धगधगत्या आगीत 'एनआयसीयू'मध्ये घुसला अन् वाचविला ७ बालकांचा जीव, वाचा शूर 'सूरज'ची अंगावर काटा आणणारी कहाणी

अनिल कांबळे
Sunday, 10 January 2021

सात बालकांना वाचवू शकलो, याचे समाधान आहे. मात्र, १० बालकांचा जीव वाचविता आला असता, तर बरे झाले असते. घडलेली घटना तो सांगत होता अन् डोळ्यातून अश्रू गळत होते. 

भंडारा : आग लागल्याची माहिती मिळताच रुग्णालयाकडे धाव घेतली. आतमध्ये आगीचे डोंब दिसत होते. त्यामुळे कुणीही आत जाण्याची हिम्मत करत नव्हते. त्यामुळे मी अस्वस्थ झालो. मात्र, शेवटी मीच हिम्मत केली आणि आत घुसलो. सात बालकांना वाचवू शकलो, याचे समाधान आहे. मात्र, १० बालकांचा जीव वाचविता आला असता, तर बरे झाले असते. घडलेली घटना तो सांगत होता अन् डोळ्यातून अश्रू गळत होते. ही अंगावर काटा आणणारी कहाणी आहे, भंडारा जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीतून सात बालकांना सुखरूप बाहेर काढणाऱ्या शूर सूरज परदेशीची...

हेही वाचा - एकाचवेळी पाच बालकांना हातात घेऊन शूर परिचारिकेची आगीतून धाव, मेयोमधील घटनेची अनेकांना आठवण

सूरज परदेशी हा तरुण जिल्हा रुग्णालयात वॉर्डबॉय म्हणून काम करतो. तो शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घरी गेला. झोप येणार इतक्यात रुग्णालयाच्या एनआयसीयूला आग लागल्याचा फोन आला. तो धावतच रुग्णालयात पोहोचला. त्याने लगेच एनआयसीयूकडे धाव घेतली. आरडाओरड सुरू असताना सूरजने पुढाकार घेतला. त्याने एनआयसीयूच्या काचा फोडल्या. धूर बाहेर काढण्यासाठी आटापिटा केला. १७ पैकी ७ बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात त्याने मोलाची भूमिका बजावली. सैरभैर झालेल्या पालक आणि नातेवाइकांची समजूत घालण्याचे काम त्याने केले. सातही बाळांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी त्याने प्रयत्न केले. त्याच्या या कार्याचे सर्वजण कौतुक करीत आहेत. सूरजने दाखवलेल्या हिमतीमुळेच बाळांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा - भंडारा रुग्णालय आग प्रकरण : आऊट बॉर्न युनिटबद्दल समोर आली धक्कादायक माहिती

संपादन - भाग्यश्री राऊत


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: suraj pardeshi saved 7 child in bhandara hospital fire incident