esakal | वाहतूक पोलिसांचा अजब खाक्‍या; कागदपत्र असतील तरी फाडतात चालान;  वाहनचालक त्रस्त
sakal

बोलून बातमी शोधा

traffic police asked for money even after showing all documents

गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिक कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीने बेजार झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेल्या आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे.

वाहतूक पोलिसांचा अजब खाक्‍या; कागदपत्र असतील तरी फाडतात चालान;  वाहनचालक त्रस्त

sakal_logo
By
दीपक फुलबांधे

भंडारा : दुचाकी व चारचाकी वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांकडे ठोकळ मानाने वाहतूक परवाना, वाहनाचे दस्ताऐवज नसल्यास तसेच वाहतूक नियमांची पायमल्ली केल्यास कारवाई केली जाते. परंतु, यातील कुठल्याही नियमांचा भंग न करणाऱ्या वाहनचालकांना धमकावून तुम्ही हुज्जत घालू नका अन्यथा कोणतेही कारण नसतानाही त्रुटी काढून तुमच्याकडून दंड वसूल करू अशा पद्धतीने धमकाविण्याचा अजबगजब कारभार खांबतलाव येथील शीतला माता मंदिर चौकात वाहतूक पोलिसाकडून सुरू आहे.

गेल्या सात महिन्यांपासून सर्वसामान्य नागरिक कोव्हिडमुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीने बेजार झाले आहेत. सर्वसामान्य नागरिकांचा रोजगार हिरावल्या गेल्या आहे. आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट आहे. व्यापारी, लहानमोठे व्यावसायिक, रोजंदारी मजूर व सर्वच क्षेत्रातील लोकांचे हाल बेहाल आहेत. मात्र, अशाही विषम वातावरणात मिळेल तसे काम करून रोजगार करणाऱ्या लोकांना दुसरीकडे पोलिस त्रास देत असल्याचे दिसून येते.

हेही वाचा - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावे आहेत तब्बल इतके गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड; वाचून तुम्हालाही नक्की वाटेल अभिमान

कोरोनाविरुद्धच्या लढ्यात पोलिसांनी दिलेले योगदान महत्त्वाचे आहे, यात दुमत नाही. परंतु, पोलिस विभागातील काही कर्मचारी विनाकारण नागरिकांना वेठीस धरीत असल्याचे दिसून येते. शहरातील शीतला माता मंदिर खांबतलाव चौक हा वर्दळीचा आहे. या भागातून दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. खातरोडवर शहरातील जास्तीत जास्त वसाहती आहेत. शिवाय तुमसरकडे जाण्यासाठी बसगाड्या, ट्रक व इतर वाहने याच चौकातून मार्गस्थ होतात. या ठिकाणी वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसाची नियुक्ती असते. 

मात्र, येथील वाहतूक पोलिस कर्तव्यात फारकत करीत असल्याचे दिसून येते. त्यांचे लक्ष वाळू वाहून नेणारे ट्रॅक्‍टर, अवजड ट्रक याकडे जास्त असते. बऱ्याचदा ते कर्तव्य बजावताना कमी व बाजूच्या पानठेल्यात जास्त दिसून येतात. या मार्गाने जाणाऱ्या सामान्य वाहनधारकांना मात्र हे ट्रॅफिक पोलिस नाहक त्रास देत असल्याचे दिसून येते. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनचालकांना अडवून कोणत्या ना कोणत्या बहाण्याने आपले खिसे कसे गरम करता येईल, यासाठी ते सावज शोधताना दिसून येतात. वाहनधारकाकडे वाहतूक परवाना व इतर सर्वच प्रकारचे दस्ताऐवज असल्यावरसुद्धा त्याला नाहक थांबवून ठेवणे, धमकावणे असे प्रकार सुरू आहेत. 

संबंधितांनी याबाबत आक्षेप घेतला असता, उगीच आवाज वाढवू नका, अन्यथा आम्हाला कुठल्याही कारणाखाली तुमच्याकडून दंड वसूल करणे माहित आहे, अशी तंबी दिली जाते. याबाबत आपबिती घडलेल्या अनेकांनी आपली व्यथा सकाळ कार्यालयात मांडली. सध्या कोरोनाचे प्रमाण वाढले आहे. दरदिवशी रुग्ण वाढत आहेत. याशिवाय इतर व्हारयल आजारांनीसुद्धा डोके वर काढले आहे. आजारी रुग्णांना घेऊन काही बाहेरगावचे नागरिक ट्रिपलसीट दवाखान्यात जाण्यासाठी येथून मार्गस्थ होतात.

आजारी नागरिकांचीही अडवणूक 

आजारी रुग्णाला एकट्याने बसणे शक्‍य नसल्याने त्याच्या मागे एकजण सोबतीला असतो. अशा लोकांची अडवणूकसुद्धा ट्रॅफिक पोलिस करीत आहेत. खातरोड मार्गावर फिरती दुकाने लावणाऱ्या विक्रेत्यांनासुद्धा पोलिस नाहक त्रास देत आहेत. संपूर्ण कागदपत्र ठेवून, वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांना वेठीस धरले जाते. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी काय? भूमिका घ्यावी, असा प्रश्‍न आहे. एकीकडे कोव्हिड योद्धा म्हणून पोलिसांचा गौरव होत असताना चुकीच्या पद्धतीने कारवाई करून वाहतूक पोलिस या विभागाची प्रतिमा मलीन करण्याचे काम करीत असल्याचा सामान्य नागरिकांचा आरोप आहे.

अधिक माहितीसाठी - बाळाच्या घाईने पती-पत्नी भरपावसात घराकडे निघाले; अन् नियतीने डाव साधला

वाहतूक पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष

शीतला माता मंदिर चौक या मार्गे मोठ्या प्रमाणात रहदारी सुरू असते. वाहनांच्या गर्दीमुळे येथे बराचवेळा ट्रॅफिक जाम लागतो. रहदारी करणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो. या चौकात कोणते वाहन कधी धडकेल याचा नेम नसतो. अशा वेळी वाहतुकीवर नियंत्रणात ठेवणे, वाहनधारकांना मार्ग खुला करून देणे हे वाहतूक पोलिसांचे काम आहे. परंतु, कर्तव्यावर असलेले पोलिस चिरीमिरी वसूल करण्याच्या दुसऱ्याच कामात व्यस्त असल्याचा प्रत्यय या ठिकाणी येतो. पोलिसांच्या कठड्यात जनावरे बसल्याचे दिसून येते. यामुळे सामान्य वाहनधारकांना मात्र,मनस्ताप सोसावा लागतो. याकडे वाहतूक पोलिस निरीक्षकांनी लक्ष देवून संबंधितावर कारवाई करण्याची गरज आहे.

संपादन - अथर्व महांकाळ