'तुला उडवू का' म्हणत तिच्यावर ताणली रिव्हॉल्व्हर; काय आहे प्रकरण... 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 जुलै 2020

सचिन व मोहित हे दोघे एमएच 27 बीएस 9543 क्रमांकाच्या बुलेटने त्या युवतीच्या घरी पोहोचले. तिच्या घरात घुसले व तिला धमकी दिली होती.

मरावती : शहरातील एका युवतीच्या घरात घुसून तिच्यावर रिव्हॉल्व्हर ताणली. 'नाही म्हटले नं... तुला उडवू का', अशी धमकी दिली. या प्रकाराने युवती कमालीची घाबरली. युवकास अटक करण्यात राजापेठ पोलिसांना अखेर यश आले. 

सचिन रमेश लांडगे (वय 27, रा. नेताजी चौक, यवतमाळ), असे अटक झालेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील 24 वर्षीय पीडित युवतीच्या तक्रारीवरून राजापेठ पोलिसांनी 22 जुलै रोजी सचिन व त्याचा साथीदार मोहित मणीलाल प्रजापती (वय 27, रा. महावीरनगर, अमरावती) या दोघांविरुद्ध घरात घुसून विनयभंग, मारहाण, देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हर ताणून धमकी देणे, मोबाईल फोडून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. प्रजापतीला पोलिसांनी आधीच अटक केली होती. 

22 जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास सचिन व मोहित हे दोघे एमएच 27 बीएस 9543 क्रमांकाच्या बुलेटने त्या युवतीच्या घरी पोहोचले. तिच्या घरात घुसले व तिला धमकी दिली होती. सहायक पोलिस निरीक्षक योगेश इंगळे, प्रशाली काळे, रंगराव जाधव, राजेश राठोड, अशोक वाटाणे, सचिन पवार, फिरोज खान, छोटेलाल यादव, राजेश बुरेले, किशोर महाजन, दिनेश भिसे, दानीश इक्‍बाल, राहुल ढेंगेकर, अतुल संभे, अमोल खंडेझोड, दीपक श्रीवास यांच्या पथकाने त्या युवकाच्या अटकेची कारवाई केली. सचिनकडून गुन्ह्यात वापरलेली बुलेट, रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली. 
 
हेही वाचा : ती ठरली एकलव्य! अपघातात गमावला अंगठा, तरी मिळविले चक्‍क एवढे टक्के गुण 

अकोला, यवतमाळ, वर्धेतही गुन्हे 
अमरावतीत एकतर्फी प्रेम प्रकरणातून रिव्हॉल्व्हरच्या धाकावर उडविण्याची धमकी देणाऱ्या सचिन लांडगेविरुद्ध अकोला, हिंगणघाट, यवतमाळ व राजापेठ ठाण्यातसुद्धा खंडणी, हत्येचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगण्याप्रकरणी यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, असे पोलिस निरीक्षक किशोर सूर्यवंशी यांनी सांगितले. 

नागपूरच्या तकिया वस्तीतून अटक 
अमरावतीच्या घटनेनंतर तो हिंगणघाट, यवतमाळ नागपुरात थांबला होता. त्याला नागपूरच्या धंतोली येथील तकिया वस्तीमधून अमरावती पोलिसांनी अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Threatened the young waoman