ते पुरवीत होते क्वारंटाइन मजुरांना दारू...मग मुक्तीपथने दिली धडक

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 9 May 2020

क्वारंटाइन केल्या मजुरांना दारू पुरविण्यासाठी दारूतस्करांनी नवीनच शक्कल लढविली आहे. चामोर्शी तालुक्‍यातील रेखेगाव येथील शाळेत क्‍वारंटाइन केलेल्या लोकांसाठी दारूचा पुरवठा करणाऱ्या तिघांकडून 40 लिटर दारू मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जप्त केली. तीन दुचाकी व एक सायकलही ताब्यात घेतली. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला.

गडचिरोली : शाळांमध्ये क्‍वारंटाइन असलेल्या मजुरांवर दारूतस्करांची नजर आहे. स्थानिक विक्रेत्यांमार्फत त्यांना दारूचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ग्रामीण भागात बहुतांश शाळा या गावाबाहेर असल्याने बाहेरून आलेल्या नागरिकांना तेथे क्वारंटाइन करून ठेवले जात आहे.

त्यातच सतत एकटेपणामुळे क्‍वारंटाइन झालेल्या मजुरांकडून मोहाच्या दारूची मागणी होत असल्याने याचा फायदा अवैध दारूविक्रेत्यांनी घेतला आहे. मात्र, हा प्रकार मुक्तीपथ संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने दारूविक्रेत्यांच्या मनसुब्यावर पाणी फेरले आहे.

चामोर्शी तालुक्‍यातील रेखेगाव येथील शाळेत क्‍वारंटाइन केलेल्या लोकांसाठी दारूचा पुरवठा करणाऱ्या तिघांकडून 40 लिटर दारू मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी जप्त केली. तीन दुचाकी व एक सायकलही ताब्यात घेतली. हा सर्व मुद्देमाल ताब्यात घेत पोलिसांनी तिघांवरही गुन्हा दाखल केला. भास्कर सातपुते, ओंकार शेंगर आणि प्रफुल्ल उराडे अशी आरोपींची नावे आहेत.

जाणून घ्या : बापरे! आंतरराष्ट्रीय धावपटूवर आली जेवणासाठी रांगेत लागण्याची वेळ

कॅन आढळली मोहाची दारू

बुधवारी (ता. 7) सायंकाळी सातच्या सुमारास आमगाव येथून हे तिघे दारूच्या कॅन घेऊन रेखेगाव मार्गे जात होते. त्यांच्या कडील कॅन आणि संशयित हालचाल पाहून रेखेगाव येथील मुक्तिपथ गाव संघटनेच्या महिलांनी त्यांना अडवले. त्यांच्याजवळील कॅन तपासल्या असता यात मोहाची दारू असल्याचे निदर्शनास आले. रेखेगाव, आनंदपूर तसेच आसपासच्या इतरही गावात क्वारंटाइन असलेल्या लोकांना ही दारू पुरवली जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले.

तीनही आरोपींना अटक

येथील पोलिस पाटील मोता नरोटे यांनी ही माहिती आमगावच्या सरपंच भविका देवतळे आणि ग्रा पं. सदस्य प्रेमिला बैस यांना दिली. त्यांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. घोट पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तीनही आरोपींना वाहनांसह ताब्यात घेतले.

हेही वाचा : बिअर शॉपीचे नूतनीकरण करून देतो म्हणाला अन् जाळ्यात फसला

दारूमुळे कोरोना संसर्गाचा धोका

गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावातून शेकडो नागरिक तेलंगणा राज्यात मिरची तोडण्यासाठी गेले होते. यातील परत आलेल्या लोकांना कोरोना संसर्ग रोखण्यासाठी गावाच्या बाहेर असलेल्या शाळा व इतरही ठिकाणी क्‍वारंटाइन केले जात आहे. मात्र या लोकांना आसपासच्या गावातील अनेक जण दारूचा पुरवठा करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना
गावातील शाळा व सरकारी इमारतीमध्ये क्वारंटाइन केलेल्या नागरिकांना गावठी दारूचा पुरवठा केला जात असल्याच्या तक्रारी आमच्या कार्यकर्त्यांकडून प्राप्त झाल्या आहेत. यासंदर्भात आम्ही गाव संघटनेच्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असून पोलिसांनाही कळविले आहे.
- डॉ. मयूर गुप्ता, संचालक मुक्तिपथ संघटना, गडचिरोली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: They were supplying alcohol to the quarantine labours