अकोल्यात शेतकऱ्यांची 'कॅशकोंडी'; शिवसेनेचे ठिय्या आंदोलन

योगेश फरपट
बुधवार, 17 मे 2017

अकोला - शेतकऱ्यांची पैशासाठी होत असलेली "कॅशकोंडी' दूर करण्यासाठी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात शिवसेनेने आज (बुधवार) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शाखाधिकाऱ्याला देण्यात आला आहे.

अकोला - शेतकऱ्यांची पैशासाठी होत असलेली "कॅशकोंडी' दूर करण्यासाठी येथील स्टेट बँक ऑफ इंडियात शिवसेनेने आज (बुधवार) ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. एटीएममध्ये पैसे उपलब्ध करून द्या, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही शाखाधिकाऱ्याला देण्यात आला आहे.

नोटाबंदीला सहा महिने पूर्ण झाले आहेत. मात्र अद्यापही "कॅशकोंडी' सुरूच आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रासली आहे. ज्या शेतकऱ्यांनी 31 मार्चपूर्वी पीककर्जाची परतफेड केली, त्यांनाच नव्याने कर्ज मंजूर करीत रकम खात्यात जमा करण्यात आली आहे. मात्र पीककर्जाची रकम एटीएमद्वारेच काढण्याचे बंधन टाकण्यात आले. बऱ्याच शेतकऱ्यांकडे एटीएम नाहीत, ज्यांच्याकडे आहे ते शेतकरी एटीएमवर गेले तर त्यांना पैसे मिळत नाहीत. बियाणे, खते खरेदीचे ठीक आहे, पण मशागतीसह इतर कामांसाठी पैसा कोठून आणायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आ वासून उभा आहे. काळ्या फणे वेचणे, कुंदा खणणे, धुरे बंधारे वावरातल्या नाल्या, विहिरीचा गाळ काढणे, ट्रॅक्‍टरची मजुरी, जनावरांचे खाद्य, किराणा बाजार, जनावर खरेदी, आरसे फणी, डाबले यासारख्या खरेदीसाठी कोणते पेटीएम, भीम ऍप वापरावे असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यासमोर एटीएमशिवाय पर्याय नाही. मात्र एटीएममध्ये ठणठणाट असल्याने शेतकरी पैसा असूनही अर्थसंकटात सापडला आहे. काहीही करा, पण जिल्ह्यातील समस्त एटीएममध्ये पुरेसा पैसा उपलब्ध करून द्या, अशी मागणी शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन देशमुख यांनी केली आहे.

देशमुख यांच्यासह शिवसेनेचे प्रदीप गुरुखुद्दे, गोपाल दातकर यांच्यासह अन्य शिवसैनिकांनी बँक शाखाधिकाऱ्याला शेतकऱ्यांच्या समस्यांची जाणीव करून दिली. जर दोन दिवसात एटीएममध्ये पैसा उपलब्ध झाला नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, यास बँक प्रशासन जबाबदार राहिल असा इशारा देण्यात आला.

Web Title: Shivsena agiation for farmers demand