क्या बात है!  आता घरीच करा भाजीपाल्याची लागवड; बाजारात विक्रीस आले भाजीपाला बियाणे..वाचा सविस्तर 

Seeds of fresh vegetables sold by sellers in market
Seeds of fresh vegetables sold by sellers in market
Updated on

गडचिरोली: सध्या बाजारात येणारा भाजीपाला रासायनिक खते देऊन रासायनिक विषारी कीटकनाशकांची फवारणी करून पिकवला जातो. त्यामुळे गडचिरोलीसारख्या जिल्ह्यातील नागरिकांचा ओढा पूर्वीपासूनच स्वनिर्मित भाजीपाल्याकडे आहे. त्यांना यासाठी मदत व्हावी म्हणून पावसाळ्यात बाजारात भाजीपाल्याचे बियाणे विक्रीस आले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अनेकजण आपल्या घराच्या परिसरातील सांदीत, अंगणात, परसात भाजीपाला लावतात. ग्राहकांची ही गरज लक्षात घेत बरेच विक्रेते कृषी केंद्रातून बियाण्यांची पाकिटे खरेदी करून त्याची छोटी पाकिटे तयार करून विकतात. एक पाकीट दहा रुपयांचे असते. यात भोपळे, दुधी, पालक, मका, कारले, मेथी, वांगे, टोमॅटो, चवळी, राजगिरा, मिरची अशा अनेक भाज्यांचे बियाणे असतात. 

पावसाळ्यात करतात भोपळ्याची लागवड 

या बियाण्यांचा वापर करून नागरिक घरीच भाज्यांची लागवड करतात. त्यातही भोपळे, दुधी, कारले, अशा वेलवर्गीय वनस्पतींना तसेच वांगे, टोमॅटो, मिरची, अशा दैनंदिन उपयोगी भाज्यांना अधिक पसंती देण्यात येते. हिवाळ्याची चाहूल लागत असताना साधरणत: नवरात्र, दसरा, दिवाळी या सणाला अनेक गोड पदार्थ केले जातात. त्यातही भोपळ्याची गोड भजी हा अनेकांचा आवडता पदार्थ असतो. त्यामुळे अनेकजण पावसाळ्यात भोपळ्याची लागवड करतात. दिवाळीपर्यंत मोठे भोपळे भाजी आणि भजी या दोन्हीसाठी मिळतात. 

भाजीपाला उगवणे या बियाण्यांमुळे शक्‍य

दुधी भोपळ्याचे वडे झाडीपट्टीत अतिशय आवडीने खाल्ले जातात. या वड्यांसाठीही पावसाळ्यात बिया जमिनीत रुजवतात. याशिवाय इतर भाज्यांचीही सोय होतेच. ज्यांच्याकडे मोठे अंगण, परसबाग किंवा सांद असेल ते मकासुद्धा आवडीने लावतात. एकूणच घरचा सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला हिरवा भाजीपाला उगवणे या बियाण्यांमुळे शक्‍य होते.

रोपसुद्धा उपलब्ध

काही नागरिक भाज्यांच्या बाबतीत अधिकच अधीर असतात. त्यांना बियाणे रुजवून रोप उगवेपर्यंत धीर धरता येत नाही. अशा ग्राहकांसाठी बाजारात भाज्यांची रोपेसुद्धा असतात. वांगे, टोमॅटो, मिरची अशा भाज्यांची रोपे विक्रीस ठेवलेली असतात. ही रोपे अगदी कुंडीसुद्धा लावून भाज्या उगवता येतात. जिल्ह्यातील बंगाली विक्रेते ही रोपे विक्रीस आणत असतात.

संपादन - अथर्व महांकाळ 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com