esakal | एकेकाळी होते  ब्रिटिशांचे 'शूटिंग ब्लॉक' आता झाले अभयारण्य; कन्हाळगाव अभयारण्यात ताडोबानंतरचे वनवैभव  
sakal

बोलून बातमी शोधा

Shooting block of british now becomes Forest in Chandrapur

कन्हाळगाव गोंडपिपरी तालुक्‍यातील जंगलाच्या कुशीत वसलेल गाव. या गावाच्या नावाने राज्य शासनाने अभयारण्य घोषित केले. याचे स्वागत वन्यजीवप्रेमींनी केले. मात्र, अभयारण्य झाल्यावर नेमके काय होणार? असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे.

एकेकाळी होते  ब्रिटिशांचे 'शूटिंग ब्लॉक' आता झाले अभयारण्य; कन्हाळगाव अभयारण्यात ताडोबानंतरचे वनवैभव  

sakal_logo
By
संदीप रायपुरे

गोंडपिपरी(जि. चंद्रपूर)  ः कन्हाळगावच्या घनदाट जंगलाने ब्रिटिशांना भुरळ घातली होती. येथे वाघांची आणि इतर वन्यजीवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे इंग्रज राजवटीत याला 'शूटिंग ब्लॉक' म्हणून घोषित करण्यात आले होते. जिल्ह्यातील तत्कालीन इंग्रज अधिकारी शिकारीसाठी यायचे. आता राज्यशासनाने याच कन्हाळगाव वनक्षेत्राला अभयारण्य म्हणून घोषित केले. ताडोबानंतरचे जिल्ह्यातील ते दुसरे वनवैभव  ठरणार आहे. 

कन्हाळगाव गोंडपिपरी तालुक्‍यातील जंगलाच्या कुशीत वसलेल गाव. या गावाच्या नावाने राज्य शासनाने अभयारण्य घोषित केले. याचे स्वागत वन्यजीवप्रेमींनी केले. मात्र, अभयारण्य झाल्यावर नेमके काय होणार? असा प्रश्‍न गावकऱ्यांना पडला आहे.  अभयारण्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण होईल. सोबतच जंगलात जाण्यावर निर्बंध येईल, अशा द्विधा मनः स्थिती नागरिक सापडले आहेत. 

हेही वाचा - बंगल्यामागे आढळली मृतदेहाची कवटी; ओळख पटताच उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

कन्हाळगावचे जंगल आधीपासूनच अतिशय प्रसिद्ध आहे. ब्रिटिशांनी या क्षेत्राला "शूटिंग ब्लॉक' म्हणून घोषित केले होते. या वनक्षेत्रात मोठया प्रमाणावर वाघांची संख्या आहे. वन्यजीवांची शिकार करण्याकरिता येथे इंग्रज अधिकारी यायचे. आजही या भागात असलेल्या ब्रिटिशकालीन जीर्ण अवस्थेत असलेल्या इमारती आणि विश्रामगृह याच इतिहासाची साक्ष देतात. 

बॉलीवूडच्या अनेक लोकप्रिय कलावंतांनी या भागाला भेट दिली आहे. शिकारीचा आनंद लुटला आहे. सन 1972 मध्ये वन्यजीव कायदा आणि वन्यजीवांच्या शिकारीवर बंदी आली. त्यानंतर येथे येणाऱ्यांची संख्या रोडावली. परंतु अवैध शिकारीच्या घटना होत असतात. कन्हाळगावातील ब्रिटिशकालीन विश्रामगृहाच्या बाजूला असलेल्या कूपनलिकेतून चोवीस तास आपोआप पाणी बाहेर येत असते. त्याचे कोडे अद्यापही सुटलेले नाही. मोठ्या संख्येत हौशी पर्यटक ही कूपनलिका बघण्यासाठी येथे येतात. 

अभयारण्य झालं की,जंगल सुरक्षित ठेवण्यासाठी विविध निर्बंध लादले जातात. त्यामुळे कन्हाळगाव अभयारण्य घोषित झाल्यानंतर येथील नागरिकांनाही विविध प्रश्‍न भेडसावू लागले आहेत. तेंदूपत्ता, सरपण आणि वनातील रानमेवा गोळा करून अनेकांना रोजगार मिळायचा. आता या बाबत वनविभागाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. 

प्रजननासाठी उपयुक्त 

कन्हाळगावचे जंगल हे वाघांच्या प्रजननासाठी उपयुक्त आहे. ताडोबातून येथे वाघीण प्रजननासाठी येतात. हा भाग ताडोब्याच्या दक्षिणेकडे मोडतो.कन्हाळगावच्या पश्‍चिमेस टिकेश्‍वर अभयारण्य आहे. इंद्रावती टायगर रिझर्व्ह, तेलंगणातील कावल हा मोठा कॅरिडोर एकमेकांशी जोडलेला आहे. या अभयारण्यामुळे ताडोबातील वाघांचा भ्रमणमार्ग अधिक सुकर होणार आहे. .

रोजगाराच्या संधी

269 चौरस किलोमीटर क्षेत्रात कन्हाळगाव अभयारण्य असणार आहे. अभयारण्याच्या  घोषणेनंतर या भागाचा विकास अधिक वेगाने होईल, असा आशावाद वन्यजीवप्रेमी व्यक्त करीत आहेत. दुसरीकडे जंगलाच्या भरवशावर रोजीरोटीची तजवीज करणाऱ्या गावकऱ्यांना मात्र भीती सतावू लागली आहे. कन्हाळगावचे वनवैभव संरक्षित व्हावे, यासाठी या क्षेत्राला अभयारण्य घोषित करण्याची मागणी मागील दहा वर्षांपासून इको -प्रोने लावून धरली होती. तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीदेखील या क्षेत्राला अभयारण्य करण्यासाठी पावल उचलली होती. 

अधिक वाचा - अमरावतीतील मृत्यूप्रकरणाला वेगळे वळण; संशयाच्या आधारे बाळाच्या आईला अटक

सर्वाधिक अभयारण्य विदर्भातच आहे. आम्हीच जंगल संरक्षित करायचे. त्याचा त्रास आमच्या शेतकऱ्यांना होतो. त्यामुळे सुरवातीला आमचा या अभयारण्याला विरोध होता. परंतु सुरवातीचा प्रस्ताव आणि आता घोषित झालेले अभयारण्य यात मोठा फरक आहे. क्षेत्रफळ कमी झाले आहे.  यात एकही गाव बाधित होणार नाही, अशी हमी मुख्य वनसंरक्षक प्रवीण यांनी दिली आहे. त्यामुळे या अभयारण्याला आम्ही विरोध केला नाही. अभयारण्याचे आम्ही स्वागतच करतो. 
सुभाष धोटे,
आमदार, राजुरा विधानसभा

संपादन - अथर्व महांकाळ 

loading image