'नमस्कार! अमरावती बसस्थानकात आपले स्वागत आहे' .. हा आवाज पुन्हा पडणार कानी ..आजपासून धावणार लालपरी... 

सुधीर भारती 
Wednesday, 5 August 2020

कोरोना व लॉकडाउनमुळे मागील चार महिन्यांपासून बंद पडलेली लालपरी अखेर बुधवारपासून (ता. ५) रस्त्यांवर धावणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली असून त्यानुसार परिवहन महामंडळाकडून एसटी फेऱ्यांचे नियोजनसुद्धा करण्यात आलेले आहे.

अमरावती: "नमस्कार, अमरावती मध्यवर्ती बसस्थानकात आपले स्वागत आहे', असे हरविलेले शब्द आजपासून प्रवाशांच्या कानी पडणार आहेत. मागील चार महिन्यांपासून बसस्थानकांचा रस्ताच विसरलेल्या प्रवाशांसाठी आता लालपरी धावण्यास सज्ज झाली आहे. 

कोरोना व लॉकडाउनमुळे मागील चार महिन्यांपासून बंद पडलेली लालपरी अखेर बुधवारपासून (ता. ५) रस्त्यांवर धावणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यास हिरवी झेंडी दिली असून त्यानुसार परिवहन महामंडळाकडून एसटी फेऱ्यांचे नियोजनसुद्धा करण्यात आलेले आहे.

हेही वाचा - काटोलच्या गानकोकीळा भाग्यश्री व धनश्री राममंदिर भूमिपूजनप्रसंगी गाणार अयोध्येत...

बऱ्याच काळानंतर एसटी सेवा सुरू होणार असल्याने प्रवाशांसोबतच एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. प्रत्येक आगाराने दिवसभरात किमान 7 ते 10 बसफेऱ्या सुरू कराव्याच, असे निर्देश विभागीय नियंत्रकांनी दिले आहेत. 

मंजुरी देण्यात आलेल्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद असेल तर दर दोन तासांनी बसफेरी सुरू केली जाईल. निश्‍चित करण्यात आलेल्या मार्गाखेरीज आगार कक्षेमध्ये येणाऱ्या मार्गांवर प्रवासी मागणी व प्रतिसाद असल्यास अतिरिक्त फेऱ्यांचे नियोजन आगार स्तरावरून करण्यास मुभा देण्यात आली आहे.

या मार्गवर धावणार लालपरी

* अमरावती आगार - कुऱ्हा, धामणगाव (तिवरा मार्गे)
* बडनेरा आगार - नांदगावखंडेश्‍वर, चांदूरबाजार (पुसदा मार्ग)
* परतवाडा आगार - धारणी, चिखलदरा. अंजनगावसुर्जी, अमरावती.
* वरुड आगार - अमरावती, जलालखेडा.
* चांदूररेल्वे आगार - तिवसा, धामणगावरेल्वे (विरूळ मार्गे), नांदगाव खंडेश्‍वर, घुईखेड.
* दर्यापूर आगार - अंजनगावसुर्जी, मूर्तिजापूर, आसेगाव, अमरावती, वडनेरगंगाई.
* मोर्शी आगार - परतवाडा.
* चांदूरबाजार - अमरावती, वलगाव, परतवाडा मार्गे ब्राह्मणवाडा थडी, घाटलाडकी, तिवसा 

नक्की वाचा - ...अन्‌ स्वतःच्या तेरवीपूर्वीच परतला रामभक्त, जाणून घ्या काय झाला होता प्रकार...

केवळ 22 प्रवासी, सॅनिटाझरचा वापर

बसमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव केवळ 22 प्रवाशांनाच प्रवास करण्याची मुभा राहणार आहे. याशिवाय सॅनिटायझर, मास्कचा वापर अत्यावश्‍यक राहणार आहे. खबरदारी न घेणाऱ्यांना बसमध्ये 'एन्ट्री' राहणार नाही.

संपादन - अथर्व महांकाळ 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: St bus starting today in amaravti