सरकारची दिशाभूल करण्यासाठी सहाशे क्विंटल धानाची केली माती; उलट-सुलट चर्चेला फुटले पेव

Six hundred quintals of paddy soil at Bhandara
Six hundred quintals of paddy soil at Bhandara

लाखांदूर (जि. भंडारा) : सरांडी येथील धानखरेदी केंद्रात ६०० क्विंटल धान पाण्यात सडून माती झाल्याचे नुकतेच उघड झाले आहे. मात्र, यातून हजारो क्विंटल धानाची पोती गहाळ करून शासन व संस्थेची दिशाभूल करण्याचा बनाव केला जात असल्याची परिसरात चर्चा आहे. यावरून शेतकऱ्यांत उलट-सुलट चर्चेचे पेव फुटले आहे.

तालुक्‍यात सरांडी (बु.) येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर खरीप हंगामात खरेदी विक्री सहकारी संस्थेमार्फत एका गोदामात आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले होते. या केंद्रांत मोठ्या प्रमाणात धान खरेदी करण्यात आली असून धानाची काही पोती उघड्यावर ठेवली होती. यात खरेदी केलेल्या धानाची उचल होईपर्यंत देखरेख करण्याची जबाबदारी संस्थेने नियुक्त केलेला केंद्रावरील ग्रेडरची होती.

या केंद्रात खरीप हंगामात हजारो क्विंटल खरेदी केले होते. परंतु, धानाची पोती गहाळ करून शासन व संस्थेची दिशाभूल करून हजारो क्विंटल धानाची अफरातफर करण्यात आली आहे. हा घोटाळा लपवण्यासाठीच पावसाच्या पाण्यात ६०० क्विंटल धान भिजवून सडविण्यात आले, अशी चर्चा परिसरात केली जात आहे. याच संस्थेमार्फत तालुक्‍यात जवळपास सात ठिकाणी आधारभूत धान खरेदीकेंद्र सुरू केले होते. मात्र, यापैकी फक्त सरांडी (बु.) या केंद्रावर पावसाच्या पाण्याने धानाची पोती सडली ही बाब संशयास्पद आहे.

या गैरप्रकाराची माहिती खरेदी विक्री संस्थेला होताच संस्थेचे सभापती, उपसभापती, संस्था कर्मचारी व संचालकांनी काही महिन्यापूर्वी गहाळ करण्यात आलेल्या धानावरून दोषी ग्रेडरच्या विरोधात चौकशी सुरू केली आहे. येथे तब्बल साडेसहा हजार क्विंटल धानाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार ३० सप्टेंबरला सरांडी (बु.) येथे पाण्यात भिजून मातीमोल झालेली धानाची पोती जेसीबीने मशीनने उचलून मोजण्यासाठी ट्रॅक्‍टरद्वारे धर्मकाट्यावर आणण्यात आले.

मोजणी केल्यावर केवळ ६०० क्विंटल धान सडून माती झाल्याचे आढळून आले. मग, खरेदी केलेले उर्वरित धानाची पोती कुठे गेली, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांना आधारभूत खरेदीकेंद्रातून अधिक भाव मिळत असताना अन्नधान्याचे कृत्रिमपणे नुकसान करण्याचा प्रकार उघड झाला आहे. यातील दोषींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

६५०० क्विंटल धानाची अफरातफर
खरेदी-विक्री सेवा सहकारी संस्थेने सरांडी बु. येथे एका गोदामात आधारभूत धानखरेदी केंद्रात धान खरेदी केली होती. अंदाजे ९६ हजार क्विंटल खरेदी करण्यात आली होती. त्यापैकी साडेसहा हजार क्विंटल धान गोदामात शिल्लक दाखविण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात पाहणी केली असता सडलेले धान जेसीबी मशीनने जमा करून मोजले असता ६०० क्विंटल भरले. उर्वरित धान गोदामात शिल्लक नाही. त्याबाबत ग्रेडरला विचारले असता धान नाल्यात वाहून गेले, असे सांगत आहे. मात्र, आम्ही सर्व संचालक चौकशी करून पोलिसांत तक्रार करणार आहोत. त्याला वकिलामाफत नोटीससुद्धा पाठविली आहे. याप्रकरणात ६५०० क्विंटल धानाची अफरातफर केली आहे.
- रामचंद्र परशुरामकर,
सभापती खरेदी-विक्री सहकारी संस्था लाखांदूर


संपादन - नीलेश डाखोरे 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com