एसटी कर्मचाऱ्यांचे "पगार दो' आंदोलन; वेतनासाठी आक्रोश 

राजकुमार भितकर
Tuesday, 10 November 2020

कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये एसटी कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. कामगिरी करीत असताना कोरोनामुळे बरेचसे कर्मचारी बाधित झाले आहेत.

यवतमाळ : एसटी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2020 पासून वेतन मिळालेले नाही. दिवाळी तोंडावर असतानादेखील वेतनाबाबत निर्णय झालेला नाही. त्यामुळे कामगारांनी आपल्या प्रलंबित वेतनासाठी कुटुंबीयांसह आक्रोश व्यक्त केला.

कोरोना विषाणूच्या महामारीमध्ये एसटी कर्मचारी आपला जीव धोक्‍यात घालून रात्रंदिवस आपले कर्तव्य बजावत आहेत. कामगिरी करीत असताना कोरोनामुळे बरेचसे कर्मचारी बाधित झाले आहेत. राज्यभरात 80 कर्मचारी मृत झालेले आहेत. इतर क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना त्यांचे वेतन नियमित मिळत आहे. महानगरपालिका, बेस्टमधील कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त अनुक्रमे 15 हजार 500 व दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलेले आहे. परंतु, एसटी कर्मचाऱ्यांना वेतनही मिळालेले नाही.

सविस्तर वाचा - टूथपेस्ट'वरील रंगीत पट्ट्यांचा अर्थ तरी काय?

वास्तविक एसटी कामगारांना नियमित वेतन देणे हे कायद्याने एसटी प्रशासनावर बंधनकारक आहे. कामगार करारामधील मान्य केलेल्या तरतुदीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाईभत्ता व सण उचल एसटी कामगारांना देणे आवश्‍यक आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या दोन-तीन टक्के महागाई भत्त्याची थकबाकी अद्याप दिलेली नाही. शासकीय कर्मचाऱ्यांना गेल्या डिसेंबर 2019 पासून लागू करण्यात आलेल्या वाढीव पाच टक्के महागाई भत्ताही एसटी कर्मचाऱ्यांना अद्याप लागू केलेला नाही. तो थकबाकीसह लागू करणे आवश्‍यक आहे.

हेही वाचा - घरी सरणाची तयारी अन्‌ मृत महिला अचानक झाली जिवंत; उपस्थितांच्या अंगाचा उडाला थरकाप

वेतनाअभावी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांची होणारी अवस्था विचारात घेता दिवाळीपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांचे थकीत वेतन, थकीत महागाईभत्ता, सण उचल या मागणीसाठी सोमवारी एसटी कर्मचारी कुटुंबीयांसह आक्रोश केला. आंदोलनात महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सदाशिव शिवणकर, विभागीय अध्यक्ष हरिदास सायरे, सचीव राहुल धार्मिक, नाना बोनगिरवार, पंकज लांडगे, अमोल गढी, गौरव देशमुख, गजेंद्र उमक, अशोक खेडकर, निखिल दौलतकार, व्यंकटेश ऐटवार, महिंद्र शेबे यांच्यासह एसटी कर्मचाऱ्यांच्या परिवारातील सदस्य सहभागी झाले होते.
 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST workers did protest for salaries