विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत; ग्रामीण भागातील शाळांसमोर समस्यांचे डोंगर; आर्थिक तरतूदीची बोंब

पंकज सपाटे 
Saturday, 21 November 2020

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा, शाळेतील वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हॅण्डवॉश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवावे,

वरठी ( जि. भंडारा ): राज्यातील इयत्ता नऊवी ते 12 वी पर्यंतच्या शाळा 23 तारखेपासून सुरू होण्याची शक्‍यता असून त्यासाठी शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. मात्र, ग्रामीण भागातील शाळांना आर्थिक व इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शिक्षक व पालकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

शाळा सुरू झाल्यानंतर शाळेचा परिसर दररोज नियमितपणे स्वच्छ केला जावा, शाळेतील वर्गखोल्या, नेहमी स्पर्श होणारे भाग, अध्ययन साहित्य, डेस्क वारंवार निर्जंतुक कराव्यात. हात धुण्याच्या ठिकाणी साबण, हॅण्डवॉश, स्वच्छतेसाठी पाण्याची व्यवस्था, अल्कोहोलमिश्रित सॅनिटायझर सर्व महत्त्वाच्या ठिकाणी ठेवावे, स्वच्छतागृहे वारंवार निर्जंतुक करावीत. विद्यार्थी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची दररोज थर्मल स्कॅनिंग करावे आदी अनेक अटी घालण्यात आलेल्या आहेत. 

अधिक वाचा - ही दोस्ती तुटायची नाय : दुर्धर आजाराने ग्रस्त मित्राच्या उपचारासाठी गोळा केला साडेपाच लाखांचा निधी

शाळा, वर्ग दररोज सॅनिटायझिंग करणे, स्वच्छता पुरविणे तसेच इतर साहित्य खर्चिक आहेत. मात्र, शाळांना आता वेतनेतर अनुदान मिळत नाही. त्यामुळे हा खर्च कोठून करायचा तसेच गेल्या कित्येक वर्षापासून चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती बंद आहे. त्यामुळे शाळेत शिपाई संख्या खुप कमी आहे. त्यामुळे ही सॅनिटायझिंग, स्वच्छतेची काळजी रोज कशी करणार अशा अनेक समस्या शाळांपुढे आहेत.

शिक्षकांना कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना अट नाही. त्यामुळे वेगवेगळ्या भागांतून ग्रामीण भागातील विद्यार्थी शाळेत येतात. त्यामुळे त्यामध्ये एखादा पॉझिटिव्ह असल्या मोठी समस्या निर्माण होऊ शकते. तसेच शिक्षकांच्या कोरोना चाचणीबाबत आरोग्य विभागाकडे पुरेशी सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे कित्येक शिक्षक अजून चाचण्या करू शकले नाहीत. यासारख्या बऱ्याच समस्या शाळांसमोर आहेत. यातही शिक्षण विभाग व प्रशासन कोणताही स्पष्ट आदेश न देता शाळा व्यवस्थापन समित्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवत आहे.

जाणून घ्या -थरारक घटनाक्रम : मध्यरात्री घरात शिरले दरोडेखोर; बापलेकावर हल्ला केल्यानंतर शस्‍त्र टाकून काढला पळ

शाळा सुरू करताना अनेक आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी होणे गरजेचे आहे. तसेच सॅनिटायझर व इतर सुविधा सरकारकडून पुरविल्या जाव्यात. तसेच पालकांशी संपर्क साधला असता, बरेच पालक आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास तयार नाहीत. कारण वाहतूक व्यवस्था इतर समस्या आहे . त्यामुळे सर्व व्यवस्था शासनाने कराव्यात, अशी मागणी आहे.
- मुकुंद ठवकर
शिक्षक, जिल्हा परिषद शाळा वरठी  

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Schools in rural areas having problem due to less financial support