
जिल्ह्यातील 534 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली. 18 ला मतमोजणी नंतर निवडून आलेल्या बहुतांश सदस्यांना आतापासूनच सरपंचपदाचे स्वप्न पडू लागले आहे.
अमरावती : ग्रामीण भागात रणधुमाळी उडवून देणाऱ्या ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया पार पाडल्यानंतर आता सर्वांनाच वेध लागले आहे ते सरपंचपदाचे. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरक्षणाच्या सोडतीची तारीख निश्चित केली जाणार आहे. त्यामुळे सदस्यांसह त्यांच्या समर्थकांना आणखी किमान आठवडाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा - पुलगावरून नागपूरला निघाले कुटुंब, पण वाटेतच मायबापांसह नवऱ्यावर काळाचा घाला
जिल्ह्यातील 534 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला पार पडली. 18 ला मतमोजणी नंतर निवडून आलेल्या बहुतांश सदस्यांना आतापासूनच सरपंचपदाचे स्वप्न पडू लागले आहे. त्यादृष्टीने अनेकांनी लॉबिंग सुरू केले असले तरी सरपंचपदाचे आरक्षण कोणत्या संवर्गासाठी राहणार यावरच सर्वकाही अवलंबून असणार आहे. मतमोजणीनंतर सर्वांना सरपंच आरक्षणाची प्रतीक्षा होती. त्यादृष्टीने 25 जानेवारीला प्रशासनाकडून तारीख जाहीर करण्यात येणार होती. मात्र, काही कारणास्तव ही तारीख जाहीर होऊ शकली नाही. आता फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आरक्षणाची तारीख जाहीर केली जाऊ शकते. तसे संकेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले.
हेही वाचा - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन
अपक्षांनाही मिळणार संधी -
केवळ पक्ष तसेच स्थानिक आघाड्याच नव्हे तर अपक्ष म्हणून निवडून आलेल्यांनाही सरपंचपदाची संधी मिळू शकते. कारण एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये आघाडीकडे आरक्षणानुसार उमेदवार उपलब्ध झाला नाही तर आपोआपच अपक्षांच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडू शकते. असे गणित लक्षात घेता अपक्षांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे.