ज्येष्ठ गांधीवादी, सर्वोदयी नेते बाळासाहेब सरोदे यांचे निधन

Balasaheb Sorode
Balasaheb Sorode

यवतमाळ : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत सुहास ऊर्फ बाळासाहेब आनंदराव सरोदे यांचे गुरुवारी (ता.16) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी (ता.17) निघणार आहे. प्रसिद्ध मानवाधिकार कार्यकर्ते ऍड. असीम सरोदे यांचे ते वडील होत.

आयुष्यभर त्यांनी महात्मा गांधी यांच्या विचारानुसार जीवनप्रवास केला. आपल्या 60 वर्षांच्या सामाजिक कारकिर्दीत डॉ. सरोदे यांनी शैक्षणिक क्षेत्रात विशेष योगदान दिले. गांधी-विनोबा यांचा आदर्श पुढे ठेवत त्यांनी जीवनभर नवा समाज घडविण्यासाठी धडपड केली. नवसमाज व सहयोगी या संस्थांची उभारणी करून "बालहक्क, शिक्षणाचा अधिकार, महिला सक्षमीकरण, कायद्याचा वापर, कौटुंबिक हिंसाचार, योग, व्यायाम, सहजीवन, पालकत्व' अशा विविध विषयांना वाचा फोडली. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा व मुलींसाठी त्यांनी जगण्याची नवीन द्वारे खुली केली.

स्वातंत्र्य व स्वातंत्र्यानंतरच्या काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी सर्वोदय चळवळ सुरू केली. विनोबा भावे यांनी भूदान चळवळ व निसर्गोपचार पद्धत सुरू केली. साने गुरुजी यांनी आंतरभारती व आचार्यकुलाची स्थापना केली. या सर्वांमध्ये गांधी विचार हा समान धागा होता. या सर्व चळवळीत बाळासाहेब सरोदे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी अनेक चळवळी गाजविल्या. विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सरोदे यांनी स्वत:च्या मालकीची 100 एकर जमीन दान दिली. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेताना आणीबाणीच्या व लोकशाही दडपण्याच्या विरोधात दिल्लीत सत्याग्रह केल्यामुळे तिहार सेंट्रल जेलमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली होती. त्यांच्या पश्‍चात पत्नी मंगला, ऍड. असीम, अमित व ऍड. स्मिता असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com