा
उपवनसंरक्षक, वर्धा 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sand smugglers pour petrol on foresst guard