अरे देवा! या व्यवसायातील कारागिरांवरही आली उपासमारीची वेळ; आता करावे तरी काय?

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 30 April 2020

हातावर पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम हा व्यवसायही बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे. 

नांदुरा (जि.बुलडाणा) : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे देशभरात लॉकडाउन असल्याने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे अनेकांच्या कामांना ब्रेक लागला आहे. अशातच सर्वसामान्यसह लाकडी सुतार काम करणाऱ्यांचा व्यवसाय देखील ठप्प झाल्याने, त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. कोरोनामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे.

सुतार समाज हा गावखेड्यात शेतकऱ्यांना शेती विषयक अवजारे बनवून देण्यासोबतच इतरही काम करतो. आणि त्यांच्या बदल्यात तो शेतकऱ्यांकडून धान्य घेतो किंवा काही लोक त्या बदल्यात पैसे देतात आणि त्यावर ते आपला उदरनिर्वाह करतात. हातावर पोट असणाऱ्या सुतार समाजाचा फर्निचर व इतर दैनंदिन लाकूडकाम हा व्यवसायही बंद असल्याने हा वर्ग अडचणीत सापडला आहे. 

आवश्‍यक वाचा - बापरे! हा जिल्हा झाला कोरोनामुक्त; मात्र, ओढावले नवे संकट

घरगुती व इतर फर्निचरचे काम बंद असल्याने सुतार कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून काम बंद असल्याने व आगामी काही दिवस काम बंद राहणार असल्याने कुटुंबाचा उदर्निवाह करण्याचा मोठा प्रश्‍न व्यावसायिंकासमोर निर्माण झाला आहे. कोरोनामुळे बाहेर काम करता येत नाही. त्यातच जीवनावश्यक वस्तू संपल्या असून रोज हातावर पोट असल्या कारणाने पैसे आणायचे तरी कोठून हा प्रश्न त्यांना सतावत आहे. सुतारकाम या क्षेत्रातील कामगार हे असंघटित कामगार आहेत. 

हेही वाचा - हृदयद्रावक : दहा वर्षीय मुलासह मातेची विहिरीत उडी अन्...वाचा

हातावर पोट असलेल्या या समाजावर कोरोना व संचारबंदीमुळे अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. आज जवळपास 80 टक्के समाज अजूनही कारागिरी व लाकडी फर्निचरचेच काम करत आहे. आता आधुनिक यंत्रांनी पारंपारिक काम करणाऱ्यांची जागा घेतली. त्याचबरोबर कोरोना व संचारबंदीमुळे सुतार व्यावसायिक पूर्णपणे खचला आहे. खेड्यापाड्यातील सुतारकाम करणाऱ्यांची स्थिती यापेक्षाही भयानक आहे.

उदरनिर्वाहाची चिंता
आधीच आधुनिक यंत्रांनी पारंपरिक काम करणाऱ्यांची जागा घेतल्याने सुतार व्यवसायात काम करणाऱ्यांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्यातच कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर संचारबंदी असल्यामुळे फर्निचर, सुतारकाम व्यवसाय बंद झाल्यामुळे हाताला काम नाही. ग्रामीण भागात काम केले तरच पैसे मिळतात. ‘काम नाही तर दाम नाही’ त्यातच आता कामच नसल्याने, दाम कोठून मिळणार. अन्नधान्यासाठी तसेच घरखर्चासाठी पैसे कुठून येणार. त्यामुळे परिस्थिती हलाखीची झाली असून, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There was also a time of famine for the artisans in Carpenter business