आता वाहतूक पोलिस दलात "ट्रॅफिक दूत' 

 Traffic messenger now in traffic police force
Traffic messenger now in traffic police force

नागपूर : शहरातील कायदा व सुव्यवस्थेसह वाहतूक व्यवस्था ताळ्यावर आणण्यासाठी पोलिस आयुक्‍तांनी "ट्रॅफिक दूत' नावाची संकल्पना साकारली आहे. वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी तसेच स्वयंस्फूर्तीने वाहतूक व्यवस्था सांभाळण्यासाठी युवकांची मदत घेण्यात येणार आहे. यासाठी युवकांनी मोठ्या प्रमाणात या उपक्रमात सहभाग घ्यावा, असे आवाहन वाहतूक पोलिस उपायुक्‍त चिन्मय पंडित यांनी केले. 

नागपुरात दरवर्षी लाखो वाहनांची भर पडत आहे. तसेच शहरात अनेक ठिकाणी रस्ते बांधणीची कामेही सुरू आहेत. वाढती वाहनसंख्या आणि लोकसंख्या पाहता शहरातील पायाभूत सुविधांवर ताण पडत आहे. शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी तसेच वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय आणि डीसीपी चिन्मय पंडित यांनी "ट्रॅफिक दूत' हा उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस, होमगार्ड, निवृत्त सैनिक, एनसीसी कॅडेट्‌स आणि एनएसएसचे विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

या उपक्रमात सहभागी होऊ इच्छुकांनी पोलिस उपायुक्‍त (वाहतूक) कार्यालयात संपर्क साधून नोंदणी करावी. ट्रॅफिक दूत महत्त्वाच्या चौकात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी किंवा ऍम्बुलन्स किंवा स्कूल बसला वाहतुकीतून रस्ता काढून देण्यासाठी तसेच झेब्रा क्रॉसिंग, पादचारी, स्टॉप लाइन तसेच वाहतुकीसंदर्भातील नियमांची माहिती वाहनचालकांना देतील.

"टॉप टेन' स्वयंसेवकास वाहतूक शाखेकडून प्रमाणपत्र बहाल करण्यात येणार आहे. महाविद्यालयीन तरुणांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन पोलिस आयुक्‍तांनी केले आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासोबत एक सजग नागरिक म्हणून कर्तव्य पार पाडण्याची मोठी संधी असल्याने तरुणांनी मोठ्या संख्येने पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. 

गैरकामांसाठी उपयोग होण्याची शक्‍यता 

सर्वच पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी "पोलिस मित्र' ओळखपत्र असणाऱ्या काही युवकांना आपल्या दलात सहभागी करून घेत होते. पोलिस मित्रांच्या माध्यमातून अवैध धंदेवाल्यांकडून वसुलीचे काम त्यांना सांगण्यात येत होते. तेच पोलिस मित्र काही दिवसांत स्वतंत्र टोळी तयार करून अवैध धंदेवाल्यांना ब्लॅकमेल करण्याचे काम करतात, अशी चर्चा आहे. गेल्या 15 दिवसांपूर्वीच इंदोरा वाहतूक शाखेतील बकाल नावाच्या पीएसआयने आपल्या घराजवळ राहणाऱ्या युवकाच्या हाती चक्‍क ब्रिथ ऍनालायझर आणि पॉस मशीन देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता तर स्वतः पोलिस उपायुक्‍तच वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी "यूथ' भरणार आहेत. त्यामुळे या दूतांचा पोलिस कर्मचारी गैरकामांसाठी उपयोग करण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com