'घड्याळ'ला 'वाघ' देणार बळ

राजेश प्रायकर
Tuesday, 24 December 2019

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस नागपुरात मुक्कामी होते. त्यांनी येथील पदाधिकारी, काही जुन्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. यापूर्वी राज्यात सत्तानाट्य सुरू असताना शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आले होते.

नागपूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील पक्ष, अशी टीका होत असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने आता विदर्भातही पाय रोवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. विदर्भात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनीच पुढाकार घेतल्याचे चित्र काही दिवसांत स्पष्ट झाले. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत विदर्भासाठी केलेल्या घोषणातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राष्ट्रवादीसाठी वातावरणनिर्मिती केल्याचे दिसून येत आहे. 

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस नागपुरात मुक्कामी होते. त्यांनी येथील पदाधिकारी, काही जुन्या पदाधिकाऱ्यांसोबतही चर्चा केली. यापूर्वी राज्यात सत्तानाट्य सुरू असताना शरद पवार दोन दिवस विदर्भ दौऱ्यावर आले होते. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसोबत त्यांनी भेट घेतली. त्यांचे सांत्वन केले. विधानसभा निवडणुकीत भाजपची झालेली पिछेहाट बघता पवारांनी विदर्भात संधी शोधण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे. सध्या विदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहा आमदार असून, यात वाढ करण्यासाठी काही जुन्या लोकांनाही ते पक्षात परत आणणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. 

सविस्तर वाचा - किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌...

नुकतीच नागपुरात अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विदर्भात पाय घट्ट रोवण्याचे संकेत दिले. त्यात विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाला प्राधान्यक्रम दिल्याने राष्ट्रवादीसाठी चांगलीच वातावरणनिर्मिती झाल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. गेल्या काही महिन्यांत शरद पवारांचे विदर्भ दौरे व मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात विदर्भाबाबत केलेल्या घोषणांवरून राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीसाठी पायाभरणीची चर्चा सुरू झाली आहे. 
भातशेती मिशन 

उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील विकासाला चालना देण्यासाठी जमशेदपूर-भिलाईप्रमाणे मोठा स्टील प्लांट या भागात उभारण्यात येईल, अशी घोषणा केली. येथील खनिजसंपत्तीतून रोजगारनिर्मितीवर त्यांनी भर दिला. शेतकरी व शेती नेहमीच पवारांच्या प्राधान्यक्रमावर आहे. उद्धव ठाकरे यांनी विदर्भातील धान उत्पादकांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला.

क्लिक करा - सीसीटीव्हीत कैद झाली ही अनोखी चोरी... एकदा बघाच  : Video

गोंदिया, भंडारा, गडचिरोली आणि चंद्रपूर या विदर्भातील चार जिल्ह्यांत भातशेती वाढविण्यासाठी आणि ब्राउन राइस उद्योगाला विकसित करण्यासाठी भातशेती मिशन राबवून कृषी प्रक्रिया उद्योगसुद्धा मोठ्या प्रमाणावर वाढविण्याच्या दृष्टीने ठाकरे यांचे भाषण महत्त्वपूर्ण मानले जात आहे. विदर्भातील सिंचनाचा अनुशेष भरून काढणे, कुपोषण दूर करणे, लोणार सरोवराच्या संवर्धन आणि परिसरासह विदर्भात पर्यटन विकासावर भर आदीतून शरद पवार यांचे "व्हिजन' दिसून येत आहे. 

उपराजधानीनंतर थेट राजधानीतील मुख्यमंत्री

गेली पाच वर्षे उपराजधानीतील देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यांची सत्ता जाताच राजधानी मुंबईतील उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यामुळे विदर्भाकडे दुर्लक्ष होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी विदर्भ माझे आजोळ असून, विदर्भावर अन्याय करणार नसल्याचे नमूद केलेच; शिवाय मिहानला बूस्ट देण्याची घोषणा करीत नागपूरही विकासाच्या एजेंड्यावर असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will help NCP