Bharat Bandh Updates : 'चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस अडवणे हा फक्त ट्रेलर होता, आता दिल्लीला जाणारी प्रत्येक रेल्वे अडवू'

अतुल मेहेरे
Tuesday, 8 December 2020

सरकारने पारित केलेले कृषी विधेयक मागे घ्या, एवढेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात शेतकऱ्यांना घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे, असेही ते म्हणाले.  

नागपूर : गेल्या १२ दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत राजधानी दिल्लीच्या सीमांवर न्यायासाठी बसलेला आहे. केंद्र सरकार चर्चेत वेळ घालवत आहे. आज बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकावर आम्ही चेन्नई-अहमदाबाद नवजीवन एक्सप्रेस अडवली आहे. यापुढे दिल्लीला जाणारी प्रत्येक रेल्वे अडवू, असा इशारा स्वाभिमानी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केंद्र सरकारला दिला. 

हेही वाचा - डोळ्यांना कमी दिसत असल्याने सासऱ्याने रक्कम दिली...

लाखोंच्या संख्येने शेतकरी रस्त्यावर आलेला असताना सरकारला चर्चेत वेळ कसा घालवावा वाटतो? सरकार आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न करत आहे. हे आंदोलन आणि यापूर्वी घडलेल्या अशाच घटनांमुळे जागतिक पातळीवर केंद्र सरकारची प्रतिमा मलिन झालेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. सरकारने पारित केलेले कृषी विधेयक मागे घ्या, एवढेच शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. कॉर्पोरेट कंपन्यांच्या घशात शेतकऱ्यांना घालण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे, असेही ते म्हणाले.  

हेही वाचा - अमरावतीतील बाळाचे मृत्यूप्रकरण : आई, वडिलांची डीएनए...

शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल सरकारने वेळीच घेतली असती तर आज भारत बंद करण्याची वेळ आली नसती. सरकारच्या हेकेखोरपणामुळेच देशाला आजचा बंद पाहावा लागत आहे. आज नवजीवन एक्सप्रेस अडवून आम्ही केंद्र सरकारला इशारा दिला आहे की, दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढला नाही, तर दिल्लीकडे जाणारी सर्व वाहतूक रोखून धरली जाईल. एकही रेल्वे दिल्लीत पोहोचू दिली जाणार नाही, हा निर्धार आज स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आज केला, असेही ते म्हणाले.

हेही वाचा - पोलिसांनी धमकावल्यानेच माजी नगरसेवकाचा मृत्यू, नातेवाईंकाचा आरोप; शहराला पोलिस छावणीचे स्वरूप

दिल्लीतील आंदोलन दिवसागणिक चांगलेच चिघळत चालले आहे. दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे पडसाद विदर्भातील गावखेड्यांतही उमटले आहेत. आज विदर्भातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे भारत बंद पाळला. राजकीय पक्ष आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी  शांतीपूर्ण मोर्चे काढून दुकानदारांनाही बंद ठेवण्याचे आवाहन केले, त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. कृषी विधेयक मागे घेण्याच्या मागणीवर स्वाभिमानी संघटना आक्रमक झाली असून राजू शेट्टी यांनी आज कृषी विधेयकाची होळी केली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: swabhimani leader ravikant tupkar reaction on farmers agitation