esakal | चिखलीच्या ललाटावर कधी लागेल 'टेक्सटाईल पार्क'ची टिकली?

बोलून बातमी शोधा

टेक्सटाईल पार्कसाठी असलेली जागा
चिखलीच्या ललाटावर कधी लागेल 'टेक्सटाईल पार्क'ची टिकली?
sakal_logo
By
विनोद खरे

चिखली : एमआयडीसीमध्ये तब्बल ४० हेक्टर जमीन प्रकल्पासाठी राखीव असली तरी राजकीय उदासीनतेपोटी, उद्योजकांच्या गुंतवणुकीअभावी हा भाग ओसाड आहे. 'सकाळ'तर्फे सुरू असलेल्या 'व्हायब्रंट विदर्भ' या मालिकेअंतर्गत बाबू अच्छेलाल यांनी परिसराची पाहणी केली.

इंग्रजांच्या काळापासून विदर्भातील बुलडाणा जिल्हा 'पांढऱ्या सोन्याची पंढरी' म्हणून परिचित आहे. जिल्ह्यात होणारे कापसाचे विक्रमी उत्पादन पाहता सूतगिरण्या उभारण्यात आल्या. या सूतगिरण्यांतून विविध प्रक्रियेनंतर बाहेर पडणाऱ्या कापसाच्या गठाणींना चक्क विदेशी बाजारपेठेत स्थान मिळाले. गठाणींची जागतिक बाजारपेठेत मागणी वाढावी म्हणून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी 'टेक्सटाईल पार्क' इंडस्ट्रिजचा उदय झाला. असाच भव्य पार्क चिखलीत उभारला जावा, यासाठी प्रयत्न सुरू झाले. ४० हेक्टर जागाही आरक्षित करण्यात आली. परंतु नेतृत्व 'करंटे' निघाले. सामूहिक प्रयत्नांची 'शकले' झाली. राजकारण, श्रेयवाद, कुरघोडीमुळे प्रकल्प रखडला. शेतकरी आत्महत्यांनी जिल्हा पिळवटून निघाला आहे. अनेक भगिनींच्या कपाळावरचे कुंकू पुसले गेले आहे. हे थांबवायचे असेल तर चिखलीच्या ललाटावर 'टेक्सटाईल पार्क'ची टिकली लवकरात लवकर लावणे अत्यावश्यक झाले आहे. त्यासाठी कोण हिंमतबाज पुढे येईल?, असा प्रश्न सर्व परिस्थितीची पाहणी केल्यानंतर बाबू अच्छेलाल यांनी विचारला.

सत्तर हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेले हे शहर. तालुक्यात १४८ गावांचा समावेश होतो. राष्ट्रीय महामार्गावर असल्याने छोट्या-मोठ्या उद्योगांची रेलचेल दिसते. प्रशस्त बाजार समिती, सरकारी कार्यालये, अभियांत्रिकी महाविद्यालये, शाळा, बीएमएस कॉलेज, हॉटेल्समुळे बरीच वर्दळ असते. शेतकरी, नागरिक, व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा असते. मोठी आर्थिक उलाढाल होते.

हेही वाचा: धक्कादायक! नागपुरात महिनाभरात तब्बल २२८२ कोरोनाबळी; ग्रामीण भागातही रुग्णसंख्या अधिक

चिखली येथील 'एमआयडीसी' विकसित होत आहे. येथे उद्योगधंद्यांना सुरुवातही झाली. जागाही उपलब्ध आहे. परंतु, नामांकित कंपन्या आणि मोठमोठे उद्योग नसल्याने विकासाची गती खोळंबली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने चिखली येथे 'टेक्स्टाईल पार्क' मंजूर केला. परंतु, राजकीय व शासकीय अनास्थेमुळे काम सुरू झालेले नाही. विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यात चिखली तालुक्याचा समावेश होतो. येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात कापूस पेरतो. परंतु, या कापसावर प्रक्रिया करण्याची व्यवस्था उपलब्ध नसल्याने शेतकरी बांधवांना मिळेल त्या किमतीत कापूस विकावा लागतो. कापसापासून धागा व कापड तयार करण्याची सुविधा चिखली परिसरात सुरू झाल्यास मतदारसंघातील शेतकऱ्यांना कापसाचे योग्य दाम मिळतील आणि या उद्योगातून रोजगारनिर्मिती होईल. 'टेक्सटाईल पार्क'चे काम युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी आमदार श्वेता महाले यांनी २० डिसेंबर २०२१ रोजी नागपूर येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आढावा बैठकीत स्मरणपत्रही दिले.

निसर्गाचा लहरीपणा, उत्पादित कापसाला योग्य भाव न मिळणे अशा अनेक अडचणींवर मात करीत एकट्या चिखली तालुक्यात तब्बल २५०० हेक्टरवर क्षेत्रफळात कापूस पिकविला जातो. घाटमाथ्यावरील व घाटाखालील तेरा तालुक्यांतून कापूस संकलित होतो.

हेही वाचा: कडक निर्बंधात व्यवसाय बदलण्याची वेळ; कोणी विकतो भाजीपाला, तर कोणी करतो फळविक्री

आमदार म्हणतात...

सततची नापिकी आणि सावकारीला जाचामुळे अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. सुशिक्षित बेरोजगारांना औरंगाबाद, पुणे आणि मुंबईकडे स्थलांतर करावे लागते. फडणवीस सरकारच्या काळात मंजूर 'टेक्सटाईल पार्क' सुरू झाल्यास कापूस उत्पादकांना आधार मिळेल. आत्महत्या थांबतील. रोजगार उपलब्ध होईल. युवकांचे स्थलांतर थांबेल.

-श्वेता महाले, आमदार, चिखली विधानसभा

लोकप्रतिनिधी म्हणतात... नेते आणि अधिकाऱ्यांनी खोडा घातला

चिखलीत 'टेक्सटाईल पार्क' उभा होऊ शकतो, हे ध्यानात घेऊनच धोरणात समावेश केला. जिल्ह्यातील ही एकमेव 'एमआयडीसी' आहे, जिथे यासाठी अधिकृत आरक्षण केले. परंतु, वस्त्रोद्योगाशी संबंधित तत्कालीन काही नेते व अधिकाऱ्यांनी खोडा घातला. त्यामुळेच केंद्राने मंजूर करूनही तो बाद झाला. रोजगारनिर्मिती होऊ शकली नाही.

-राहुल बोंद्रे, माजी आमदार, चिखली

'एमआयडीसी'ला 'डी-प्लस झोन'चा दर्जा दिला -

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित 'टेक्सटाईल पार्क'करिता खूप जोर लावला. उद्योजकांच्या मागणीखातर ही 'एमआयडीसी'ला 'डी-प्लस झोन'मध्ये मंजूर करवून घेतली. परंतु, त्यानंतर उद्योजक, सरकार आणि राजकारण्यांच्या उदासीनतेमुळे गती मिळाली नाही. कापूस उत्पादक, शेतमजूर आणि बेरोजगारांंच्या लाभासाठी पार्क उभा राहावा.

-भारतभाऊ बोंद्रे, माजी मंत्री

भक्कम पाठपुरावा करू -

चिखलीत टेक्सटाईल पार्कसाठी जागा आरक्षित आहे. मी वस्त्रोद्योग महामंडळाचा अध्यक्ष असताना चिखलीत टेक्सटाईल पार्क मंजूर झाले होते. परंतु, तत्कालीन पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी मुख्यमंत्र्यांना विनंती करून हा प्रकल्प खामगाव येथे करण्याचे ठरविले. त्यानंतर मी पदाचा राजीनामा दिला. पुढे त्या टेक्सटाईल पार्कचे काय झाले? याबाबत माहिती नाही. परंतु चिखली व खामगाव येथे टेक्सटाईल पार्क होण्यासाठी भक्कम पाठपुरावा करू.

-रविकांत तुपकर, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, बुलडाणा

हेही वाचा: विदर्भाची कन्या 'BRO'ची पहिली महिला कमांडिंग ऑफिसर, वाचा वैशाली हिवसेंचा लहानपणापासूनचा प्रवास

अधिकारी म्हणतात...

४० हेक्टर जमीन आरक्षित, प्रशासन कटिबद्ध

'टेक्सटाईल पार्क'साठी 'एमआयडीसी'मध्ये ४० हेक्टर जमीन २०१८ पासून राखीव ठेवली आहे. या ठिकाणी सहा भूखंडांचे आरेखन केले आहे. यंदा पाच उद्योगांसाठी 'प्लॉट'चे वाटप केले. आगामी दोन वर्षात उद्योग विकसित होतील. 'एमआयडीसी' प्रशासनाच्या वतीने उद्योजकांना प्रोत्साहन देत जास्तीत जास्त गुंतवणुकीसाठी प्रयत्न सुरू आहे.

-राजाराम गुठळे, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी, अमरावती

आरक्षित जागेवर सोयी सुविधा केल्या -

निर्धारित 'टेक्सटाईल पार्क'च्या जागेवर उद्योगांकरिता आवश्यक सोईस्कर रस्ते, पाइपलाइन करण्यात आली आहे. आगामी काळात उद्योजकांनी ‘टेक्सटाईल’ उद्योग भक्कमपणे उभारल्यास आवश्यक त्या सोयी-सुविधा वरिष्ठांच्या आदेशान्वये पुरविण्यात येतील.

-युनीत ध्रुवे सहाय्यक अधिकारी, एमआयडीसी, खामगाव

राजकारण न करता व्हावे प्रयत्न -

यावर्षी तालुक्यात २५०० हेक्टरहून अधिक क्षेत्रफळावर कपाशीचा पेरा करण्यात आला. त्यामुळे या भागात कपाशीवर प्रक्रिया करणारे उद्योग उभे राहिल्यास परिसराचा विकास होऊन रोजगारनिर्मिती मोठ्या प्रमाणात होऊ शकते. टेक्सटाईल पार्क झाल्यास कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनमानात वाढ होऊ शकते. याबाबत कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे.

-अमोल शिंदे, तालुका कृषी अधिकारी, चिखली

हेही वाचा: बाबू होणार शिपाई, पदोन्नतीचा आनंद फक्त महिनाभरच

सुनो, बाबू अच्छेलाल...

केंद्रीय मंत्री, आमदारांकडे पाठपुरावा सुरूच

कापूस उत्पादनाचा जिल्ह्याचा ६० वर्षांचा इतिहास आहे. समृद्धी महामार्ग, नागपूर ते मुंबई तसेच जालना, खामगाव रेल्वेमार्ग मंजूर झाला आहे. ‘मेगा टेक्सटाईल पार्क’ झाल्यास मागासलेपण दूर होईल. वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांना निवेदन दिले होते. आता केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, माजी आमदार चैनसुख संचेती, आमदार श्वेता महाले यांना निवेदन दिले आहे.

-अशोक अग्रवाल, अध्यक्ष, एमआयडी व्यापारी असोसिएशन, चिखली

सामूहिक प्रयत्नांची गरज

कित्येक वर्षांपासून प्रलंबित टेक्सटाईल पार्ककरिता राजकारण बाजूला ठेवून सामूहिक प्रयत्न केल्यास आमच्यासारख्या अनेक कापड व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो. यात गुंतवणूक करण्यास मोठा वाव आहे. बहुसंख्य कष्टकरी, कामगारांना रोजगार मिळू शकतो. अडचर दूर करून कामाची गती वाढवावी.

-प्रदीप जैन, हरिओम कलेक्शन, चिखली

कापड व्यावसायिकांना हवे सर्वंकष सहाय्य

शहरात विविध उद्योगांना वाव असला तरी ‘टेक्सटाईल पार्क’ झाल्यास आम्हा कापड व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो. जुनी उणी-दुणी बाजूला सारून सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करावे. कापड व्यावसायिकांना या क्षेत्रात प्रगती साधण्याकरिता सर्व प्रकारचे सहाय्य मिळाले पाहिजे.

-गौरव भोजवानी, राजकुमार कलेक्शन, चिखली

हेवेदावे सारल्यास ‘पार्क’ होईलच

‘एमआयडीसी’मध्ये अनेक उद्योग यशस्वीपणे सुरू आहेत. ‘टेक्सटाईल पार्क’ची भर पडल्यास निश्चितपणे अनेक बेरोजगारांना संधी मिळेल. चिखलीचे नावही औद्योगिक क्षेत्रात `उज्ज्वल` होईल. राजकारण, हेवेदावे, श्रेयवाद बाजूला सारून सामूहिक प्रयत्न अतिआवश्यक आहेत. तसे झाल्यास हा प्रकल्प निश्चितपणे पूर्ण होईल, ही खात्री आहे..

-प्रणव देशमुख, संचालक, हॉटेल अमृततुल्य, चिखली