there is no road in  chikhalapar village in chandrapur district
there is no road in chikhalapar village in chandrapur district

Video : प्रशासनाला "चिखलापार'ला चिखलातच ठेवायचं, म्हणूनच तर...

चिमूर (जि. चंद्रपूर) : देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल 72 वर्षे उलटून गेली. या काळात देशात भरपूर प्रगती झाली. देशाचे आधुनिकीकरण झाले. अनेक गावांचे शहरात रूपांतर झाले. अनेक राजकीय पक्षांकडून विकासाचे आश्वासन देण्यात आले. मात्र, अजूनही देशातील काही गावांमध्ये साधा पक्का रस्ताही उपलब्ध नाहीये. असेच एक गाव चिमूर तालुक्‍यात आहे.

गावात रस्ते बांधणार, गावात विकास करणार अशी अनेक आश्वासने लोकप्रतिनिधींकडून देण्यात येतात. यातूनच दरवर्षी नवीन रस्त्यांसाठी कोट्यवधीचा निधी खर्च केला जातो. मात्र, चिमूर तालुक्‍यातील चिखलापार गावात अजून पक्का रस्ताही लोकांच्या नशिबात नाही. आजही या गावात जाताना चिखल तुडवीत जावे लागते.

चिमूर नगरपरिषद क्षेत्रालगत असलेली कडमगाव गट ग्रामपंचायत. या ग्रामपंचायतीत चिखलपार गावाचा समावेश आहे. या गावाला जाण्यासाठी एकही पक्का रस्ता नाही. त्यात या गावाला नदीने चारही दिशेने वेढले आहे. त्यामुळे पावसाळ्यात गावाच्या सभोवताल पाणीच पाणी असते. यातून गावाचा संपर्क तुटतो.

कुणी रस्ता देता का रस्ता

निवडणुकीच्या तोंडावर शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी गावाला पक्का रस्ता तयार करून देण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, आज अनेक वर्षे लोटूनही पक्‍क्‍या रस्त्याचे आश्‍वासन गावाच्या नावाप्रमाणे चिखलातच दफन झाले आहे. त्यामुळे गावाला कुणी रस्ता देता का रस्ता, अशी आर्त हाक गावकरी देत आहेत.

मागील वर्षी झाले होते प्रचंड हाल

मागील वर्षी 25 ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीने गावाला बेटाचे स्वरूप आले होते. तसेच सावरगाव येथील दोन्ही तलाव तुडुंब भरून फुटण्याची शक्‍यता असल्याची माहिती 26 ऑगस्टला तत्कालीन उपविभागीय अधिकारी भय्यासाहेब बेहरे यांना मिळाली होती. त्यांनी तत्परता दाखवून चिखलापारवासींना बचाव पथकाच्या होळीच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढून चिमूर येथे आणले होते.

गावातील लोकांची होतेय वणवण

पावसाळ्यानंतर गावाला पक्का रस्ता, शुद्ध पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिल्या गेले. यानंतर गावच्या सरंपचानी या मागणीच्या पाठपुराव्यासाठी वर्षभर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चकरा मारल्या. त्यानंतर जिल्हा परिषद बांधकाम विभाग गावाला नवीन रस्ता बांधकाम करून देणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे चिखलापारला जाण्यासाठी चिखल तुडवीतच जा..अशीच इच्छा खुद्द प्रशासनाची असावी, अशी उपहासात्मक टीका गावकरी करू लागले आहेत.

प्रशासनाला समस्येशी काही देणेघेणे नाही
मागील वर्षी अतिवृष्टी झाली व गाव पाण्याने वेढले होते. प्रशासनाने गावातील लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यावेळेस प्रशासन, लोकप्रतिनिधींनी पक्‍क्‍या रस्त्याचे आश्वासन दिले. मात्र, वर्ष लोटूनही आश्वासनाची पूर्तता झाली नाही. त्यामुळे प्रशासनाला येथील नागरिकांच्या समस्येशी काही देणेघेणे नसल्याचे वाटत आहे.
- संतोष डांगे,
सरपंच, गटग्रामपंचायत, कडमगाव तथा चिखलापार

संपादन - अथर्व महांकाळ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com