अवैध व्यवसायाला पाठबळ देणे भोवले, दिग्रसचे तीन पोलिस निलंबित

सूरज पाटील
Wednesday, 18 November 2020

दिग्रस शहरातील गवळीपुरा भागात रेशन दुकानात छापा टाकला होता. कारवाई न करता गुलाब नौरंगाबादे यांच्या मुलाकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील 30 हजार रुपये स्वीकारले. एसीबीकडे तक्रारदार गेल्याची माहिती मिळताच तिघेही रजेवर गेलेत.

यवतमाळ : जिल्ह्यात रुजू होताच पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी अवैध धंदे चालणार नाहीत, अशी सक्त ताकीद पोलिसांना दिली होती. तरीदेखील रेशन दुकानात छापा टाकून कारवाई न करता 30 हजार रुपयांची तोडी केली. अवैध व्यवसायाला पाठबळ दिले. या घटनेची गंभीर दखल घेत जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिग्रस पोलिस ठाण्यात कार्यरत डीबी पथकातीन तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या कारवाईने पोलिस वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. 

हेही वाचा - बावनकुळेंनी केलेल्या काळ्या धंद्यामुळेच भाजपने त्यांचे...

नितीन वास्टर, अरविंद कोकाटे व अरविंद जाधव, अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. जुगार, गुटखा, अवैध व्यवसायावर छापा टाकून लाचेची मागणी करणे, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस न आणता स्वत:साठी पैशांची मागणी करणे, पोलिस ठाण्याची गोपनीय माहिती पुरविणे, डीबी पथकात नेमणुकीसाठी राजकीय दबाव आणणे, अवैध धंदे व्यावसायिकांच्या संपर्कात राहून पार्टनरशिपमध्ये ठेवण्यास प्रवृत्त करणे, चोरीच्या गुन्ह्यांत अडकविण्याची धमकी देणे, छापा टाकण्यासाठी बाहेरचे पोलिस आल्यास माहिती पुरविणे आदी शिस्तभंगाचा ठपका तिघांवर ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा - नागपूर पदवीधर निवडणूक : संदीप जोशींसह सात उमेदवारांची...

धक्कादायक बाब म्हणजे, दिग्रस शहरातील गवळीपुरा भागात रेशन दुकानात छापा टाकला होता. कारवाई न करता गुलाब नौरंगाबादे यांच्या मुलाकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील 30 हजार रुपये स्वीकारले. एसीबीकडे तक्रारदार गेल्याची माहिती मिळताच तिघेही रजेवर गेलेत. या घटनेची गंभीर दखल पोलिस अधीक्षकांनी घेतली. वरिष्ठांच्या आदेशाला डावलने तिघांनाही भोवले. निलंबन कालावधीत त्यांना पोलिस मुख्यालयात राहावे लागणार आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: three police suspended in digras of yavatmal