ऑनलाइन शिकविणाऱ्या शिक्षकांचीच आता दर आठवड्याला भरणार शाळा! 

सुधीर भारती 
Monday, 28 September 2020

राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा व शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकारला तसेच राज्यांसोबत होणाऱ्या बैठकांमध्ये सादर करावयाच्या दृष्टीने एमएससीईआरटीने सादर करण्याची सूचना दिली आहे.

अमरावती ः बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाइन वर्ग घेणाऱ्या शिक्षकांची आता दर आठवड्याला शाळा भरणार आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आठवडाभर केलेल्या प्रयत्नांचा अहवाल तयार करून आठवड्याच्या शेवटी तो राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेला सादर करावा लागणार आहे. आधीच कामांची लांब यादी असलेल्या शिक्षकांना आता पुन्हा कागदोपत्री अपडेट राहावे लागणार असल्याने शिक्षक संघटनांनी मात्र नाराजीचा सूर काढला आहे. 

राज्यातील बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शाळा व शिक्षक करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती केंद्र सरकारला तसेच राज्यांसोबत होणाऱ्या बैठकांमध्ये सादर करावयाच्या दृष्टीने एमएससीईआरटीने सादर करण्याची सूचना दिली आहे. राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या बारावीपर्यंतच्या शिक्षकांकडून हा अहवाल मिळणे अपेक्षित असल्याचे शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी स्पष्ट केले आहे. 

हस्त, चित्रा, स्वाती नक्षत्रही बसरणार; हवामान अभ्यासकाने वर्तविला अंदाज
 

दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी शिक्षकांनी आपला अहवाल सादर करावयाचा आहे. विद्यार्थ्यांच्या घरी भेट देणे, फोनच्या माध्यमातून कम्युनिटी क्‍लासेस चालविणे, शिक्षक मित्र तयार करणे, किती तास अभ्यास झाला याची माहिती द्यावी लागणार आहे. 

पेट्रोलपंप मालकाने केला कडक नियम, `नो मास्क नो पेट्रोल`!
 

शिक्षकांमध्ये मात्र नाराजी 

एमएससीईआरटीने दिलेल्या सूचनांमुळे शिक्षकांमध्ये नाराजी आहे. ऑनलाइनमुळे आधीच कामाचा व्याप वाढलेला आहे. त्यात कोरोनाची टांगती तलवार आणि आता पुन्हा एक अशैक्षणिक जबाबदारी शासनाने खांद्यावर टाकल्याचा शिक्षकांचा आरोप आहे. अनेक शाळांमध्ये इंटरनेटची सुविधा नाही. ऑनलाइनबाबत माहिती मागणे म्हणजे शिक्षकांवर अविश्‍वास व्यक्त करणे आहे. त्यामुळे शिक्षक संघटनांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teachers who is teaching online has to submit weekly report to the government