फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच कोरोनाचा उद्रेक, तणावाचा ग्राफ वाढला

सुधीर भारती
Thursday, 18 February 2021

गेल्या वर्षी धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाशी दोन हात केल्यानंतर मध्यंतरी काहीसा ग्राफ खाली आला आणि सर्वसामान्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सारेकाही ऑलवेल असल्याप्रमाणेच लग्नसराई, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक तसेच राजकीय मेळावे, राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली.

अमरावती : सुरुवातीला कोरोनाशी दोन हात केल्यावर आता सारेकाही ऑलवेल झाल्याची स्थिती निर्माण झाली असतानाच अचानक कोरोनाचे नवीन रूप प्रकटले आणि सर्वसामान्यांच्या तणावाचा आलेख पुन्हा वाढला. दररोज वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे बहुतांश नागरिक आता पुन्हा तणावाच्या सावटात आल्याचे मानसोपचारतज्ज्ञांचे म्हणणे आहे.  

हेही वाचा - यवतमाळमध्ये पूजा अरुण राठोडचा गर्भपात; डॉक्टर आठ दिवसांपासून गायब ?

गेल्या वर्षी धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाशी दोन हात केल्यानंतर मध्यंतरी काहीसा ग्राफ खाली आला आणि सर्वसामान्यांनी सुटकेचा निःश्‍वास टाकला. सारेकाही ऑलवेल असल्याप्रमाणेच लग्नसराई, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक तसेच राजकीय मेळावे, राजकीय कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. मात्र, फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच पुन्हा एकदा रुग्णसंख्येने चढता आलेख गाठला. विशेष म्हणजे पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण वाढत असतानाच मृत्यू होण्याची संख्यासुद्धा वाढत आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा कोरोना फिव्हर निर्माण झाला. मानसशास्त्रज्ञांच्या मते, याला 'स्ट्रेस ग्राफ' असे म्हणतात. तणावाचा आलेख एकदम चढतो आणि काही मर्यादेनंतर तो खालीखाली उतरत जातो. वारंवार चढउतार होत असल्याने समाजमन किंवा व्यक्ती संभ्रमावस्था अनुभवत असतो. कारण कोरोनासारखे संकट या जगाने पहिल्यांदाच अनुभवले आहे. त्यामुळे सर्वच लोकं कमी अधिक प्रमाणात  धक्‍क्‍यात आहेत. आता तर लोक सत्यता स्वीकारण्यास सुद्धा तयार नाहीत, अशी स्थिती आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललाय हे मानण्यास अनेकजण तयार होत नाहीत, याला मानसिक स्थितीसुद्धा कारणीभूत असते. कुटुंबातील लहान मुले, ज्येष्ठांची सुरक्षा कशी करावी, आर्थिक स्थिती, नोकरीच्या समस्या, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न, असे अनेक प्रश्‍न मनात गोंधळ निर्माण करून टाकतात. सर्वच लोकं ते हाताळण्यात यशस्वी होत नाहीत. परिणामी मानसिक ताणामध्ये अधिकाधिक भर पडत जाते. 

हेही वाचा - लस घेतलेल्या योद्ध्यांनाच कोरोनाची लागण, ८ जणांचा...

ही परिस्थिती सर्वांसाठी नवीन आहे. आपली मनःस्थिती संतुलित ठेवून आहे त्या परिस्थितीशी उपलब्ध संसाधनांसोबत जुळवून घेणे, हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. दुसऱ्यांना शिस्त लावण्यापेक्षा स्वतःला शिस्त लावून जीवन जगणे या काळात महत्त्वाचे आहे. मनःस्थिती व परिस्थिती याची योग्य सांगड घालणे हाच आजच्या संकटावरील उपाय म्हणता येईल.
-डॉ. पंकज वसाडकर, मानसतज्ज्ञ, अमरावती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: stress graph increases due to corona in amravati