
अचलपूर (जि. अमरावती) : असह्य आणि निराश्रित यांना सुसह्य जीवन जगता यावे म्हणून शासनाने दीनदयाल राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या सामाजिक योजनेची सुरुवात केली. नगरपालिकेच्या सौजन्याने सुरू करण्यात आलेली ही योजना मात्र बेघरांच्या नावाने पैसे उकळण्याचे ठिकाण बनल्याची धक्कादायक स्थिती आहे. परिणामी रस्त्याच्या कडेला रात्र काढणाऱ्यांच्या नशिबी दैनाच असल्याचे दिसून येत आहे.
वर्षानुवर्षे संसारापासून दूर लोटल्या गेल्याने रस्त्याच्या कडेला उघड्यावर जीवन जगणाऱ्यांसाठी राहण्याची, जेवणाची आणि आरोग्यबाबतही सुविधा उपलब्ध करून देत शासनाने नवा आदर्श निर्माण केला. नगरपालिका प्रशासनाने सुरुवातीला शहरातील आठवडी बाजारच्या परिसरात बेघरांचा निवाऱ्याची व्यवस्था केली होती. त्यानंतर आता हा निवारा पंचायत समिती परिसरात थाटण्यात आला. शहरातील बेघर असलेले महिला व पुरुषांना या निवाऱ्यात आणण्याची व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी पालिकेच्या वतीने सुरुवातीला एका खासगी संस्थेकडे सोपविली होती. त्यानंतर आता ती जबाबदारी अमरावती येथील संस्थेकडे देण्यात आली. सुरुवातीपासूनच या बेघर निवाऱ्याचा फायदा बेघरांना झाला नाही. उलट ज्याच्यावर ही जबाबदारी दिली होती त्यांनाच अधिक लाभ झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे आजही या निवाऱ्याचा कोणताही लाभ रस्त्याच्या कडेला झोपणाऱ्यांना होताना दिसून येत नाही. कोरोनाच्या संकटात शहरातील विविध भागांत रस्त्यावर झोपलेले महिला-पुरुष आढळून येतात. त्यामुळे हा निवारा केवळ नावालाच उरला असल्याचे बोलले जात आहे. याकडे नगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात उघड्यावर जीवन जगणाऱ्यांच्या डोक्यावर हक्काचे छत मिळावे आणि पोटभर जेवण मिळावे, अशा सामाजिक दायित्वातून नगरपालिकेने बेघरांसाठी निवारा सुरू करून त्यांना जगण्याचा आधार दिला खरा, मात्र हा आधारही नावालाच उरला आहे. याकडे नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांनी जातीने लक्ष देऊन फुटपाथवर रात्र काढणारे सर्व बेघर असलेले व्यक्ती निवाऱ्यात कसे पोहोचतील, याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.
शहरात बेघर व्यक्तींना रात्रीला हक्काचे छत मिळावे म्हणून शासनाने नगरपालिकेच्या माध्यमातून हा निवारा सुरू केला. त्यामुळे या निवाऱ्याचा लाभ बेघरांना मिळणे आवश्यक आहे. याबाबत सविस्तर माहिती घेऊन एकही बेघर व्यक्ती शहरात रस्त्याच्या कडेला झोपणार नाही यासाठी निवाऱ्याची जबाबदारी दिलेल्या संस्थेला कडक आदेश देण्यात येणार आहेत.
-राजेंद्र फातले, मुख्याधिकारी, अचलपूर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.