धक्कादायक ! मेळघाटची बाइक ऍम्बुलन्स परतवाड्यात मुक्कामाला...रुग्णांची हेळसांड

file photo
file photo

अचलपूर (जि. अमरावती) : आरोग्य विभागाच्या वतीने आपत्कालीन सेवेअंतर्गत पाच वर्षांपूर्वी शिव बाइक ऍम्बुलन्स (दुचाकी रुग्णवाहिका) सुरू करण्यात आली. मात्र टेम्ब्रूसोंडा येथील बाइक ऍम्बुलन्स आरोग्यकेंद्रात न राहता ऐन कोरोनाच्या संकटात परतवाड्यात मुक्कामाला असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. त्यामुळे याप्रकाराची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने तात्काळ रुग्णांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून शासनाच्या वतीने पाच वर्षांपूर्वी शिव बाइक ऍम्बुलन्स सेवा सुरू केली. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या पाच प्राथमिक आरोग्यकेंद्रांचा समावेश करण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच पाच पैकी केवळ एकाच ठिकाणची बाइक ऍम्बुलन्स सुरू होती. इतर चार आरोग्यकेंद्रांतील ऍम्बुलन्स बंद झाल्या होत्या. यामध्ये हतरू, काटकुंभ, हरिसाल, टेब्रूसोंडा या प्राथमिक आरोग्यकेंद्रांचा समावेश होता.

परिणामी याठिकाणच्या बाइक ऍम्बुलन्स धूळखात पडून असल्याचे वृत्त वेळोवेळी "सकाळ'मध्ये प्रकाशित करण्यात आले. या वृत्ताची दखल घेऊन मेळघाटातील बंद असलेल्या शिव बाइक ऍम्बुलन्स पुन्हा सुरू करण्यात आल्या. तथापि, टेम्ब्रूसोंडा प्राथमिक आरोग्यकेंद्रातील बाइक ऍम्बुलन्स आरोग्यकेंद्रात न राहता ऐन कोरोनाच्या संकटात परतवाड्यात उभी आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या बाइक ऍम्बुलन्स सुरू करण्यात आल्या होत्या, त्या उद्देशाला हरताळ फासला जात असल्याचे बोलले जात आहे. या गंभीर प्रकाराची जिल्ह्याचे व्यवस्थापक यांनी चौकशी करून तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

अपघातग्रस्तासाठी एक तास महत्त्वाचा

पहिल्या एका तासाच्या काळात अपघातग्रस्ताला उपचार मिळावेत, यासाठी ही सेवा लाभदायक आहे. तसेच राज्यातील ज्या आदिवासी पाड्यांवर चारचाकी रुग्णवाहिका जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी वैद्यकीय सेवा पोहोचविण्यासाठी ही सेवा उपयुक्त ठरते.

आरोग्यकेंद्रात ठेवणे बंधनकारक
बाइक ऍम्बुलन्स कर्मचाऱ्यांनी आपापल्या बाइक आरोग्यकेंद्रात ठेवणे बंधनकारक आहे. बाइक ऍम्बुलन्स रुग्णांच्या सेवेसाठी आहे, त्या घरी ठेवणे ही गंभीर बाब आहे. याप्रकरणाची चौकशी करण्यात येईल.
- डॉ. अब्रूक जिल्हा व्यवस्थापक अमरावती.

सविस्तर चौकशी करण्यात येईल
दहा दिवसांच्या रजेवर जाण्यापूर्वी बाइक ऍम्बुलन्स आरोग्यकेंद्रात होती. मात्र सध्या ऍम्बुलन्सबाबत काही माहिती नाही तसेच कर्मचाऱ्याने घरी बाइक ठेवल्याची माहिती नाही, याबाबत सविस्तर चौकशी करण्यात येईल.
-डॉ. पिंपळकर, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्यकेंद्र टेम्ब्रूसोंडा.
 


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com