दुष्काळात तेरावा... म्हणे सोयाबिन बियाणांचाही तुटवडा

soybean-dal
soybean-dal

अमरावती : आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाणांचा संभाव्य तुटवडा व बियाणे दरवाढीची शक्‍यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी शाश्‍वत बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी सोयाबीन बियाणे लागवडीचा प्रयोग आताच राबविणे आवश्‍यक आहे.
कोरडवाहू क्षेत्रात कपाशी आणि सोयाबीन ही महत्त्वाची पिके आहेत. त्यापैकी सोयबीनला शेतकरी अधिक प्राधान्य देतात. गत खरीप हंगामात कापणी व मळणीच्या तोंडावर परतीच्या व अवेळी पावसाने सोयाबीनची प्रतवारी चांगलीच खालावली. परिणामी आगामी खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा भासण्याची तसेच बियाणे दरवाढीची शक्‍यता बळावलेली आहे. त्यावर मात करण्यासाठी पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी आतापासून बियाणे लागवड कार्यक्रम राबविल्यास त्याचा खरिपासाठी मोठा दिलासा मिळू शकतो. गतवर्षी खरिपात महाबीज बियाण्याचे दर 68 रुपये, तर खासगी कंपन्यांच्या बियाण्यांचे दर 70 ते 75 रुपये प्रतिकिलो होते.

परभणी कृषी विद्यापीठाने सोयाबीनच्या जेएस-335 तसेच एमएयूएस-71, एमएयूएस-81 या सोयाबीन वाणावर हा प्रयोग घेतलेला आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत सोयाबीन घेतल्यास त्याची उत्पादकता निम्म्यापेक्षा कमी येऊ शकते, तथापि यातून हाती येणाऱ्या सोयाबीनची उगवण क्षमता ही 90 टक्‍क्‍यांपर्यंत जाते. उत्पादकता व झाडांची उंची कमी राहणार असल्याने दाट लागवड करणे शक्‍य आणि अधिक सोयीचे ठरणार आहे. बीबीएफ यंत्राच्या साहाय्याने सरीवरंभा पद्धतीने लागवड अधिक फायदेशीर ठरणार आहे.
बियाण्यासाठी शेतकऱ्यांनी मोजक्‍या क्षेत्रात 22 ते 25 फेब्रुवारीपर्यंत सोयाबीनची पेरणी केल्यास 90 ते 95 दिवस म्हणजे साधारणपणे मेमध्ये सोयाबीन काढणीला येईल. त्यानंतर लगेच खरिपाची तयारीसुद्धा शेतकऱ्यांना करता येईल.
स्वत: घ्या जबाबदारी
पाण्याची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या जबाबदारीवर सोयाबीन बियाणे लागवडीचा कार्यक्रम घ्यावा. उत्पादन निम्मे येईल हे गृहीत धरावे. उत्पादित सोयाबीनची उगवण क्षमता तपासून तसेच बीजप्रक्रिया करून त्याचा बियाणे म्हणून वापर करावा. यासाठी मदत वा नुकसान भरपाई देय नाही, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे यांनी सांगितले.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com