esakal | टिल्लूपंप लावायचे नाही तर पाणी पाणी करत मरायचे का? आरमोरीवासीयांचा संतप्त सवाल
sakal

बोलून बातमी शोधा

टिल्लूपंप लावायचे नाही तर पाणी पाणी करत मरायचे का?

टिल्लूपंप लावायचे नाही तर पाणी पाणी करत मरायचे का?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

आरमोरी (जि. गडचिरोली) : शहराला गाढवी आणि वैनगंगा या नद्यांवरून पाणीपुरवठा होतो. दोन्ही नद्यांवरील योजनांद्वारे शहरवासीयांना दररोज सात लाख लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या लोकसंख्येनुसार सध्या पाण्याची मागणी तिपटीने वाढली. शहराची लोकसंख्या तीस हजारांवर असताना लोकसंख्येच्या प्रमाणात पाणीपुरवठा पुरेसा नाही. प्रत्येकाला दिवसभरात जवळपास ७० लिटर पाण्याची गरज असते. त्यानुसार आरमोरी शहराला दररोज २१ लाख लिटर पाण्याची गरज आहे; मात्र नळाद्वारे फक्त सहा लाख ८० हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. (Tillu-pump-Water-supply-Terrible-water-problem-Armory-Gadchiroli-District-News-nad86)

आरमोरी शहराला कधीच नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे काही जण सर्रास टिल्लूपंपाचा वापर करतात. त्यामुळे उर्वरित घरांना पाणीपुरवठाच होत नाही. त्यामुळे अर्धे शहर रोज तहानलेले राहते. टिल्लूपंप वापरणाऱ्यांवर कारवाई करण्याची भाषा नगरपरिषदेकडून केली जाते. परंतु, टिल्लूपंप वापरणे चुकीचे असले तरी, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना हा पर्याय निवडावा लागतो. टिल्लू पंप लावायचे नाही तर पाण्याविना मरायचे का, असा प्रश्न स्थानिक प्रशासनाला विचारतात. वाढत्या लोकसंख्येनुसार पाणीपुरवठा हीच आरमोरीची खरी गरज आहे. सध्या शहरात होणारा पाणीपुरवठा पुरेसा नाही. त्यामुळे या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हेही वाचा: अमरावती : वाहनातून साडेतीन कोटींची रक्कम पकडली, सहा जण ताब्यात

आरमोरी शहरात दोन-अडीच हजार नळ कनेक्शनधारक आहेत. ५० टक्के नागरिकांनी नळाला टिल्लू पंप लावल्याने उर्वरित बरेच जण पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. शहराला वैनगंगा नदीवरून पाणीपुरवठा होतो. पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी दोन भागात विभागली जाते. एका भागात सकाळी तर दुसऱ्या भागात दोन-तीन दिवसाआड सायंकाळी पाणीपुरवठा होतो. म्हणजेच शहराला महिन्यातून केवळ नऊ ते दहा दिवस पाणीपुरवठा होतो. असे असताना काही नळ कनेक्शनधारक नळाला सर्रास टिल्लू पंप लावून स्वतःची तहान भागवतात.

दुसरीकडे उर्वरित घरांपर्यंत पाणीच पोहोचत नाही. टिल्लूपंपधारकांबाबत नागरिकांनी अनेकदा नगर परिषदेकडे तक्रार केली, निवेदन दिले; परंतु प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांनी निवेदनाला केराची टोपली दाखवली. आरमोरी नगरपरिषदेचे काही कर्मचारी, पदाधिकारी नळाला टिल्लूपंप लावत असल्याने ते नागरिकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असावे, अशी शक्यता स्थानिकांमधून व्यक्त होते. सहा महिन्यांपूर्वी नगरपरिषदेने टिल्लूपंप लावणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले होते; परंतु अद्याप कारवाई झाली नाही.

हेही वाचा: जुळ्या बहिणींनी वयाच्या अकराव्या वर्षी उभा केला व्यवसाय

टिल्लूपंप वापरण्याची गरज का पडते?

वाढत्या लोकसंख्येनुसार होणारा पाणीपुरवठा अपूर्ण आहे. नागरिकांच्या घरांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने नाइलाजाने त्यांना टिल्लू पंप लावावा लागतो. ज्यांच्याकडे टिल्लूपंपाची सोय नाही त्यांना पाणी मिळू शकत नाही. त्यामुळे या प्रकारासाठी केवळ टिल्लू पंपधारकांना जबाबदार धरता येणार नाही. अपुऱ्या पाणीपुरवठ्यासाठी नगरपरिषदसुद्धा तेवढीच जबाबदार आहे. नगरपरिषदेने नियमित पाणीपुरवठा केला तर टिल्लू पंपधारकांना पंप लावण्याची गरजच पडणार नाही. त्यामुळे या समस्येसाठी फक्त पंपधारकच जबाबदार नसून, प्रशासनसुद्धा तेवढेच कारणीभूत आहे.

नगरपरिषद झाली; पण पाणी मिळाले नाही

ग्रामपंचायत ते नगरपंचायत, नगरपंचायत ते प्रशासक, प्रशासक ते नगरपरिषद असा प्रवास आरमोरीने केला. मात्र प्रत्येकवेळी पाण्याअभावी नागरिकांचा घसा कोरडाच राहिला. गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या आरमोरीला २०१४ मध्ये नगरपंचायत घोषित करण्यात आले. तेव्हा काही नागरिकांनी पाण्याची मागणी रेटून धरली. हा मुद्दा बराच काळ उच्च न्यायालयात प्रलंबित राहिला. २०१९ मध्ये नगर परिषद अस्तित्वात आली. ग्रामपंचायत असताना पाणीप्रश्नावरून स्थानिकांनी ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. २०१९ मध्ये नगर परिषदेची निवडणूक झाली. त्यावेळी नगरपरिषदेवर भाजपने सत्ता स्थापन केली. नगर परिषद निर्माण होऊनही आरमोरीकरांची पाण्याअभावी पंचायतच झाली. आरमोरीत अनेक बडे नेते राहात असताना नागरिकांना नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो, अशी खंत नागरिकांनी व्यक्त केली.

हेही वाचा: समाधान होईपर्यंत साडेतीन कोटी देऊ नका; न्यायालयात अर्ज

शहरातील पाणीपुरवठ्याची समस्या लक्षात घेता त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. जुनी पाइपलाइन प्राधान्याने बदलण्यात येईल. पाइपलाइन वारंवार फुटण्याच्या समस्येमुळे पाणीपुरवठा खंडित होतो. तात्पुरत्या पाणीपुरवठ्यासाठी लघू पाणीपुरवठा योजनेतून आठ टाके मंजूर करण्यात आले. यामुळे वॉर्डावॉर्डांत सुरळीत पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय एक हजार लिटर क्षमतेच्या नवीन दहा टाक्या मंजूर आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे २९ कोटींचा आरक्षण प्रस्ताव शासनाने मंजूर केला. काही दिवसात योजनेला मंजुरी मिळाल्यास ही समस्या मार्गा लागेल.
- कृष्णा गजबे, आमदार आरमोरी विधानसभा क्षेत्र
गेल्या अनेक वर्षांपासून आरमोरीवासीयांचा पाणीप्रश्न कायम आहे. अर्ध्याहून अधिक नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागते. तर अर्ध्या शहरात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. कधी कधी दोन दोन दिवसाआड पाणीपुरवठा होतो. कमी पाणीपुरवठ्यासाठी पाइपलाइन फुटण्याचे कारण सांगितले जाते. आरमोरी नगरपरिषदेने पाणीपुरवठ्याच्‍या प्रस्तावित योजनेला मंजुरी देऊन लवकरात लवकर पाणीसमस्या सोडवावी. नागरिकांना दररोज आणि पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नगरपरिषदेने प्रामाणिक प्रयत्न करावे. अन्यथा आरमोरीकरांची पाणीसमस्या कधीच सुटू शकणार नाही.
- हरिराम वरखडे, माजी आमदार

(Tillu-pump-Water-supply-Terrible-water-problem-Armory-Gadchiroli-District-News-nad86)

loading image
go to top