esakal | निधीत अपहार; टॉवरवर चढून अंगावर ओतले पेट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

निधीत अपहार; टॉवरवर चढून अंगावर ओतले पेट्रोल

निधीत अपहार; टॉवरवर चढून अंगावर ओतले पेट्रोल

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

अमरावती : ग्रामसचिवाने वॉटर कपच्या कामासाठी आलेल्या निधीत अपहार केल्याचा आरोप करून त्याच्याविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी यवतमाळ जिल्ह्यातील सायवनी येथील व्यक्तीने अमरावती विभागीय आयुक्तालयाच्या इमारतीवरील टॉवरवर चढून आत्मदहनाचा प्रयत्न केला. विजयकुमार बळीराम ताले (वय ३६, रा. सायवनी, ता. पातूर, जि. अकोला) असे आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. (Suicide-Attempt-News-Gasoline-poured-on-the-body-Amravati-Crime-News-nad86)

सायवनी गावात वॉटर कपअंतर्गत कामे करण्यासाठी शासनाकडून निधी आला. आलेल्या १६ ते १७ लाख रुपये एवढ्या निधीत ग्रामसचिव पी. पी. चव्हाण या ग्रामसचिवाने अपहार केला, असा आरोप श्री. ताले यांनी तक्रारीत केला. त्यामुळे शासकीय निधीचा अपहार करणाऱ्या ग्रामसचिवाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून निलंबित करावे, त्यांची विभागीय चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष झाले.

हेही वाचा: शक्तिमानचा मृत्यू; अंत्यसंस्काराला पोलिसांचा ताफा, गॅंगवॉर भडकणार

ग्रामसचिवाविरुद्ध कारवाई व्हावी, या मागणीसाठी विजयकुमार ताले यांनी विभागीय आयुक्तालय परिसरात येऊन इमारतीच्या टॉवरवर चढून सोमवारी (ता. २६) आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इमारतीच्या छोट्या टॉवरवर चढत असताना सोबत बॉटलमध्ये पेट्रोल भरून वर नेले होते. गाडगेनगर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. विजयकुमार याला टॉवरच्या खाली उतरून अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्याची विनंती खाली असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांनी केली.

परंतु, कारवाई होईपर्यंत टॉवरवर चढलेली व्यक्ती खाली उतरण्यास तयार नव्हती. पोलिसांनी टॉवरवर चढून त्याला उतरविण्याचा प्रयत्न केला असता त्याने वर असताना बॉटलमधील पेट्रोल अंगावर ओतले. त्यामुळे अग्निशमन दलाच्या पथकाने त्याच्यावर पाण्याचा मारा करून खाली उतरण्यास भाग पाडले. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. विजयकुमार ताले याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

हेही वाचा: दर १० मिनिटाला हलतो पाळणा, वर्षाला ५० हजार दाम्पत्याकडे ‘गुड न्यूज'

आत्मदहनाचा प्रयत्न करण्यापूर्वी सदर व्यक्तीने येथील अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा करणे अपेक्षित होते. परंतु, त्याने टॉवरवर चढून पेट्रोल ओतून घेतल्यामुळे पोलिसांनी योग्य ती कारवाई केली.
- आसाराम चोरमले, पोलिस निरीक्षक, गाडगेनगर ठाणे

(Suicide-Attempt-News-Gasoline-poured-on-the-body-Amravati-Crime-News-nad86)

loading image
go to top