इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमाचा पेपर; गोंडवाना विद्यापीठाचा अनागोंदी कारभार पुन्हा उघड

बालकदास मोटघरे
Thursday, 15 October 2020

कोरोनाच्या संकटात राज्यामध्ये परीक्षा घेणे अवघड असल्याने राज्य शासनाने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे निर्देश देताना परीक्षेविना पदवी प्रदान करण्यास विरोध दर्शविला. 

आनंदवन (जि. चंद्रपूर) : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांची परीक्षा घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यानुसार गोंडवाना विद्यापीठाने अंतिम सत्राच्या परीक्षा 12 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन पद्धतीने सुरू केल्या आहेत. 14 ऑक्‍टोबरला बीएड अंतिम सत्राच्या परीक्षेत मराठी माध्यमातूनच प्रश्नपत्रिका देण्यात आल्यामुळे इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे अवघड झाले. परिणामी, विद्यार्थ्यांना "लॉगआऊट' व्हावे लागले. त्यामुळे विद्यापीठाच्या कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कोरोनाच्या संकटात राज्यामध्ये परीक्षा घेणे अवघड असल्याने राज्य शासनाने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाने अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्याचे निर्देश देताना परीक्षेविना पदवी प्रदान करण्यास विरोध दर्शविला. 

अधिक माहितीसाठी - स्वयंघोषित सर्पमित्रांमुळे जीव धोक्यात; वाढत्या तस्करीमुळे संकल्पनाच काढली मोडीत

त्यानंतर नाइलाजाने विद्यापीठाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने पारंपरिक पद्धतीने परीक्षा न घेता ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याचे ठरविले. गोंडवाना विद्यापीठाने 5 ऑक्‍टोबरपासून ऑनलाइन परीक्षा घेण्याचे वेळापत्रक प्रसिद्ध केले. काही तांत्रिक कारणांमुळे 5 ऑक्‍टोबरऐवजी 12 ऑक्‍टोबरला परीक्षा घेण्याबाबत नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले.

त्यानुसार 12 ऑक्‍टोबरला ऑनलाइन पद्धतीने परीक्षा सुरू झाली. विद्यापीठामध्ये मराठीसह इंग्रजी व हिंदी माध्यमाचे विद्यार्थी असल्याने तिन्ही माध्यमातून प्रश्नपत्रिका देणे क्रमप्राप्त आहे. 14 ऑक्‍टोबरला बीएड अभ्यासक्रमाच्या शालेय मार्गदर्शन व समुपदेशन विषयाची प्रश्नपत्रिका ही केवळ मराठी भाषेमधूनच देण्यात आली. त्यामुळे इंग्रजी व हिंदी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास झाला. यातूनच काही विद्यार्थ्यांनी संपूर्ण पेपर न सोडविता लॉगआऊट केले. यामुळे शैक्षणिक नुकसान होणार या भीतीने विद्यार्थी चिंतित आहेत.

क्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल

आधीच कोरोना संकट, परीक्षेला झालेला उशीर, ऑनलाइन परीक्षा देताना येणाऱ्या अडचणी यातच विद्यापीठाकडून होणाऱ्या चुका यामुळे सामान्य विद्यार्थी होरपळून गेला आहे. गोंडवाना विद्यापीठाने आपली चूक दुरुस्त करून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेची संधी द्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. दरम्यान, परीक्षेचे नियोजन करून लवकरच पुन्हा संबंधित विषयाची परीक्षा घेणार असल्याचे विद्यापीठ सूत्रांनी सांगितले.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students of english medium got marathi medium paper in gondwana university