अमरावती विद्यापीठाच्या ऑनलाइन परीक्षांची सत्यशोधन समितीकडून चौकशी 

सुधीर भारती 
Thursday, 19 November 2020

विनाअनुदानित शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनाच्या मुद्यावर त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या सरकारने विनाअनुदानित संस्थांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता,

अमरावती ः विद्यापीठांनी घेतलेल्या ऑनलाइन व ऑफलाइन परीक्षांमध्ये झालेल्या गोंधळाची चौकशी सत्यशोधन समितीमार्फत करण्यात येत आहे. या समितीच्या अहवालात दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे तंत्र व उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले. सोबतच संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परीक्षा घेण्यात अपयशी ठरल्याचा आणि विद्यापीठाने गृहपाठ व्यवस्थित केला नसल्याचा ठपकाही ठेवला. 

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीनिमित्त अमरावतीच्या दौऱ्यावर आलेल्या ना. उदय सामंत यांनी प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेला शालेय शिक्षणमंत्री बच्चू कडू, माजी खासदार अनंत गुढे, रिपाइंचे (ग) नेते राजेंद्र गवई, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजेंद्र महल्ले, श्रीकांत देशपांडे आदी उपस्थित होते. विनाअनुदानित शिक्षकांच्या रखडलेल्या वेतनाच्या मुद्यावर त्यांनी आचारसंहिता संपल्यानंतर हा प्रश्‍न निकाली काढण्याचे आश्‍वासन दिले. गेल्या सरकारने विनाअनुदानित संस्थांना वीस टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, मात्र सत्तांतरानंतरही अनुदान मिळालेले नसल्याने असंतोष असल्याकडे त्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. 

ना. सामंत यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठावर चांगलेच ताशेरे ओढले. ते म्हणाले, या विद्यापीठाने गृहपाठ व्यवस्थित न केल्याने महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेण्याची वेळ विद्यापीठावर आली. इतर विद्यापीठांत ऑफलाइन परीक्षांचे प्रमाण तुलनेने नगण्य असताना अमरावती विद्यापीठात 43 टक्के विद्यार्थी ऑफलाइन परीक्षांना बसले. काही विद्यापीठांनी ऑनलाइन परीक्षांच्या निविदा करताना कामे राज्याबाहेरील संस्थांना दिली. त्यामध्ये गोंधळ झाला. यामुळे निविदा प्रक्रियेत घोळ झाल्याचे आक्षेप आहेत. त्यांची चौकशी सत्यशोधन समितीकडून करण्यात येत असून प्रक्रियेत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे.

मोबाईल अॅपसाठी पालकांकडून आकारले जातात पैसे, अॅप न घेतल्यास अध्यापनास नकार

 

यंदा विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये उत्तीर्णतेचे प्रमाण चौदा टक्‍क्‍यांनी वाढल्याचा उल्लेख करीत त्यांनी महाराष्ट्रातील ऑनलाइन परीक्षांना बदनाम करण्याचे काम काही लोकं व पक्षांनी केल्याचा आरोपही प्रत्यक्ष कोणाचे नाव न घेता केला. प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षक यांचे प्रशिक्षण आधी रामभाऊ म्हाळगी संस्थांसारख्या संघाशी संबंधित संस्थांमध्ये होत होते, अशी टीका करीत आता प्रशिक्षणासाठी पुणे येथे कामगार आयुक्तालयाअंतर्गत टीचर्स अकादमी उभारण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. 

साडेतीन लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार? अजूनही अर्ज प्रलंबितच

 

लोकसभा निवडणुकीत आघाडीचे उमेदवार म्हणून मी नवनीत राणा यांना समर्थन दिले होते. त्यांचा प्रचार केला. त्या विजयी झाल्यानंतर आघाडी सोडून दुसरीकडे गेल्यात, बेईमान झाल्यात, त्याला मी काय करू शकतो? 

-डॉ. राजेंद्र गवई, 
राष्ट्रीय सरचिटणीस, रिपाइं (गवई)

संपादन ः राजेंद्र मारोटकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: There will be inquiry by Satyashodhan Samiti of online exams organised by Amravati University