धक्कादायक! त्याला आला पत्नीच्या चारित्र्यावर संशय अन् पतीने मध्यरात्रीच वायरच्या साहाय्याने...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 मे 2020

गावात भावकीतील एका घरात नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे पार्वती सोळंकी तिथे आपल्या 15 वर्षीय मुलासमवेत स्वयंपाकासाठी गेल्या होत्या व त्या पश्चात संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास नानमुखाचा कार्यक्रम व जेवणासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचे पती सुद्धा जेवणासाठी गेले होते.

चिखली (बुलडाणा) : कोरोना व्हायरसचा एकीकडे प्रभाव तर दुसरीकडे कलह आणि घटनांचे सत्र अशा दुहेरी संकटामुळे जिल्हा हादरत आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तिघांचा मृत्यू झाला आहे असून, त्यापैकी दोघांचा मृत्यू सोमवारी झाला. तर (ता.19) चिखली तालुक्यात कोलारा येथे पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना घडली आहे. गेल्या 24 तासात 6 मृत्यू झालेल्या घटना समोर आल्या आहे.

चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केल्याची घटना चिखली तालुक्यातील कोलारा येथे 19 मेच्या सकाळी उघडकीस आली आहे. पार्वती निवृत्ती सोळंकी (वय 40) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात आरोपी पतीविरुद्ध चिखली पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. मृतक महिलेचे भाऊ विठोबा साहेबराव परिहार (वय 34, रा.भालगाव) यांनी मृतकाचा लहान मुलगा विष्णू सोळंकी समवेत दिलेल्या फिर्यादीवरून मृतक पार्वती सोळंकी यांचे पती निवृत्ती बाळाजी सोळंकी हे आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन नेहमी मारहाण करत होते.

आवश्यक वाचा - Video : अखेर पोलिसांनी डागली कारवाई तोफ, बेकायदेशीर सुरू होता हा व्यवसाय

दरम्यान 18 मे ला गावात भावकीतील एका घरात नानमुखाचा कार्यक्रम असल्यामुळे पार्वती सोळंकी तिथे आपल्या 15 वर्षीय मुलासमवेत स्वयंपाकासाठी गेल्या होत्या व त्या पश्चात संध्याकाळी 4 वाजेच्या सुमारास नानमुखाचा कार्यक्रम व जेवणासाठी गेल्या होत्या. येथे त्यांचे पती सुद्धा जेवणासाठी गेले होते. मात्र, जेवण होऊन घरी परतल्यानंतर आरोपी पती निवृत्ती सोळंकी याने पत्नीला तू नानमुखाच्या कार्यक्रमात मला न विचारता स्वयंपाक करण्यास का गेली होती, अशी विचारणा करीत वायरने मारहाण केली. तेव्हा तिथे उपस्थित त्यांचा लहान मुलगा विष्णू याने मध्यस्थी करून भांडण सोडविले. 

हेही वाचा - हृदयद्रावक! सुखी संसार अचानक विस्कटला अन् विवाहितेसह दोन चिमुकल्यांनी विहिरीत...

परंतु, तरीही संशयाचे भूत न उतरलेल्या आरोपी पतीने भांडण सुरूच ठेवल्याने रात्री 11 वाजेच्या सुमारास गावचे तंटामुक्ती अध्यक्ष किसन सोळंकी यांनी पती- पत्नी दोघांनाही समजावून सकाळी नातेवाइकांच्या उपस्थितीत भांडण संपुष्टात आणू, असे सांगून वाद मिटविला होता. दरम्यान मृतकाचा मोठा मुलगा रामेश्वर (वय 18) हा एक महिन्यापासून आतेबहिणीकडे गेलेला असल्याने तसेच सासू सुभद्राबाई या आपल्या लेकीकडे गेलेल्या असल्याने घरात पती- पत्नी व त्यांचा मुलगा असे तिघेच होते. 

त्यामुळे रात्री 1 वाजेनंतर मुलगा झोपी गेल्याचे पाहून 1 ते सकाळी 7 वाजेच्या दरम्यान आरोपी पतीने पत्नी पार्वती हिचा वायरच्या साहाय्याने गळा आवळून खून केला. सकाळी मुलगा झोपेतून उठल्यानंतर त्याची आई बिछान्यात निपचित पडलेली दिसून आली. बराचवेळ आवाज देवूनही आई उठत नसल्याचे पाहून त्याने शेजार्‍यांना बोलविले असता पार्वती सोळंकी या मरण पावल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान 19 मे ला सकाळी ही माहिती कळता चिखली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. 

त्यानंतर स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील शवागृहात मृतदेह आणला. या प्रकरणातील आरोपी पती  निवृत्ती बाळाजी सोळंकी यास तातडीने अटक केली आहे. दरम्यान मृतक महिलेचे भाऊ विठोबा साहेबराव परी यांनी मृतकाचा लहान मुलगा विष्णू सोळंकी समवेत दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी पतीविरोधात चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास ठाणेदार गुलाबराव वाघ यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सचिन चौहान करीत आहेत.

यापूर्वीही पोलिसांत दाखल झाली होती तक्रार
मृतक महिलेचे भाऊ विठोबा साहेबराव परिहार यांनी मृतकाचा लहान मुलगा विष्णू सोळंकी समवेत दिलेल्या फिर्यादीवरून याप्रकरणातील मृतक महिलेचा पती निवृत्ती सोळंकी यास दारूचे व्यसन आहे. तसेच तो चारित्र्याच्या संशयावरून नेहमी आपल्या पत्नीला मारहाण करायचा. गत 5 फेब्रुवारी 2020 रोजी देखील मृतकेला मारहाण, शिवीगाळ व जिवेमारण्याची धमकी दिल्याप्रकरणात मृतकेच्या भावाने पोलिसांत तक्रार दाखल करून बहिणीला माहेरी नेले होते. मात्र, त्यावेळी पुन्हा त्रस देणार नाही असे सांगून आरोपीने घरी परत नेले होते. मृतक महिलेला दोन मुले व एक 19 वर्षाची मुलगी आहे. मुलगी विवाहित आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A shocking incident took place in Chikhali taluka during the lockdown