कुठे आहे मंदी...  गतवर्षीच्या तुलनेत तब्बल तिप्पट वाहनांची खरेदी

रूपेश खैरी
Monday, 26 October 2020

यंदा कोरोनामुळे दसऱ्याच्या आनंदवर विरजण पडले असले तरी वाहन खरेदीतून नागरिकांनी तो साजरा केल्याचे दिसून आले. आजपर्यंत दसऱ्याच्या मुहूर्ताला झालेली ही सर्वाधिक खरेदी म्हणता येईल.

वर्धा  : वाहन खरेदीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधत वर्धा येथे अनेकांनी वाहन खरेदी केली. या एकाच दिवशी वर्धेत तब्बल ८९ दुचाकी आणि १३ चारचाकी वाहनांची खरेदी झाली. लॉकडाउनच्या काळानंतर एकाच दिवशी एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहनांची खरेदी झाल्याने उपप्रादेशिक परिवहन विभागाला चांगलाच महसूल मिळला. 

यंदा कोरोनामुळे दसऱ्याच्या आनंदवर विरजण पडले असले तरी वाहन खरेदीतून नागरिकांनी तो साजरा केल्याचे दिसून आले. आजपर्यंत दसऱ्याच्या मुहूर्ताला झालेली ही सर्वाधिक खरेदी म्हणता येईल. गत वर्षी दसऱ्याच्या दिवशी सहा लाख ५१ हजार २०२ रुपयांचा महसूल जमा झाला होता. 

या महसुलाच्या तुलनेत यंदा जमा झालेला महसूल हा तिप्पटच म्हणावा लागले. अनेक दिवसांपासून महसुलाच्या प्रतीक्षेत असलेल्या उपप्रादेशिक परिवहन विभागाला एकाच वेळी तीन दसऱ्यांचा महसूल मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - आई महिनाभरापासून बेपत्ता असताना बहिणींचे झाले अपहरण; आरोपीचे नाव समोर येताच सर्वांना बसला धक्का

 वर्धा येथे दोनचाकी वाहनांची सात आणि चारचाकी वाहनांची दोन दुकाने आहेत. या दुकानातून या वाहनांची खरेदी करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्ताला या दुकानांत वाहन खरेदीसाठी नागरिकांची चांगलीच गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. वाहनांच्या किमती वाढल्याने एकाच दिवसात एवढ्या मोठ्या प्रमाणात खरेदी होण्याची ही पहिलीच वेळ असल्याच सांगण्यात येत आहे. बाजारात विशेष रेलचेल नसताना वाहनांची झालेली ही उचल अनेक दिवसांपासून बंद असलेले व्यवहार सुरळीत होत असल्याचे संकेत देत आहे. 

लॉकडाउननंतर अनेकांनी साधला दसऱ्याचा मुहूर्त 

लॉकडाउनमध्ये वाहनांची सर्वच दुकाने बंद होती. या काळात अनेकांची वाहन खरेदीची इच्छा होती. आता दुकाने सुरू झाल्याने अनेकांकडून दसऱ्याचा मुहूर्त साधण्यात आला आहे. कोरोना संक्रमण काळात दसऱ्याच्या दिवशी गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट वाहनांची खरेदी झाल्याने सर्वत्र चर्चा आहे. 
 

२१ लाख रुपयांचा महसूल

दसऱ्याच्या दिवशी ८९ दुचाकी आणि १३ कारची खरेदी झाली. यातून २१ लाख रुपयांचा महसूल विभागाला प्राप्त झाला. गतवर्षीच्या तुलनेत हा महसूल तिप्पट म्हणता येईल. लॉकडाउनच्या काळात बंद असलेल्या दुकानांमुळे एकाच दिवशी एवढी खरेदी झाली असावी. 
- विजय तिराणकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी 

संपादन  : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three times more vehicles purchased than last year in Dasara festival