जुळ्या बहिणींचे गुणही जुळे!रिद्धी-सिध्दीचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश, चक्रावणारा रिझल्ट SSC Result 2023 10th exam success Riddhi Siddhi Twin sisters have same marks | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रिद्धी-सिध्दी

SSC Result 2023 : जुळ्या बहिणींचे गुणही जुळे! रिद्धी-सिध्दीचे दहावी परीक्षेत हुबेहूब यश, चक्रावणारा रिझल्ट

धामणगाव रेल्वे : दिसायला अन् गुणांतही हुबेहूब अशी किमया साधणाऱ्या रिद्धी, सिध्दी प्रवीण लोखंडे या जुळ्या बहिणीचे दहावी परीक्षेतील गुणही जुळे आहेत. एकसारखेच गुण मिळवून दोघींनी आपसांतील सारखेपणा जपला आहे.

मूळचे यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील कोठा फत्तेपूर येथील प्रवीण लोखंडे मुलींच्या शिक्षणासाठी धामणगाव येथे राहतात. त्यांना तीन मुली आहेत. त्यात रिद्धी आणि सिद्धी या दोन जुळ्या मुली आहेत. गुरुवारी (ता.२) दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर लोखंडे कुटुंबीय आनंदित झाले.

आश्चर्य म्हणजे एकसारख्या दिसणाऱ्या रिद्धी, सिध्दीमुळे शेजारी, नातेवाईक आणि परिचितही गोंधळून जायचे. तसे निकालाच्या दिवशी दोघींनी ९६ टक्के एकसारखे गुण मिळवून सर्वांनाच आचंबित केले. त्यांची आई कविता लोखंडे यांचे शिक्षण बी. ए. पर्यंत झाले आहे. तर वडील प्रवीण लोखंडे यांचे शिक्षण दहावी पर्यंत झाले आहे. मोठी बहीण समृद्धी ही अभियांत्रिकीमध्ये अमरावती येथे शिक्षण घेत आहे.

रिद्धी, सिद्धी या येथील हिराबाई गोयनका कन्या विद्यालयात दहावीला होत्या. दोघीही रंगरुपाने हुबेहूब असून, अभ्यासातही सारख्याच हुशार आहेत. निकाल जाहीर झाला तेव्हा दोघींना ४८० गुण मिळाले. आता त्या दोघीही धामणगाव येथे एकत्रित शिक्षण घेणार आहेत. दोघींचेही मुख्याध्यापिका सुनीता देशपांडे, शिक्षकवृंद यांच्यासह नातेवाईक आणि मित्र परिवारातून कौतुक होत आहे.