हॉटेलात झाली चोरी; चोरट्याने केले पोटभर जेवण मात्र पैसे जैसे थे.. चोरीला गेले काय?  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

चंद्रपुरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे 10 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे हातावर पोटअसणाऱ्या गरिबांचे जेवणाचे हाल झाले आहेत. त्यात काही जणांकडे रोजगार नाही,

नागपूर : गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगभरात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले आहे.  त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. गरीब आणि गरजूंना दोन वेळचे जेवणही मिळू शकत नाहीये. दररोज याबद्दलचे भयाण वास्तव समोर येत आहे. अशीच एक मन हेलावून टाकणारी आणि सध्याच्या हृदयद्रावक परिस्थितीची  जाणीव करून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली आहे. 

चंद्रपुरात कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे 10 तारखेपासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. त्यामुळे हातावर पोटअसणाऱ्या गरिबांचे जेवणाचे हाल झाले आहेत. त्यात काही जणांकडे रोजगार नाही, त्यामुळे हातात पैसे नाहीत. मग खायचे काय, असा प्रश्न गरिबांना पडला आहे. मात्र जगण्यासाठी काहीतरी करावे लागणार म्हणून एका युवकाने अजब चोरी केली आहे.  

अधिक माहितीसाठी - बारा दिवसांची चिमुकली गंभीर आजाराने ग्रासलेली अन् घरात अठरा विश्व दारिद्र्य, मग काय करणार ते मायबाप

या चोराने चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमध्ये चोरी केली. मात्र ही चोरी पैशांची नसून चक्क जेवणाच्या पदार्थांची होती. चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला हॉलेटमधील गल्ला उघडला आणि रक्कम मोजून जागेवर ठेवली. त्यानंतर थेट किचन गाठत पोटभर जेवला आणि खिशात पदार्थ भरुनही नेले मात्र पैशांची चोरी केली नाही. 

नक्की काय घडले 

भूक आणि तहानेने व्याकुळ झालेल्या या चोराने आधी फ्रिजमधून पाण्याची बाटली काढली आणि पाणी प्यायला.  त्यानंतर त्याने खाद्य पदार्थाकडे मोर्चा वळवला. हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही पदार्थ घरच्या भुकेल्या कुटूंबियांसाठी खिशात भरून घेऊन गेला. त्यानंतर तो गल्ल्यावर जाऊन बसला. टेबलाचे ड्रॉव्हर उघडून बघितले. त्यात त्याला पैशांची गड्डी दिसली. मात्र ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..

मालकाने केली नाही पोलिस तक्रार 

दुसऱ्या दिवशी हॉटेलमध्ये सगळे अस्ताव्यस्त दिसल्यामुळे मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते जसेच्या तसे दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलिस तक्रारही केली नाही. या घटनेमुळे कोरोनामुळे गरिबांवर आलेल्या कठीण परिस्थितीचे वास्तव समोर आले आहे. 

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: thief theft all the food products in hotel instead of money