esakal | यवतमाळमधील हागणदारीमुक्ती कागदावरच, दीड हजारापेक्षा अधिक शौचालयांचे काम अपूर्ण
sakal

बोलून बातमी शोधा

toilet constructions still not complete in yavatmal

प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे, यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी तसे निर्देशही देण्यात आलेले आहेत. निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण 48 हजार 597 नागरिकांकडे शौचालये नव्हती. अशापरिस्थितीत शौचालयांचे बांधकाम मिशन मोडवर घेण्यात आले होते.

यवतमाळमधील हागणदारीमुक्ती कागदावरच, दीड हजारापेक्षा अधिक शौचालयांचे काम अपूर्ण

sakal_logo
By
चेतन देशमुख

यवतमाळ : जिल्हा हागणदारीमुक्त झाला आहे, असे असले तरीदेखील नव्याने तब्बल दोन हजारांवर नागरिकांकडे शौचालये नसल्याची बाब नुकत्याच घेण्यात आलेल्या नोंदीत समोर आली आहे. सध्या 47 हजारांवर शौचालयांचे काम पूर्ण झाले असून, दीड हजारांवर शौचालये अपूर्ण आहेत. 

प्रत्येकाच्या घरी शौचालय असावे, यादृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी तसे निर्देशही देण्यात आलेले आहेत. निर्देशानुसार जिल्ह्यातील एकूण 48 हजार 597 नागरिकांकडे शौचालये नव्हती. अशापरिस्थितीत शौचालयांचे बांधकाम मिशन मोडवर घेण्यात आले होते. त्यानुसार जिल्हा परिषद पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 59 शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले. आणखी एक हजार 538 शौचालयांचे बांधकाम अपूर्ण आहेत. येत्या काळात हे बांधकाम पूर्ण होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. अशातच शासनाने शौचालय नसलेल्यांच्या नव्याने नोंदी घ्याव्यात, असे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार आतापर्यंत दोन हजारांवर शौचालय नसलेल्या लाभार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. त्यात आर्णी तालुक्‍यात 192, बाभूळगाव 161, दारव्हा 233, दिग्रस 31, घाटंजी 13, कळंब 27, केळापूर 124, महागाव 10, मारेगाव 297, नेर 33, पुसद 177, उमरखेड 183, वणी 52, यवतमाळ 125, झरी जामणी 132 आदी लाभार्थ्यांच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. येत्या काळातही सर्व्हे सुरू राहणार असून, आणखी शौचालय नसलेल्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

हेही वाचा - शेपूट नसलेला श्वान बघितला ना? कधी प्रश्न पडला, का...

शौचालय नसलेल्यांची संख्या वाढतेय -
विशेष म्हणजे दोन ते तीन वर्षांपूर्वी जिल्हा हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्याचा राज्यस्तरावर सत्कार करण्यात आला होता. त्यामुळे नव्याने लाभार्थ्यांची संख्या राहणार नाही, असे दिसून येत होते. मात्र, नवीन लाभार्थ्यांची संख्या बऱ्यापैकी समोर येत असल्याचे दिसून येत आहे. 

हेही वाचा - वर्धा नदीत सापडली दुर्मीळ "बोद" मासोळी,...

अनेक गावांमधील शौचालयांचा वापर नाही -
जिल्ह्यातील ग्रामीण भागात बहुतांश नागरिकांनी शौचालयांचे बांधकाम पूर्ण केले आहे. असे असले तरी शौचालयांचा वापर होत नसल्याची स्थिती समोर येत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शहरीभागातही ही संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे केवळ कागदावर आकड्यांचा खेळ झाला का, असा प्रश्‍न आता उपस्थित केला जात आहे.