टेकडा-कंबालपेठा रस्त्यावर क्षणाक्षणाला दिसतोय मृत्यू, रस्त्याला ठिकठिकाणी पडले खड्डे

tekda kambalpetha road condition is in worst condition in sironcha of gadchiroli
tekda kambalpetha road condition is in worst condition in sironcha of gadchiroli
Updated on

सिरोंचा (जि. गडचिरोली ) : सिरोंचा तालुक्‍यातील टेकडा-कंबालपेठा रस्त्याची अवस्था दयनीय झाली असून येथे ठिकठिकाणी खड्डे असल्याने वाहनचालकांना मोठीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

सिरोंचा तालुक्‍याच्या ठिकाणी आपल्या विविध कामांसाठी नागरिक येत असतात. तसेच खते, बियाणे, कीटकनाशके आदींच्या खरेदीसाठी शेतकरीही मोठ्या संख्येने येतात. तालुक्‍यातील टेकडा (ताल्ला) या गावात आजूबाजूच्या गावातील लोक तहसील कार्यालयास, बँकेच्या कामासाठी, शैक्षणिक कार्य, आरोग्यविषयक समस्यांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात व इतर वस्तूंची खरेदी विक्रीसाठी येत-जात  असतात. अर्थातच टेकडा या गावातील नागरिकांचा कुठल्या ना कुठल्या कामासाठी आजूबाजूच्या गावखेड्यातील नागरिकांसह तालुक्‍याशी संपर्क येतो. येथील नागरिकांना आरोग्यविषयक समस्यांसाठी जाफ्राबाद येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असले तरी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे व सोयीअभावी तालुक्‍याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण हलविण्यात येतात. तेव्हा रुग्ण व प्रवासी सुखरूप पोहोचण्यासाठी मार्ग सुरळीत असणे अत्यंत गरजेचे आहे. 

सध्याचा आधुनिक युगात दळण-वळण अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. गावगाड्याला जोडणारे रस्ते पक्‍के झाल्याशिवाय त्या भागातील विकास होणे शक्‍य नाही. असे असतानाही टेकडा-कंबालपेठा रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष दिले जात नाही. टेकडा ते कंबालपेठा हा मार्ग सिरोंचा ते अहेरी 115 क्रमांकाच्या राज्य महामार्गाला जोडणारा मार्ग आहे. या मार्गाने अतिरिक्त वजन घेऊन जाणारी वाहने मोठ्या संख्येने जात असतात. त्यामुळे या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे निर्माण झाले आहेत. टेकडा येथून सिरोंचा प्रवास करण्यासाठी नागरिकांना जीव धोक्‍यात घालावा लागत आहे. खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याने वाहनचालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्‍यता वाढत आहे. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार असाच सुरू राहिला, तर अपघात होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे टेकडा ते कंबालपेठा दरम्यान असलेल्या मार्गावरील खड्डे तत्काळ बुजवून हा मार्ग ठीक करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.

कधी येणार जाग?
केवळ टेकडा-कंबालपेठाच नव्हे, तर सिरोंचा तालुक्‍याच्या अनेक गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. रस्त्यातील खड्ड्यांमुळे वाहनाचे संतुलन बिघडून अनेकदा अपघात झाले असून काहींना प्राणही गमवावा लागला. पण, हे जीवघेणे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी नागरिक सातत्याने करत असूनही सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेचे सोंग घेऊन सुस्त पडले आहे. नागरिकांना नाहक त्रास होत असताना किमान त्याची दखल घेण्याची गरज असतानाही हे विभाग सुस्त आहे. त्यामुळे नागरिकांचा सार्वजनिक बांधकाम विभागावरील संताप वाढत असून या विभागाला जाग येणार, तरी कधी, असा प्रश्‍न नागरिक विचारत आहेत.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com