चोरून-लपून दारू विकणे पडले त्यांना महागात... 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 4 May 2020

गडचिरोली शहरातील लांजेडा वॉर्ड परिसरात एका शेतामध्ये दारू लपवून ठेवली असल्याची माहिती मुक्तिपथ वॉर्ड संघटनेला मिळाली. त्यांनी तालुका चमूला याची माहिती दिली. चमूने या शेतातील तणसाचे ढीग तपासले. यामध्ये लपवलेली 10 लिटर दारू सापडली.

गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी जिल्ह्यात संचारबंदी आहे. पण अशाही स्थितीत चोरून लपून गावठी दारूची विक्री तसेच मोहाची दारू गाळण्याचे प्रकार सुरू आहे. अशा ठिकाणांवर मुक्तिपथ गाव संघटन आणि तालुका चमू सातत्याने धाड टाकून साठे नष्ट करीत आहेत. शुक्रवारी (ता. 1) आणि शनिवारी (ता. 2) गडचिरोली, सिरोंचा, कोरची, चामोर्शी तालुक्‍यांतील गावांमध्ये असे साठे मुक्तिपथ गाव संघटनेने नष्ट केले. 

गडचिरोली शहरातील लांजेडा वॉर्ड परिसरात एका शेतामध्ये दारू लपवून ठेवली असल्याची माहिती मुक्तिपथ वॉर्ड संघटनेला मिळाली. त्यांनी तालुका चमूला याची माहिती दिली. चमूने या शेतातील तणसाचे ढीग तपासले. यामध्ये लपवलेली 10 लिटर दारू सापडली. यावेळी नगर परिषदेच्या कोविड 19 पथकातील चमूही उपस्थित होती. ही सर्व दारू नष्ट करण्यात आली. त्याचबरोबर महादवाडी-गोगाव मार्गावर एक इसम गावठी दारूची विकत असल्याची माहिती तालुका चमूला मिळाली. त्यांनी घटनास्थळ गाठले. त्यांना पाहताच विक्रेता व पिणाऱ्यांनी दारू तेथेच टाकून पळ काढला. सापडलेली 7 लिटर दारू तालुका चमूने नष्ट केली. सिरोंचा तालुक्‍यातील रामंजापूर येथे अशोक गद्देवार हा घरीच दारू गाळत असल्याची माहिती गाव संघटनेने शुक्रवारी मुक्तिपथ तालुका चमूला दिली. त्यांनी सिरोंचा पोलिसांच्या सहकार्याने या घरी धाड टाकली असता घरीच गाडून असलेला दोन ड्रम गुळसडवा आणि 50 किलो गूळ सापडला. हा मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी नष्ट केला व अशोकवर गुन्हा दाखल केला. 

अवश्य वाचा-  ...या तालुक्यात घडले असे काही अन् वाहू लागला दारूचा महापूर!

मोगापूर या गावातही दारू काढण्यासाठी सडवे लावल्याची माहिती मिळताच शनिवारी मुक्तिपथ तालुका चमू आणि पोलिसांनी गावातील सहा घरी छापे मारले. यात दोन घरी चार ड्रम सडवा सापडला. सोबतच दारू गाळण्याचे साहित्यही सापडले. हा सर्व मुद्देमाल नष्ट करून अजमेरा राजय्या या इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला. चामोर्शी शहरातील वाळवंटी चौक येथील तारा उंदीरवाडे हा इसम घरामध्ये दारू विकत असल्याची माहिती शुक्रवारी मुक्तिपथ तालुका चमूला मिळाली. त्यांनी पोलिसांच्या सहकार्याने त्याच्या घरी धाड टाकली असता काहीजण दारू पिताना आढळले. त्याच्याकडून पोलिसांनी 5 लिटर गावठी दारू जप्त करून त्याच्यावर गुन्हा दाखल केला. ही दारू कुठून आणली हे विचारले असता त्याने लालडोंगरी गावाचे नाव सांगितले. त्यालाच घेऊन पोलिस आणि मुक्तिपथ चमू सांगितलेल्या घरी पोहोचले असता सुजाता बाला ही महिला दारू विकत असल्याचे आढळून आले. गावठी दारूचा साठा जप्त करून तिच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. 

सरपंचाच्या शेतातच सापडला सडवा 

कोरची तालुक्‍यातील आस्वलहुडकी ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या दोडके या गावातील सरपंचाच्या शेतात असलेल्या झोपडीतच मोहसडवा सापडला. गोंदिया जिल्हा येथून जवळच असून या गावातून दारूची गोंदियात तस्करी होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे मुक्तिपथ तालुका चमूने आणखी माहिती मिळवली असता येथील सरपंच आणि तिचा भाऊ असलेला रोजगारसेवक दोघेही दारू गाळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या शेतातील झोपडीची तपासणी केली असता तब्बल 45 किलो मोहाचा सडवा सापडला. हा सर्व साठा नष्ट करण्यात आला. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They were selling liquor secretly and Muktipath Took action