शाळेला सुट्टी असल्याने ती बालिका एकटीच होती घरी...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

आई वडील कामाला गेल्याने इयत्ता दुसरीत शिकणारी बालिका ही एकटीच घरी होती. कवडू तिच्या घरी गेला व बालिकेला पिण्यासाठी पाणी मागितले बालिकेने पाणी देताच आरोपीने तिला उचलून बाथरूममध्ये नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिथून पळ काढला

वणी : सात वर्षीय मुलगी घरी एकटीच असल्याचे पाहून गावातीलच गवंडी काम करणाऱ्या 39 वर्षीय इसमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना तालुक्‍यातील नायगाव ( बु) येथे घडली असून शिरपूर पोलिसांनी आरोपीला तात्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
कवडू दौलत बोबडे वय 39 असे आरोपीचे नाव आहे. तो गवंडी काम करतो. दि. 18 मार्चला दुपारी 12 वाजताचे सुमारास बालिकेच्या घराजवळ तो मिस्त्रीचे काम करीत होता. कोरोनाच्या प्रभावाने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे व तिचे आई वडील कामाला गेल्याने इयत्ता दुसरीत शिकणारी बालिका ही एकटीच घरी होती. कवडू तिच्या घरी गेला व बालिकेला पिण्यासाठी पाणी मागितले बालिकेने पाणी देताच आरोपीने तिला उचलून बाथरूममध्ये नेले. तिच्यावर लैंगिक अत्याचार केला व तिथून पळ काढला सायंकाळी पीडित बालिकेचे वडील घरी आले असता बालिकेने पोट दुखत असल्याचे सांगितल्याने तिच्या आई वडिलांनी तिला घुगूस येथील डॉक्‍टरकडे नेले तिथल्या डॉक्‍टरने तिच्या आई वडिलांना बालिकेला चंद्रपूर येथे घेऊन जाण्यास सांगितल्याने ते चंद्रपूर येथे गेले असता तेथील डॉक्‍टरांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी याबाबत शिरपूर पोलिसांना सूचना दिल्या. बालिकेला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने झालेल्या अत्याचाराची माहिती दिली.

सविस्तर वाचा - किलोभर पीठ, किलोभर तांदुळ घेतले उधारीवर, कोरोनामुळे हातातोंडाची भेट कठीण

ठाणेदार अनिल राऊत यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून पो.नि. ढवळे , जमादार सुगत दिवेकर, प्रमोद जुनूनकर, संजय खांडेकर, अनिल सुरपाम, योगेश ढाले यांच्या पथकासह नायगाव गाठले व आरोपीला बेड्या ठोकल्या व त्याच्यावर अत्याचारासह बाल लैंगिक अत्याचार अन्वये गुन्हा दाखल केला आहे.  

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: She was alone in home...